आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?

(भाग १९)

काही लोकांच्या मनात प्रश्न येत असेल, ‘विदेशातही स्थानदेवता किंवा ग्रामदेवता असतात का ?’ तर हो. तेथेही या देवता असतात. यासंदर्भात मला आलेली एक अनुभूती येथे देते.

पू. तनुजा ठाकूर

१. धर्मप्रसारासाठी व्हिएन्ना शहरात गेल्यावर सेवेमुळे अन्यत्र कुठेही बाहेर पडता न येणे आणि अन्य लोकांच्या इच्छेपोटी निसर्गसौंदर्याने नटलेल्या परिसरातील डेन्यूब नदीत जहाजाद्वारे भ्रमंतीसाठी जाणे

वर्ष २०१५ मध्ये मी ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना नगरात धर्मप्रसारासाठी गेले होते. तेव्हा एक सप्ताह प्रथम व्हिएन्नाच्या स्थानिक हिंदु मंदिरात आणि त्यानंतर काही हिंदूंच्या घरात प्रवचन झाले. मी त्यानंतर जर्मनीला निघून गेले. जर्मनीहून परततांना मी पुन्हा काही दिवस व्हिएन्नाला थांबले होते; कारण मला माझ्या मासिक पत्रिकेसाठी संकलन आणि लेखन करायचे होते. त्यामुळे मी तेथे राहूनही कुठेच जाऊ शकले नाही; पण माझ्याशी जोडले गेलेल्या लोकांची पुष्कळ इच्छा होती की, मी त्यांच्यासमवेत कुठेतरी फिरायला जावे. त्यांचे मन सांभाळण्यासाठी मी त्यांच्या समवेत तेथील डेन्यूब नदीत जहाजाद्वारे भ्रमंतीसाठी गेले होते. तेथील दृश्य पुष्कळच सुंदर होते. तो परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला होता.

२. नदीदेवतेला नमस्कार केल्यावर तेथून सुंदर देवी प्रकटणे, प्रथम ती नदीदेवता असल्याचे वाटणे; परंतु ती स्थानदेवता असून वैदिक उपासना पिठाच्या प्रवचनांमधील चैतन्यामुळे आसुरी शक्तींच्या बंधनातून मुक्त झाल्याचे सांगणे

मी जहाजातून उतरून नदीदेवतेला नमस्कार करत होते. तेव्हा एक सुंदर देवी नदीतून (सूक्ष्मातून) प्रकट झाली. मी विचार केला, ‘ही डेन्यूबदेवी असेल.’ मी तिला नमस्कार केला आणि तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत तिच्याशी सूक्ष्मातून संवाद साधला. मी देवीला म्हणाले, ‘तुमच्या नदीची नैसर्गिक छटा अत्यंत मोहक आहे.’ देवी म्हणाली, ‘‘मी डेन्यूबदेवी नाही, तर मी येथील स्थानदेवता आहे. शेकडो वर्षांपासून आसुरी शक्तींनी मला बंधनात बांधून ठेवले होते; परंतु येथे वैदिक उपासना पिठाची सातत्याने प्रवचने झाल्याने त्यातील चैतन्यांमुळे मी बंधनमुक्त झाले. तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी येथे प्रकट झाले आहे.’’

३. गुरुदेवांच्या चैतन्यामुळे देवी मुक्त झाल्याने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे

‘उपासना पिठा’च्या सत्संगात सांगितले जाणारे सर्व विशुद्ध वैदिक ज्ञान हे मी माझ्या श्रीगुरुंकडून शिकले आहे. ‘त्यांच्या चैतन्याने ती देवी मुक्त झाली’, हे ऐकून मला आपल्या गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली. तेव्हा लक्षात आले की, सर्व स्थानांवर स्थानदेवता आणि ग्रामदेवता असतातच.

४. व्हिएन्ना येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी सुटीचा दिवस नसतांनाही ८० लोकांनी उपस्थिती दर्शवणे आणि स्थानदेवता प्रसन्न झाल्यानेच हे सर्व घडू शकल्याचे वाटणे

त्या वर्षी आम्ही अकस्मात् गुरुपौर्णिमेचे स्थळ इटलीच्या ऐवजी व्हिएन्ना येथे ठरवले होते. स्थानिक लोकांचे म्हणणे होते की, गुरुपौर्णिमा साजरी करायची, तर बुधवारचा दिवस सुट्टीचा दिवस नसतो. त्यामुळे तेथे फारसे लोक येणार नाहीत; परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे जवळजवळ ८० लोक तेथे आले होते. मंदिराच्या क्रियाशील कार्यकर्त्यांसाठीसुद्धा हा अत्यंत आश्चर्याचा विषय होता. यावरून हे सिद्ध होते की, स्थानदेवता प्रसन्न झाल्यानेच हे सर्व घडू शकले.

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२६.३.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक