संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावरील गोंधळप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करणार ! – प्रमोद येवले, कुलगुरु
संभाजीनगर – विद्यापिठाच्या पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. या प्रकाराची उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गंभीर नोंद घेतली आहे. या प्रकारामुळे विद्यापिठाच्या परीक्षा नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. शासनाला प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला असून २ दिवसांत सविस्तर अहवालही पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी १ समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी ३ जून या दिवशी दिली.
२ जून या दिवशी झालेल्या परीक्षेच्या वेळी शहरातील विजेंद्र काबरा महाविद्यालय आणि शेंद्रा येथील महाविद्यालय या केंद्रांवर मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थी देण्यात आले होते, तसेच सभागृह तिकीटही परीक्षेच्या काही घंटे अगोदर उपलब्ध न झाल्याने तोंडी आसन क्रमांक सांगण्यात आले. या सर्व प्रकारात विजेंद्र काबरा महाविद्यालय केंद्रात एका बाकावर दाटीवाटीने ३ विद्यार्थ्यांना बसवले होते. सर्व गोंधळ उडाल्याने विद्यापिठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉॅ. गणेश मंझा यांनीही केंद्रावर भेट दिली, तर असलेल्या ‘स्कॉड’नेही विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचा अहवाल दिला आहे. प्राथमिक अहवालातही क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी आणि सुविधा यांच्या समन्वयाचा अभाव होता, असे म्हटले आहे.