बळजोरीने बायबल शिकवणाऱ्या संस्थांनी हिंदूंना सहिष्णू समजू नये ! – ह.भ.प. मदन महाराज तिरमारे
अमरावती येथे हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलन
अमरावती, ४ जून (वार्ता.) – आमची भारतीय संस्कृती महान आहे. मातेसमोर नतमस्तक होण्याची शिकवण आम्हाला आमची संस्कृती शिकवते. मातेवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रसंगी हनुमंतासारखी क्षात्रवृत्ती दाखवण्याची शिकवणही ती देते. त्यामुळे आम्हा हिंदूंच्या मुलांना बळजोरीने बायबल शिकवणाऱ्या संस्थांनी आम्हाला सहिष्णू समजू नये आणि तात्काळ ख्रिस्ती शाळांमधून बायबल शिकवण्याची सक्ती हटवावी, असे मार्गदर्शन ‘श्री गजानन महाराज सेवा समिती’चे ह.भ.प. मदन महाराज तिरमारे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात ते बोलत होते. या वेळी कॉन्व्हेंट शाळांमध्ये सक्तीने बायबल शिकवण्याचा विरोध करण्यात आला. त्यासाठी कॉन्व्हेंट शाळांमध्ये बायबल शिकवण्याची सक्ती न करण्याविषयीच्या घोषणा देण्यात आल्या. धर्मप्रेमींनी याविषयीचे फलक हाती धरून निषेध नोंदवला.
समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे म्हणाले, ‘‘बायबल शिकवण्यासाठी चर्चची व्यवस्था असतांना शाळेसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिकवण्याची सक्ती केली जाते, याचा आम्ही विरोध करत आहोत.’’ सनातन संस्थेच्या श्रीमती विभा चौधरी यांनीही याविषयीचे मत मांडले.