गॅस किंवा विजेचा उपयोग करून शिजवलेल्या अन्नापेक्षा मातीच्या चुलीवर शिजवलेल्या अन्नातून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे !
आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘काही वर्षांपूर्वी प्रथम शेणाने भूमी सारवून, चुलीची पूजा करून आणि अग्नीला तांदुळाची आहुती देऊन मगच अन्न शिजवण्याची प्रक्रिया आरंभ केली जात असे. यामुळे अन्नाकडे देवतांची स्पंदने आकृष्ट होत असत. असे अन्न ग्रहण करणाऱ्या जिवांना त्याचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरांवरही लाभ होत असे. आज खेडेगावातील काही घरे वगळता सर्वत्र चुलीवरील स्वयंपाक विस्मृतीतच गेला आहे. लाकडाचे स्थान रॉकेल, गॅस किंवा वीज (उदा. ‘इंडक्शन’) यांनी घेतले आहे. विजेच्या शेगडीवर (‘इंडक्शन’ शेगडीवर) (टीप) शिजवलेला भात, गॅसच्या शेगडीवर शिजवलेला भात आणि मातीच्या चुलीवर शिजवलेला भात यांच्यामधून प्रक्षेपित होणाऱ्या स्पंदनांचा अभ्यास कण्यासाठी ४.९.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
टीप – ‘इंडक्शन’ ही विजेवर चालणारी आधुनिक पद्धतीची शेगडी आहे. आजकाल काही गृहिणी या विजेवर चालणाऱ्या शेगडीवर पूर्ण स्वयंपाक बनवतात.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
१ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन : विजेच्या शेगडीवर शिजवलेल्या भातामध्ये सर्वाधिक नकारात्मक ऊर्जा आढळली. त्याहून अल्प गॅसच्या शेगडीवर शिजवलेल्या भातामध्ये आढळली; पण मातीच्या चुलीवर शिजवलेल्या भातामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही.
१ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन : विजेच्या शेगडीवर शिजवलेल्या भातामध्ये सकारात्मक ऊर्जा मुळीच आढळली नाही. गॅसच्या शेगडीवर शिजवलेल्या भातामध्ये अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली आणि मातीच्या चुलीवर शिजवलेल्या भातामध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली.
वरील विवेचन पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
टीप १ – विजेच्या शेगडीवर शिजवलेल्या भातामध्ये सकारात्मक ऊर्जा आढळली नाही.
टीप २ – मातीच्या चुलीवर शिजवलेल्या भातामध्ये ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.
२. निष्कर्ष
गॅस आणि विजेच्या शेगड्यांवर स्वयंपाक बनवण्याची पद्धत असात्त्विक असल्याने शिजवलेल्या अन्नावर पुष्कळ नकारात्मक परिणाम होतो, तर मातीच्या चुलीवर स्वयंपाक बनवण्याची पद्धत सात्त्विक असल्याने शिजवलेल्या अन्नावर सकारात्मक परिणाम होतो, हे या वैज्ञानिक चाचणीतून स्पष्ट झाले.
वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. गॅस आणि विजेचा उपयोग करून स्वयंपाक बनवण्याची पद्धत असात्त्विक असणे : सध्याच्या विज्ञानयुगात पाश्चात्त्य लोकांचे अंधानुकरण केल्याने भारतियांचे आचार-विचार विकृत झाले आहेत. मातीच्या चुलीवर स्वयंपाक बनवणे कालबाह्य झाले आहे. लाकडाचे स्थान रॉकेल, गॅस किंवा वीज अशा तमोगुणी इंधनाने घेतले आहे. या आधुनिक इंधनांच्या साहाय्याने होणारी प्रक्रिया तमोगुणी वायूमंडलाची निर्मिती करत असल्याने या वायूमंडलाकडे अनिष्ट शक्ती आकृष्ट होतात. त्यामुळे अन्न दूषित होऊन ते सेवन करणाऱ्याच्या देहावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होण्याचे प्रमाण वाढते. याचाच प्रत्यय चाचणीतील गॅस आणि विजेच्या (‘इंडक्शन’) शेगडीवर शिजवलेल्या भाताच्या संदर्भात आला. गॅस आणि विजेच्या शेगड्यांवर शिजवलेल्या भातांमध्ये सकारात्मक स्पंदने नसून पुष्कळ नकारात्मक स्पंदने आढळली. यातून या दोन्ही पद्धती असात्त्विक असल्याचे सिद्ध होते. असात्त्विक पद्धतीने बनवलेला स्वयंपाक रुचकर तर लागत नाहीच; पण आरोग्याच्या दृष्टीनेही पुष्कळ हानिकारक आहे.
३ आ. मातीच्या चुलीवर स्वयंपाक बनवण्याची पद्धत सात्त्विक असणे : हिंदु धर्मात प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करून मानवाच्या कल्याणासाठी आचारधर्म सांगितले आहेत. यांपैकीच एक महत्त्वाचा आचार म्हणजे स्वयंपाकाचे आचार होय ! आपल्यापैकी काही जणांनी काही वर्षांपूर्वी गावाकडे आपल्या आजीने मातीच्या चुलीवर बनवलेल्या स्वयंपाकाची चव नक्कीच चाखली असेल. आजीने बनवलेला स्वयंपाक अतिशय रुचकर आणि मन प्रसन्न करणारा असायचा. याचे कारण हे की, त्या काळी लोकांचे आचार अन् विचार सात्त्विक होते. ते धर्मशास्त्राने घालून दिलेल्या आचारांचे यथायोग्य पालन करत होते. आहारातील घटक जसे सात्त्विक होते, तसे त्यांपासून स्वयंपाक बनवण्याची पद्धतही सात्त्विक होती. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून लाकूड वापरले जाते. लाकडात तेजतत्त्व असते. लाकडातील अग्नीला ‘प्रदीप्त अग्नी’ असे म्हणतात. हा अग्नी नैसर्गिक असल्याने त्यातून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्म तेजदायी लहरी या सूक्ष्म स्तरावरील रज-तमात्मक कणांचे विघटन करू शकतात. चुलीवर स्वयंपाक बनवतांना अन्नावर अग्नीचा संस्कार होत असल्याने अन्न सात्त्विक बनते. याचाच प्रत्यय चाचणीतील मातीच्या चुलीवर शिजवलेल्या भाताच्या संदर्भात आला. मातीच्या चुलीवर शिजवलेल्या भातामध्ये नकारात्मक स्पंदने मुळीच नसून पुष्कळ सकारात्मक स्पंदने आढळली. यातून मातीच्या चुलीवर स्वयंपाक बनवण्याची पद्धत सात्त्विक असल्याचे सिद्ध होते. सात्त्विक पद्धतीने बनवलेला स्वयंपाक रुचकर तर लागतोच; पण आरोग्याच्या दृष्टीनेही पुष्कळ लाभदायी असतो.’
– श्री. अपूर्व ढगे (‘हॉटेल मॅनेजमेंट’ पदवीधर), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१६.९.२०२०)
ई-मेल : mav.research2014@gmail.com