सद्गुरु चिले महाराज यांचे शिष्य पू. गुप्तेबाबा यांचा देहत्याग
कोल्हापूर, ४ जून (वार्ता.) – सद्गुरु चिले महाराज यांचे शिष्य पू. गुप्तेबाबा तथा डॉक्टर सुधीर गुप्ते (वय ८३ वर्षे) यांनी ३ जून या दिवशी देहत्याग केला. त्यांच्या पश्चात् पत्नी, २ मुली,२ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पू. गुप्तेबाबा यांनी सद्गुरु चिले महाराज यांची अत्यंत भावपूर्ण सेवा केली. सद्गुरु चिले महाराजांनी त्यांना ‘तुझे ते माझं आणि माझं ते तुझं’, असा आशीर्वाद दिला होता.
गुरुर्वाज्ञापालन करत जीवन कसे जगावे ? याचे आदर्श उदाहरण म्हणजे पू. गुप्तेबाबा होय. पू. बाबांनी सद्गुरु चिले महाराज यांच्यावर ‘चंदनी सुगंधी’ नावाचा चरित्रग्रंथ संकलित केला आहे. पू. बाबांच्या देहत्यागानंतर त्यांच्या तोंडावळ्याचा रंग पिवळा झाल्याचे त्यांचे अंत्यदर्शन घेणार्यांनी सांगितले.
पू. गुप्तेबाबांची सनातन संस्थेशी विशेष जवळीक !
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पू. गुप्तेबाबा यांच्या विरोधात कांगावा करत खोटा खटला प्रविष्ट केला होता. त्या वेळी सनातन संस्थेने त्यांचे समर्थन केले होते. पू. गुप्तेबाबा यांनी तो खटला जिंकला. सनातनने केलेल्या समर्थनामुळे पू. गुप्तेबाबा यांना सनातन संस्थेविषयी विशेष आपुलकी होती. ते सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि सनातनचे साधक यांची नेहमी आस्थेने चौकशी करत.