गोव्यात मंत्र्यांच्या शपथविधी कार्यक्रमात वाहनांवर ७२ लाखांहून अधिक रक्कम खर्च
पणजी, २ जून (वार्ता.) – बांबोळी येथे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर २८ मार्च या दिवशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि ८ मंत्र्याचा शपथविधी कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महनीय व्यक्ती आणि त्यांचे सुरक्षारक्षक यांच्यासाठी भाड्याने घेतलेल्या वाहनांवर ७२ लाख २१ सहस्र ९७२ रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती माहितीच्या अधिकारातून समोर आली आहे. अधिवक्ता आयरिश रॉड्रिग्ज यांनी माहितीच्या अधिकाराखाली पर्यटन विकास महामंडळाकडून ही माहिती मिळवली आहे.
AN 18 MINUTE POLITICAL CARNIVAL THAT COST THE TAXPAYERS OVER 6.5 CR. Read more at https://t.co/jEKsHYvxeD pic.twitter.com/bUiMDAEJ59
— Aires Rodrigues (@rodrigues_aires) June 4, 2022
या महितीनुसार, शपथविधीच्या कार्यक्रमासाठी पर्यटन विकास महामंडळाने भाड्याची १३४ वाहने पुरवली होती, तसेच या शपथविधी कार्यक्रमासाठी गोवा प्रशासनाकडून ५ कोटी ५९ लाख २५ सहस्र ८०० रुपये खर्च करण्यात आले. माहिती खात्याकडून प्रसिद्धीसाठी २४ लाख ५२ सहस्र ४७७ रुपये खर्च करण्यात आले. गोवा शासनाने १८ मिनिटांच्या कार्यक्रमासाठी ६ कोटी ५६ लाख २५४ रुपये अनावश्यक खर्च केले, असे अधिवक्ता रॉड्रिग्ज यांनी म्हटले आहे. ‘गोव्यातील वृद्ध आणि निर्धन लोकांना समाजकल्याण खात्याकडून मासिक योजनेचा लाभ मिळत नसतांना जनतेकडून मिळालेला निधी अशा प्रकारे खर्च करणे अयोग्य आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
जनतेकडून मिळालेल्या निधीद्वारे प्रशासनामध्ये चाललेल्या या प्रकारांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी अधिवक्ता रॉड्रिग्ज यांनी राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लाई यांच्याकडे केली आहे.
माहिती अधिकारातील कार्यक्रमाच्या खर्चाचा तपशील
- व्यासपीठ सजावट – १ कोटी ८६ लक्ष रुपये
- विशेष अतीमहनीय व्यक्तींसाठी ५०० खुर्च्या – ३ लक्ष रुपये
- इतर अतीमहनीय व्यक्तींसाठी ३ सहस्र ५०० खुर्च्या – ८ लक्ष ७५ सहस्र रुपये
- १० सहस्र लोकांसाठी जेवण – ५७ लक्ष ५० सहस्र रुपये
- ५०० अतीमहनीय व्यक्तींसाठी खास जेवण – ४ लक्ष ८० सहस्र रुपये
- ७५ अतीमहनीय व्यक्तींना विशेष ‘बुफेट’ जेवण – ५ लक्ष ६६ सहस्र रुपये
- दोन कमानी – १६ लक्ष रुपये
- ध्वनीक्षेपक यंत्रणा – १४ लक्ष रुपये
- ३ रेड कार्पेट – ८ लक्ष २५ सहस्र रुपये
- लोकांसाठी मंडप – १९ लक्ष रुपये
- २ सहस्र ४०० ‘कट आउट’ – ६८ लक्ष ४० सहस्र रुपये