साधनेचा दृष्टीकोन ठेवून शेती करणारे सनातनचे श्री. शिवाजी उगले !
सनातनचे साधक श्री. शिवाजी उगले हे ‘ही माझी साधना आहे’, असा भाव ठेवून शेती करतात. शेती करतांना त्यांनी ठेवलेला भाव, तसेच साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि आलेल्या अनुभूती पाहूया.
१. शेती करतांना केलेल्या प्रार्थना
अ. हे धरणीमाते, माझ्यामुळे तुला जो त्रास होणार आहे, त्यासाठी मला क्षमा कर. तुझ्या कृपेमुळे मला ही सेवेची संधी मिळत आहे.
आ. धरणीमाता, जलदेवता, वायूदेवता आणि आकाशदेवता यांना ‘आपल्यामध्ये असलेले चैतन्य मला ग्रहण करता येऊ दे. माझ्यावर उपाय होऊ देत. माझा सतत नामजप होऊ दे.’
२. शेती करतांना ठेवलेला भाव
अ. शेती हा व्यवसाय मला ईश्वरकृपेने मिळाला आहे.
आ. माझे शेत हे गुरूंचेच असून मी गुरूंच्या शेतातील चाकर आहे.
इ. शेती करतांना मी नेहमी संत सावतामाळी आणि संत तुकाराम महाराज यांचा आदर्श समोर ठेवतो. ते कसे भजनात, नामात समरस होऊन शेती करायचे, ते आठवतो.
३. शेतीतून आलेल्या पिकाविषयी ठेवलेला भाव
अ. शेतात आलेले पीक मी प्रथम गुरुचरणी अर्पण करतो, उदा. कांदा, तसेच गहू, भात इत्यादी धान्ये आल्यावर ती थोड्या प्रमाणात घेऊन परात्पर गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर ठेवतो आणि हात जोडून प्रथम कृतज्ञता व्यक्त करतोे, ‘आपल्या कृपेमुळेच हे पीक आले आहे. यासाठी मी कृतज्ञ आहे.’ अशी कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे माझ्यातील अहं आणि कर्तेपणा नष्ट होण्यास साहाय्य होते.
आ. आलेल्या पिकाविषयी कसलाही विचार न करता ते अल्प वा अधिक आले, तरी ‘ती गुर्वेच्छा आहे’, असा मी भाव ठेवतो.
इ. आपल्याला वाटत असते की, पुष्कळ धान्य येईल, पुष्कळ पैसे मिळतील; पण तसे होत नाही. तेव्हा ‘जितके प्रारब्धात आहे, तितकेच मिळते’, असा मी सतत भाव ठेवतो.
४. शेती करतांना केलेल्या कृती
मी प्रत्येक कृती करतांना नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करतो. एक बी लावले की, त्यासमवेत एकदा नाम घेतो. पिकांवर फवारणी करतांना औषधात विभूती आणि कापूर घालतो. शेतात काम करतांना भ्रमणभाषवर भजने लावतो. शेती ही माझी व्यष्टी आणि समष्टी साधना करण्याचे माध्यम आहे, असा दृष्टीकोन ठेवून मी प्रयत्न करतो.
५. साहाय्य करणाऱ्यांप्रती कृतज्ञता
शेती करण्यासाठी ज्यांचे साहाय्य होते, उदा. फावडे, बैल, कामगार या सर्वांप्रती मी पुढीलप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आपल्यामुळे मला शेती सुलभरित्या करता आली. माझे श्रम (कष्ट) आपल्यामुळे वाचले. यासाठी मी कृतज्ञ आहे.’
– श्री. शिवाजी उगले, कोठूरे, निफाड, नाशिक.