सांस्कृतिक राष्ट्रवादाचे पर्व !
श्रीरामजन्मभूमीचा निकाल हिंदूंच्या बाजूने लागल्यावर हळूहळू वाराणसी आणि मथुरा येथील अनुक्रमे श्री काशी विश्वनाथ मंदिर अन् श्रीकृष्णजन्मभूमी येथे मुसलमानांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विरोधात न्यायालयीन लढ्याला वेग आला. गेल्या काही आठवड्यांमध्ये देशभरातील अनेक इस्लामी वास्तू या मूळची हिंदूंची मंदिरे असल्याने हिंदुत्वनिष्ठांकडून त्यासाठीही आवाज उठवला जाऊ लागला आहे. ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट १९९०’ रहित करण्यासाठी हिंदूंचे ऐतिहासिक संघटन उभे रहात आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाचे हे नूतन पर्व आसेतुहिमाचल असलेल्या भारतासाठी आशेचा नि नवचैतन्याचा किरण घेऊन आले आहे. आगामी हिंदु राष्ट्राच्या दिशेने हा मैलाचा दगड सिद्ध होण्यासाठी आता केंद्रशासनाने भगीरथ प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !
सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे वहाणे ही काळाची नितांत आवश्यकता आहे. त्यासंदर्भात समस्त हिंदूंच्या मनामध्ये ‘अपराधीपणा’ने कुठे घर केले असेल, तर ते आधी झटकावे. हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता प्रादेशिक (भौगोलिक) राष्ट्रवादासमवेत सांस्कृतिक राष्ट्रवादाला अत्यधिक महत्त्व आहे, किंबहुना हिंदूंची मरणप्राय स्थिती पहाता प्रदेशापेक्षा संस्कृतीला अधिक प्राधान्य द्यावे लागणार आहे. ‘संस्कृती’ या शब्दामागे हिंदु आचार, विचार, नीती, शास्त्रे आदींना पुनरुज्जीवित करणे म्हणजे धर्मसंस्थापना करणे, असा अर्थ अभिप्रेत आहे. धर्म हा राष्ट्राचा प्राण असल्याने धर्म टिकला, तर राष्ट्र टिकेल अन् त्यातून समाज एकसंध राहू शकेल. ‘हिंदु अस्तित्वा’च्या अपरिहार्यतेसाठीचा हा लढा आहे.
‘जागतिक’ संस्कृतींचे जतन !
आज प्रत्येक राष्ट्राने स्वत:चे मूळ स्वरूप आणि प्रतिमा जपून ठेवली आहे. इवल्याशा जपानने त्याचे आचार, विचार, संस्कृती आदी टिकवत नेत्रदीपक भौतिक प्रगती साध्य केली. जगात सर्वांत शक्तीशाली म्हणवणाऱ्या अमेरिकेचा विचार करता तिच्याकडे ‘अमेरिकन एक्सेप्शनलिझम्’ नावाची राष्ट्रवादाची अत्यंत राष्ट्राभिमानी संकल्पना विकसित झालेली आहे. ती लहानपणापासून मुलांमध्ये रुजवली जाते. ‘जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा अमेरिकेची अत्यंत वेगळी, असाधारण आणि विलक्षण ओळख आहे’, असा तिचा अर्थ ! अमेरिकी मूल्ये, राजकीय पद्धत, इतिहास आणि जगाच्या हितासाठी वठवलेली महत्त्वपूर्ण भूमिका यांविषयी प्रत्येक अमेरिकी नागरिक हा अभिमानी असतो अन् हाच अभिमान त्यांच्या राष्ट्राला शक्तीशाली बनवत असतो; पण गंमत पहा, आपल्याकडील पुरो(अधो)गामी टोळी अमेरिकेच्या या विचारसरणीचे अनुकरण करतांना दिसत नाही. तसे केले, तर त्यांना भारतीय म्हणजे हिंदु संस्कृतीच्या जतनाचे कार्य करावे लागेल. त्यामुळे पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यातील या उपटसुंभांचा उथळपणा दिसून येतो. असो. प्रगत देशांखेरीज अन्य देशांचा विचार करता अगदी मुसलमान देशही त्यांची वेगळी ओळख जपण्यासाठी प्रयत्नरत आहेत. इराण स्वत:ला अरब देशांपेक्षा पूर्णत: वेगळा समजतो. त्यांची इराणी संस्कृती टिकवण्यासाठी ते कटाक्षाने प्रयत्नशील आहेत. तुर्कस्तानाचेही तसेच आहे !
यांच्यातील आणि भारतातील विरोधाभासाचे महत्त्वाचे सूत्र असे की, अन्य देशांना त्यांच्या संस्कृतीमध्ये इतर संस्कृतींचा मिलाप असहनीय वाटतो. याचे सांप्रत काळातील उदाहरण म्हणजे जर्मनीसह युरोपात सीरिया, इराक आणि उत्तर आफ्रिका येथून लक्षावधी मुसलमान निर्वासित झाले, तेव्हा सामान्य युरोपीय जनतेकडून त्यास झालेला तीव्र विरोध ! भारताने मात्र सहस्रावधी वर्षांपासून त्याच्याकडे आश्रयाची याचना करणाऱ्यांना मान दिला अन् त्यांच्या संस्कृतीची जोपासना करण्याची मोकळीक दिली. भारताला ‘असहिष्णु’ म्हणणाऱ्यांना गप्प करण्यासाठी त्यांना सडेतोड शब्दात खडसावणे त्यामुळे आवश्यक आहे.
आपली संस्कृती जोपासून जपान, फ्रान्स, चीन आदी प्रगत देश अग्रक्रमावर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. स्वभाषा, जीवनमूल्ये, इतिहास यांना जोपासून म्हणजेच संस्कृतीचा अभिमान टिकवून ते भौतिक प्रगतीची नवनवीन दालने पादाक्रांत करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासून हिंदू रुढीवादी बनत आहेत अन् देशाला पुन्हा मध्ययुगीन काळाकडे नेत आहेत’, अशी जी वक्तव्ये केली जातात, त्यातील खुळचटपणा, तर्कहीनता आणि कपोलकल्पितता लक्षात येते. अज्ञानाचा पुरस्कार करणाऱ्या अशा वक्तव्यांचेही हिंदूंनी जोरदार खंडण करणे आवश्यक !
व्याप्ती वाढवा !
सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जे वारे भारतात वहायला आरंभ झाला आहे, ते आता पुढे जाणे आवश्यक आहे. मंदिरे ही धर्माधारित हिंदुत्वाची ओळख असल्याने त्यांच्या पुनर्उभारणीसह आक्रमकांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची प्रत्येक खूण पुसली गेली पाहिजे. ज्या-ज्या गावांना, नगरांना, महानगरांना म्लेच्छांची नावे देऊन त्यास अशुद्ध केले गेले, त्या सर्वांची नावे पालटली पाहिजेत. भारताची ज्ञान परंपरा ज्या प्रदेशात चालू झाली, अशा कश्यपऋषींच्या काश्मीरपासूनच याचा आरंभ का करू नये ?
स्थूलातील या राष्ट्रनिष्ठेसमवेत प्रत्येक हिंदूच्या मनात धर्माभिमान रुजायला हवा. आज आयुर्वेदावर कुणी आयुर्वेदाचार्यांना शोधनिबंध सादर करतांना त्यांच्या संशोधनाला अमेरिका-ब्रिटेन येथील अमुक विश्वविद्यालयाकडून मान्यता मिळाली आहे, असे (दुर्दैवाने) प्रौढीने सांगावे लागते. हे संतापजनक नव्हे का ? आपल्या वारशाला पाश्चात्त्यांकडून अनुमोदन कशाला हवे ? हिंदूंनी या न्यूनगंडाला झटकावे. जनतेची शुद्ध सात्त्विक दृष्टी ही भारताची वास्तविक शक्ती बनू शकते, हे लक्षात घ्यायला हवे. स्थूलातून मंदिरे उभारली, तरी त्यांवरील आक्रमणाचा धोका संभवतो; पण ‘हिंदु’मन पालटले, तर पृथ्वीतलावर त्याहून सामर्थ्यवान काय असेल ? त्यामुळे हिंदूंनो, तुमच्या नसानसांत संस्कृती भिनवण्यासाठी साधना करा आणि राष्ट्राचे हात बळकट करा !
‘सांस्कृतिक राष्ट्रवाद जोपासल्याने देश मध्ययुगीन काळाकडे जात आहे’, असे म्हणणे हे खुळचटपणाचे लक्षण ! |