कोडोली (जिल्हा सातारा) येथील श्री मारुति मंदिराचे पावित्र्य जोपासण्यासह सुशोभिकरण व्हावे !
‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’ची ग्रामप्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
सातारा, ३ जून (वार्ता.) – येथील कोडोली गावात मारुतिचे मंदिर आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मंदिराची अवस्था दयनीय झाली आहे. याचे पावित्र्य जपत मंदिराचे सुशोभिकरण व्हावे, अशी मागणी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’च्या वतीने ग्रामसेवक सुभाष गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान’चे सर्वश्री योगेश कापले, प्रशांत जाधव, ओंकार शिंदे, कुणाल पवार, क्षितिज निकम, निशांत जाधव आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनामध्ये म्हटले आहे की,
१. श्री मारुति ही शक्तीची देवता आहे; परंतु गावातील कोणत्याही मंदिरात गेल्यावर चैतन्य न जाणवल्यामुळे मन प्रसन्न होत नाही. पावित्र्य जपणे हे एकट्या ग्रामपंचायतीचे काम नसले, तरी यासाठी आध्यात्मिक उपक्रम राबवून त्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देता आले पाहिजे. यासाठी मंदिरात यज्ञ-याग, होम-हवन, कीर्तन, प्रवचन, जप-अनुष्ठान होणे आवश्यक आहे.
२. गावातील मारुति मंदिराचे ग्रामपंचायत निधीतून सुशोभिकरण व्हावे. तसेच थोडेफार लागणारे अर्थसाहाय्य लोकवर्गणीतून गोळा केले जावे. मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम सोडून इतर कार्यक्रम घेतले जातात. उदा. आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर इत्यादी. यामुळे मांसाहार करणारे, मद्यप्राशन केलेले, तसेच मासिक धर्म न पाळणार्या स्त्रिया मंदिरात येतात. यामुळे मंदिराचे पावित्र्य भंग पावते. हे कार्यक्रम ग्रापंचायतीच्या सभागृहात किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये घेऊ शकतो.
३. मंदिरात पुरेशी वीज व्यवस्था, संपूर्ण मंदिराला रंगरंगोटी, मंदिर परिसरात सूचना फलक लावणे, पाय धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था, तेल ओतण्यासाठी भांडे, मीठ, काळे उडीद, पीठ इत्यादींसाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात यावी. कट्टयावर मारुतीची मूर्ती (मोकळ्या अवस्थेत) असून तिचे संरक्षण आणि स्वच्छता यांसाठी छोटे देवघर बांधून त्याला कुलूप लावण्यात यावे.