द्वारका पीठाच्या शंकराचार्यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद आज ज्ञानवापीतील शिवलिंगाची पूजा करण्यासाठी जाणार !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – भगवान शिव प्रकट झाले आहेत, तर त्यांची पूजा-अर्चा, नैवैद्य आदी झाले पाहिजे. आमच्या आराध्याच्या पूजेसाठी आम्ही न्यायालयाच्या आदेशाची प्रतीक्षा करू शकत नाही. त्यामुळे आम्ही ४ जून या दिवशी ज्ञानवापीच्या वजूखान्यामध्ये (नमाजाच्या पूर्वी हात-पाय धुण्याची जागा) सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करणार आहेत, अशी घोषणा द्वारका आणि ज्योतिष पीठाचे पीठाधिश्‍वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे विशेष प्रतिनिधी स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांनी केली. ते येथील केदारघाटस्थित विद्यामठामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

१. न्यायालयाच्या आदेशानुसार वजूखान्याची जागा बंद करण्यात आली असतांना तुम्ही पूजा कशी करणार ?, असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले की, धार्मिक प्रकरणांत शंकराचार्यांचा आदेश सर्वोपरि असतो. त्यांच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. आम्ही कायदा हातात घेणार आहोत, असे तुम्हाला वाटते का ? आम्ही सर्व मर्यादांचे पालन करून पूजा करणार आहेत.

२. स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद पुढे म्हणाले की, शास्त्रांमध्ये सांगितले आहे की, भगवान प्रकट झाल्यावर त्याची स्तुती करणे, त्याची पूजा, आरती करणे, त्याला नैवेद्य दाखवणे, हा नियम आहे. ज्ञानवापीतील शिवलिंगाविषयी हिंदूंनी यासाठी अनुमती मागितली; मात्र यावर अद्याप निर्णय झालेला नाही. शास्त्रानुसार एक दिवसही देवतेची पूजा थांबवता येत नाही. भारताच्या राज्यघटनेतही हे स्पष्ट करण्यात आले आहे की, प्राणप्रतिष्ठा केलेली देवता ही ३ वर्षांच्या मुलासारखी असते. या मुलाला स्नान आणि भोजन यांपासून वंचित ठेवता येत नाही. तसेच देवतेचे असते आणि तो तिचा घटनात्मक अधिकार आहे.

मोगलांच्या कुठल्याही इमारतीत शिवलिंगासारखे कारंजे नाही !

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले की, मुसलमान शिवलिंगाला कारंजे म्हणत आहेत आणि काही हिंदूही त्यांचे समर्थन करत आहेत. ज्यांना भगवान शिवाविषयी काहीच ठाऊक नाही, ते असेच काहीतरी बोलत रहातील. आम्ही मोगलांनी बनवलेल्या अनेक इमारतींमधील कारंजे पाहिले आहेत; मात्र एकही कारंजा शिवलिंगाच्या आकाराचा आढळलेला नाही.