भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानच्या ७ खलाशांना घेतले कह्यात
कर्णावती – भारतीय तटरक्षक दलाने गुजरातमधील आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ पाकिस्तानच्या ७ खलाशांना कह्यात घेतले. ‘अल् नोमान’ हे पाकिस्तानी जहाज भारताच्या सागरी सीमेत घुसले होते. या जहाजात हे ७ खलाशी होते. गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भारतीय तटरक्षक दलाने ही कारवाई केली. या जहाजातून भारतात बंदी असलेल्या काही वस्तू आणल्याचा संशय आहे. ‘पुढील अन्वेषणासाठी ते जहाज आणि ७ खलाशी यांना गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील ओखा बंदरात आणले जाईल’, अशी माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकार्यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी गुजरातचे आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या एका संयुक्त कारवाईत पाकिस्तानातून सागरी मार्गाने आणलेले २८० कोटी रुपये किमतीचे ५६ किलो अमली पदार्थ पकडले होते.