जेजुरी येथील श्री मार्तंड मंदिराकडून ‘इफ्तार पार्टी’ आयोजित केल्याप्रकरणी दिलगिरी !

विश्व हिंदु परिषद आणि हिंदु जनजागर परिषदेच्या लढ्याला यश

पुणे – मार्तंड देवस्थान जेजुरी यांच्या माध्यमातून १ मे या दिवशी मुसलमान धर्मियांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आणि तशी ‘पोस्ट’ही देवस्थानने सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती. ‘हिंदूंनी श्रद्धेने अर्पण केलेल्या पैशांचा असा अपवापर करण्याचे कोणतेही हक्क विश्वस्त मंडळास नाहीत आणि हिंदु समाज अशा गोष्टी खपवूनही घेणार नाही. याची जाणीव व्हावी’, यासाठी विश्व हिंदु परिषदेच्या माध्यमातून धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली. हिंदु जनजागर परिषद आणि विश्व हिंदु परिषदेचे अनेक कार्यकर्ते या विषयात सक्रीय होते. १ जून या दिवशी मा. धर्मादाय आयुक्त यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेऊन, ‘मार्तंड देवस्थान विश्वस्त मंडळाने कोणतेही घटनाबाह्य कृत्य करू नये’, असे आदेश विश्वस्तांना दिले आहेत. विश्वस्त मंडळाने झालेल्या प्रकाराविषयी खुलासा आणि दिलगिरी व्यक्त करून ‘या पुढे असे कोणतेही घटनाबाह्य वर्तन त्यांच्या हातून होणार नाही’, अशी लेखी हमी दिली आहे.