संभाजीनगर महापालिकेला पोलीस बंदोबस्त न मिळाल्याने अनधिकृत नळांवरील कारवाई पुन्हा रखडली !
संभाजीनगर – शहरातील शेकडो अनधिकृत नळांच्या विरोधात १ जूनपासून कारवाई करण्याचे महापालिकेने घोषित केले होते; मात्र पोलीस बंदोबस्त मिळण्याविषयी स्पष्टता नसल्यामुळे ही मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे. राजकीय नेते आणि महापालिकेतील कर्मचारी यांच्या संगनमताने ही अवैध नळजोडणी करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याविषयी शंका उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ८ जून या दिवशी शहरात सभा आहे.
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली अनधिकृत नळ शोधून तोडण्याची कारवाई केली जात आहे. त्यासाठी विशेष पथकांची स्थापनाही करण्यात आली. या पथकांनी गेल्या आठवड्यात शहानूरवाडी भागातील गादिया विहार, त्रिशरण चौक यांसह पडेगाव, पहाडसिंगपुरा, लक्ष्मी कॉलनी, शांतीपुरा, बेगमपुरा आदी भागांत अनधिकृत नळांचा शोध घेतला. मुख्य जलवाहिनीवरून ही जोडणी घेतल्याचे पथकाने केलेल्या पहाणीत स्पष्ट झाले.
८०० हून अधिक अनधिकृत नळजोडण्या पथकांनी शोधून काढल्या. ही नळजोडणी तोडण्यासाठी महापालिकेने २ वेळा नियोजन केले; परंतु पोलीस बंदोबस्ताविना अनधिकृत नळजोडणी तोडणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यावर त्या त्या भागातील पोलीस ठाण्यांना बंदोबस्तासाठी प्रशासनाकडून अर्ज देण्यात आले. पोलीस बंदोबस्त देण्याचे आश्वासन महापालिकेला मिळाले होते; पण ऐनवेळी पोलीस बंदोबस्त मिळाला नाही. त्यामुळे अनधिकृत नळजोडणी तोडण्याची कारवाई रहित करावी लागली. (पोलीस बंदोबस्ताचे आश्वासन कुणी दिले होते, त्यांनी ऐनवेळी शब्द फिरवल्याने कारवाई थांबवावी लागली, तर त्यांचीही चौकशी व्हायला हवी. यात कुणाचे हितसंबध नाही ना, हे पहाणे आवश्यक ! – संपादक)