खरीप भुईमुगाची लागवड कशी करावी ?
आता लवकरच पावसाळा चालू होईल. या पार्श्वभूमीवर भुईमुगाची लागवड करण्यासाठी भूमी कशा प्रकारची हवी ? तिची पूर्वमशागत, पेरणी, भुईमूग पिकाच्या विद्यापिठाने शिफारस केलेल्या सुधारित जाती (वाण), पेरणीची पद्धत आणि पिकाची काढणी कधी करावी ? याविषयीची माहिती या लेखात देत आहोत.
१. ‘भुईमूग’ पिकाचे महत्त्व
भुईमूग हे उष्ण कटीबंधांतील महत्त्वाचे तेल बी पीक असून त्याच्या बियांमध्ये (दाण्यांमध्ये) ४८ ते ५२ टक्के तेलाचे प्रमाण असते. त्याचा खाद्यतेल म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बियांमधून तेल काढून घेतल्यानंतर राहिलेल्या शिल्लक भागाला ‘पेंड’ असे म्हणतात. त्याच्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण भरपूर असल्यामुळे जनावरांचे खाद्य म्हणून त्याचा वापर केला जातो. भुईमूग पिकाच्या मुळावर असणाऱ्या गाठीद्वारे हवेतील नत्राचे (नायट्रोजनचे) स्थिरीकरण (फिक्सेशन) केले जाते आणि जवळजवळ प्रति हेक्टरी (अडीच एकर) ५० ते ८० किलोग्रॅम नत्र भूमीस मिळते; म्हणून या पिकाचा बेवड (भूमीची सुपीकता) पुढील पिकासाठी उत्तम असतो. त्यामुळे पुढील घेतल्या जाणाऱ्या पिकांच्या नत्र खतामध्ये बचत होते.
२. हवामान
भुईमुगाचे पीक मुख्यत्वे उष्ण कटीबंधात घेतले जाते. या पिकास उष्ण आणि कोरडे हवामान चांगले मानवते. हे पीक ८०० ते १ सहस्र २०० मिलीमीटर पावसाच्या प्रदेशामध्ये घेतल्यास उत्पन्न चांगले मिळते. अधिक पावसाचा पिकाची वाढ आणि उत्पन्न यांवर अनिष्ट परिणाम होतो. त्यामुळे शक्यतो हे पीक अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये घेऊ नये. कोकण किनारपट्टीत पाण्याचा निचरा होणाऱ्या भूमीत उतारावर थोड्या प्रमाणात हे पीक घेतले जाते; परंतु उत्पन्न अल्प मिळते.
३. भूमी
शेंगांची वाढ भूमीत होत असल्याने मध्यम ते भारी आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी भूमी निवडावी. शक्यतो हलक्या आणि चिकणमातीचे प्रमाण अधिक असलेल्या भूमीत पीक घेऊ नये; कारण पावसाने ताण (पावसामध्ये खंड पडल्यास) दिल्यास पिकाची वाढ आणि उत्पन्न यांवर त्याचा परिणाम होतो. तसेच शेंगा काढतांना काही शेंगा भूमीत राहू शकतात.
४. पूर्व मशागत
पिकाच्या वाढीसाठी भुसभुशीत भूमी आवश्यक असल्याने भूमीची खोल नांगरट करून घ्यावी. ढेकळे असल्यास ती फोडून घ्यावीत आणि उभी-आडवी कुळवाची पाळी द्यावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत अथवा उपलब्ध असल्यास गोमय (देशी गायीचे शेणखतापासून बनवलेले खत) भूमीत (मातीत) चांगले मिसळून घ्यावे. भूमीत दसकटे (पालापाचोळा) असल्यास ती वेचून घ्यावीत.
५. पेरणी
५ अ. पेरणीची वेळ : हंगामी पावसाला प्रारंभ होताच (मृग नक्षत्र) भुईमुगाची पेरणी चालू करून जून अखेरपर्यंत ती पूर्ण करावी.
५ आ. बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी बियाणास ३ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात ‘थायरम’ चोळावे (मर रोगाचा संसर्ग टाळण्यासाठी) या व्यतिरिक्त २० ग्रॅम ‘रायझोबियम’ आणि ५० ग्रॅम स्फुरद विरघळवणाऱ्या जीवाणू संवर्धनाची प्रति किलो बियाणास याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. उत्तम आणि चांगल्या प्रतीचे बियाणे हेक्टरी १०० ते १२५ किलो या प्रमाणात वापरावे.
५ इ. पेरणीची पद्धत : भुईमुगाचे बियाणे महाग असल्यामुळे, तसेच ते जास्त प्रमाणात वापरावे लागत असल्यामुळे पेरणी टोकन पद्धतीने (एक एक बियाणे लावणे) करावी. उपट्या जातीची पेरणी दोन ओळीत ३० सें.मी. अंतर ठेवून करावी. निमपसऱ्या आणि पसऱ्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर ४५ सें.मी. ठेवावे. दोन रोपातील अंतर १५ सें.मी. ठेवावे आणि एका ठिकाणी एकच बी टोकावा.
५ ई. भुईमूग पिकाच्या विद्यापिठाने शिफारस केलेल्या सुधारित जाती (वाण)
वरील जातीव्यतिरिक्त काही भागांत एम्. १३ आणि कऱ्हाड-४-११ या पसऱ्या जातीही घेतल्या जातात; परंतु या जातीचा कालावधी अधिक (जवळजवळ १४० – १५० दिवस) आहे.
६. खते
प्रति हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद (फॉस्फरस), तसेच २५० किलो जिप्सम पेरणीच्या वेळी द्यावे.
७. आंतरमशागत
तणांच्या बंदोबस्तासाठी ‘पेंडीमेथ्यालीन’ १ लिटर पाण्यामध्ये २-३ मि.लि. या प्रमाणात मिसळून भूमीवर फवारणी करावी. कुळवाच्या साहाय्याने भूमीत मिसळून घ्यावे. पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी आवश्यकतेनुसार १ खुरपणी करून पिकाला स्वस्तिक अवजाराच्या किंवा कोळप्याच्या साहाय्याने मातीची भर द्यावी. १५ दिवसांनी उपट्या जातीसाठी पिकावरून रिकामे पिंप फिरवल्याने भूमीत भुईमुगाच्या आऱ्यांची आणि शेंगांची संख्या वाढून उत्पन्न वाढते. पिकास आऱ्या सुटण्याच्या कालावधीत जिप्समचा दुसरा हप्ता हेक्टरी २५० किलोग्रॅम या प्रमाणात द्यावा.
८. संरक्षित पाणी देणे
पावसाने आऱ्या सुटणे ते शेंगांची वाढ होणे या कालावधीत ताण (पावसात खंड पडल्यास) आल्यास किंवा पाण्याची उपलब्धता असल्यास पिकास संरक्षित पाणी द्यावे.
९. पिकाची काढणी
शेंगा पक्व होतांना दाण्यांची पूर्ण वाढ होते, तसेच टरफलाची आतील बाजू काळसर दिसते. भूमीत पुरेसा ओलावा असतांना भुईमुगाचे डहाळे उपटून घेऊन शेंगा तोडून घ्याव्यात. ४ – ५ दिवस त्या उन्हात वाळवून नंतर जाड प्लास्टिक पिशवीमध्ये किंवा पोत्यामध्ये साठवाव्यात. साठवण्याच्या कालावधीत शेंगास ओल लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
संकलक : डॉ. निवृत्ती रामचंद्र चव्हाण (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), एम्. एस्सी. (ॲग्रिकल्चर), पीएच्.डी., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.