वयाच्या ७९ व्या वर्षीही तळमळीने साधना करणाऱ्या पुणे येथील श्रीमती लीला घोले (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के)
१. सौ. मनीषा पाठक (वय ४० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे
१ अ. शिकण्याची वृत्ती : ‘सातारा रस्ता, पुणे येथील श्रीमती लीला घोले (वय ७९ वर्षे) या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न करत आहेत. श्रीमती घोलेकाकूंचे वय अधिक असूनही त्यांच्यात शिकण्याची वृत्ती पुष्कळ आहे. त्यांनी टेलीग्राम, व्हॉट्सॲप या माध्यमांतून प्रसार करणे, ग्रंथांची माहिती पाठवणे, आढावा देणे हे सर्व शिकून घेतले.
१ आ. सत्संगांमध्ये ‘सेवेत झालेले प्रयत्न आणि मी न्यून कुठे पडले ?’, हे त्या पुढाकार घेऊन आणि प्रांजळपणे सांगतात.’
२. सौ. अनुराधा तागडे (वय ६६ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि सौ. प्रतिभा फलफले (वय ४३ वर्षे), पुणे
२ अ. उत्साही आणि सकारात्मक असणे : ‘श्रीमती घोलेकाकूंच्या घरी त्या आणि त्यांचा मुलगा (श्री. विजय घोले, वय ५६ वर्षे) असे दोघेच असतात. या वयातही काकूंना घरातील दायित्व सांभाळून अनेक कामे करावी लागतात. या सर्व परिस्थितीतही त्या सकारात्मक राहून सेवा आणि साधनेचे प्रयत्न करतात.
२ आ. समष्टी सेवेची तळमळ
१. सत्संगात समष्टी सेवेचे कोणतेही सूत्र सांगितल्यानंतर काकू त्वरित चिंतन करून सेवेला आरंभ करतात.
२. दळणवळण बंदीपूर्वी काकू धर्मजागृती सभा, तसेच गुरुपौर्णिमेच्या कालावधीत बाहेरगावी जाऊन प्रसार सेवा करणे इत्यादी सेवांत तळमळीने सहभागी व्हायच्या. सेवेसाठी कितीही दूर जावे लागले, तरीही त्या सेवेत सहभागी होतात.
३. दळणवळण बंदीपूर्वी काकू घराबाहेर पडून ४०० पंचांगांचे वितरण करत असत. त्या वेळी काकूंचे वय ७७ वर्षे होते. काकूंनी जिज्ञासू आणि नातेवाईक अशी १२० जणांची सूची सिद्ध केली आहे. दळणवळण बंदीमुळे बाहेर पडायला मर्यादा होती, तरीही त्या भ्रमणभाषवरून सर्वांना संपर्क करून पंचांग वितरण, ग्रंथ वितरण, अर्पण घेणे, मकरसंक्रांती निमित्त वाण देण्यासाठी सनातनच्या सात्त्विक उत्पादनांची मागणी घेणे, अशा सेवा करत असत.
२ इ. व्यष्टी साधना तळमळीने आणि परिपूर्ण करणे : काकू व्यष्टी साधनेचे प्रयत्न नियमित आणि तळमळीने करतात. त्या कधीही सवलत घेत नाहीत. त्या व्यष्टी साधनेचा आढावाही नियमित देतात.
२ ई. जिज्ञासूंना तळमळीने साधना सांगणे : काकू त्यांच्या नातेवाइकांना, तसेच संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुलदेवीचा आणि दत्ताचा नामजप करण्यास सांगतात. पूर्वी त्या गाण्याची शिकवणी घेत असत. त्यांनी शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांना अजूनही जोडून ठेवले आहे. त्या त्यांनाही साधना आणि ग्रंथ यांविषयी माहिती सांगून ग्रंथांचे वितरणही करतात. काकूंची ‘सनातन प्रभात’च्या अनेक वाचकांशी जवळीक आहे. वाचकांनाही त्यांच्याप्रती आदर वाटतो.
२ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव : प्रत्येक प्रसंगाला सामोरे जातांना ‘गुरुदेव माझ्या सोबत आहेत’, अशी त्यांची श्रद्धा आहे. काकूंनी स्वयंपाकघरात गुरुदेवांचे छायाचित्र ठेवले आहे. त्या साधनेचा आढावा लिहिलेली वही गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर धरतात. तेव्हा प्रत्यक्ष ‘गुरुदेवांना मी माझ्या साधनेचा आढावा दाखवत आहे’, असा त्यांचा भाव असतो. त्या प्रत्येक प्रसंगात गुरुदेवांचा धावा करतात.
(सर्व सूत्रांचा दिनांक २७.३.२०२२)