विधवा धर्म : वास्तव आणि पुरोगामी कल्पना
गोवा राज्यातील धारगळ आणि कोरगाव या ग्रामपंचायती, तसेच महाराष्ट्रातील हेरवाड (कोल्हापूर) आणि हुंबरट (सिंधुदुर्ग) या ग्रामपंचायतींनी नुकताच एक ठराव संमत केला, तो विधवा धर्माच्या विरोधात ! या ग्रामपंचायतींचे म्हणणे आहे की, पतीच्या निधनानंतर पत्नीच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे, धार्मिक कार्यक्रमांमध्ये तिला प्रवेश नाकारणे यांसारखी बंधने ‘विधवा प्रथे’ने लादली होती. हे टाळून महिलांना एक ‘व्यक्ती’ म्हणून त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी हा ठराव संमत केला आहे.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ‘विधवा प्रथा’ बंद करण्याचा आदेश दिला आहे, तसेच याविषयी ग्रामपंचायतींना परिपत्रक पाठवून ‘त्याची कार्यवाही करावी’, अशा सूचना केल्या आहेत. स्त्रीवादी आणि पुरोगामी संघटना, तसेच अन्यही काही जण यांनी याला पाठिंबा देत ‘विधवा प्रथे’च्या विरोधात कायदा करावा’, अशी मागणी सरकारकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर याविषयी नेमका दृष्टीकोन कसा असावा ? हे येथे देत आहोत.
१. पतीला अधोगती मिळू नये; म्हणून विधवा धर्म पाळण्यास सांगणारा हिंदु धर्म !
मनुस्मृतीत म्हटले आहे की, पातिव्रत्य धर्म टिकून रहाण्यासाठी विधवा स्त्रीने आमरण सहनशील, संयमी आणि ब्रह्मचारी व्रताने रहाणे, हेच उत्तम आहे. पतीला अधोगती मिळू नये; म्हणून विधवा धर्म पाळण्याविषयी सांगण्यात आले आहे.
विवाहाच्या वेळी सौभाग्याचे प्रतीक म्हणून मंगळसूत्र, जोडवी आदी अलंकार घातले जातात, तर स्त्रीच्या कपाळावरील कुंकू हेही तिच्या सौभाग्याचेच प्रतीक असते. अलंकार घालतांना किंवा कुंकू लावतांना स्त्रीला साहजिकच तिच्या पतीचे स्मरण होत असते. अलंकार हा स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. पतीच्या निधनानंतर पत्नीला अलंकार घालतांना त्याचे स्मरण होऊ शकते. ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित असतात’, असा अध्यात्मातील सिद्धांत आहे. पतीच्या मृत्यूत्तर प्रवासात यामुळे अडथळा येऊ शकतो. तो टाळण्यासाठी शास्त्राने केलेली ही सोयच आहे.
२. विधवा धर्म विरोधात कायद्याची आवश्यकता काय ?
२ अ. समस्येला बगल देऊन समाजसुधारकांकडून धर्मशास्त्राला विरोधासाठी विरोध : जन्म-मृत्यू-विवाह हे प्रारब्धानुसार होतात. एखादी महिला विधवा होणे, यात तिचा काहीच दोष नसतो. सध्या महिलांच्या दृष्टीने सामाजिक वातावरण असुरक्षित आहे. एकट्या महिलेवर ४ जणांच्या वाईट नजरा असतात. अशा वेळी महिलांना सौभाग्य अलंकारांमध्ये सुरक्षित वाटते; म्हणूनही काही महिला पतीनिधनानंतरही नाईलाजाने ते घालतात. त्यामुळे अलंकार घालणे, हा महिलांच्या असुरक्षिततेवरील ठोस उपाय असू शकत नाही. कथित सुधारक मूळ समस्येवर उपाय म्हणून महिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी प्रयत्न करतात का ? या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे. यावरून मूळ समस्येला बगल देऊन केवळ धर्मशास्त्राला विरोधासाठी विरोध करण्यापेक्षा महिलांच्या खऱ्या समस्या समजून घेतल्या, तर त्यांच्यासाठी सुयोग्य उपाययोजना काढता येईल. खरे पहाता ‘अलंकार घाला’, असे सांगून हे सुधारक महिलांना त्यांच्या वैधव्याची अधिकच जाणीव करून देत आहेत.
२ आ. विधवा धर्माचे पालन चुकीचे, असे म्हणणे योग्य आहे का ? :03 सध्याच्या २१ व्या शतकातील हिंदु महिला पुष्कळ स्वतंत्र आहेत. घर आणि नोकरी अथवा कार्यालयीन काम आदी दोन्ही कार्य त्या उत्तमरित्या सांभाळतात. सासरी किंवा माहेरची मंडळीही त्यांना त्यात साथ देतात. विधवा महिलांनाही सध्याच्या समाजाने स्वीकारलेले आहे. पतीनिधनानंतर पत्नी सौभाग्यालंकारांचा त्याग करते. तिच्यावर कुणीही बळजोरी करतांना दिसत नाही. पतीनिधनानंतर तिने सौभाग्य अलंकार घालण्यावर फारसा कुणाचा आक्षेपही नसतो. त्यामुळे त्यांची विटंबना होण्याचे प्रकार नगण्य आहेत.
समजा सौभाग्यालंकार काढतांना कुणाकडून चूक झाली; म्हणून विधवाधर्माचे पालन करणे चुकीचे असे म्हणणे योग्य होईल का ? एखाद्या स्त्रीला सौभाग्य अलंकार काढण्याची इच्छा नसेल, तर तिला वाळीत टाकले जात नाही किंवा तिच्यावर अन्याय केला जात नाही. मुळात आधुनिक भारतात विधवा धर्माचे पालन केल्यामुळे घोर अन्याय झाल्याच्या घटना आहेतच किती ? त्यासाठी कायदा केला, तर ज्यांना पतीच्या निधनानंतर धर्मपालन करायचे आहे; त्यांच्यावर हा अन्याय होणार नाही का ?
३. हिंदु धर्माचा मानवतावादी दृष्टीकोन
खरे पहाता हिंदूंनी धर्माने दिलेला मानवतावादी दृष्टीकोन समजून घ्यायला हवा; कारण धर्माचरणी व्यक्ती कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत शांत अन् समाधानी जीवन जगू शकते. जिजाबाई आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनीही धर्मपालन केलेच. पतीनिधनानंतर त्यांनी सती जाण्याची सिद्धता केली होती; परंतु स्वराज्याप्रती कर्तव्यपालनासाठी सती गेल्या नसल्या, तरी त्यांनी विधवा धर्माचे पूर्णतः पालन केलेच; परंतु विधवा असल्यामुळे त्यांचे शौर्य किंवा साहसी व्यक्तीमत्त्व जराही झाकोळले गेले नाही.
४. विधवा प्रथेच्या विरोधामागील नास्तिकता आणि धर्मांतराचा संबंध
अत्यल्प स्त्रियांसाठी सुधारणावादी गदारोळ करून रान उठवतात. विधवा धर्माला विरोध करणारे आधुनिकतावादी हेच खरे तर नास्तिक आहेत. याचा लाभ ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी घेतला. सध्याच्या आधुनिक सुधारणावादी महिला स्वतः कुंकू, बांगड्या आदी अलंकार घालत नाहीत. स्वतः अलंकार न घालणाऱ्या महिला ‘विधवांचे अलंकार काढू नका’, असे म्हणतात. या विधानाला ‘ख्रिस्ती धर्माचा वास येतो’, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. धर्मांतराचे अमाप प्रकार उघडकीस येत असलेल्या गोवा राज्यात तरी या म्हणण्याला कुणी नाकारू शकत नाही.
५. विधवा धर्म पाळणे अथवा न पाळणे, हे प्रत्येकाचे धर्मस्वातंत्र्य !
हिंदु धर्मात जेवढी मोकळीक आहेत, तेवढी अन्य कुठल्या पंथाने दिली आहे ? तलाक, हलाल या प्रथांच्या विरोधात सरकारने कायदा बनवल्यावर ‘त्यांच्या धर्मस्वातंत्र्यावर, व्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने आणू नका’, असे म्हणणारे हेच ते पुरोगामी ! काही वर्षांपूर्वी गोवा राज्यात झालेल्या ‘सनबर्न’च्या कार्यक्रमात एक युवती अमली पदार्थांच्या अतीसेवनाने मृत्यूमुखी पडली. तिला न्याय मिळावा, यासाठी कोणती पुरोगामी किंवा महिला संघटना पुढे आली ? मात्र आता विधवांवर न होणाऱ्या अत्याचारांच्या किंवा एखाद-दोन घटनांना लगेच डोक्यावर उचलून घेतले जाते.
धर्माने मनुष्याला ईश्वरप्राप्ती करण्यासाठी योग्य आणि अयोग्य काय ? दोन्ही सांगितले आहे. मनुष्याने त्याचे पालन केले, तर त्याला लाभच होतो; परंतु एखाद्याने पालन केले नाही; म्हणून धर्म त्याला दंडित करत नाही. धर्माने मनुष्याला तसे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे विधवा धर्म पाळावा अथवा पाळू नये, याचा निर्णय एखाद्या ग्रामपंचायतीने किंवा सरकारने घेऊन काय उपयोग ? भारतीय राज्यघटनेने धर्मस्वातंत्र्य स्वीकारलेले आहे. त्यामुळे विधवा धर्माचे पालन करण्याचे प्रत्येकाचे वैयक्तिक मत ठरेल.
– सौ. प्रीती आनंद जाखोटिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.६.२०२२)