आदर्श उपायुक्त कीर्ती जल्ली !
भारतीय प्रशासकीय सेवेतील महिला अधिकारी उपायुक्त सौ. कीर्ती जल्ली (आय.ए.एस्.) यांनी कछार जिल्ह्यात (आसाम) जलप्रलयात केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सेवाभाव, अत्यंत साधी रहाणी आणि समर्पण वृत्ती यांमुळे त्यांनी पूरग्रस्तांची मने जिंकली ! गेल्याच आठवड्यात स्वत:च्या अधिकारांचा अपलाभ उठवत देहली येथील क्रीडा मैदानात स्वत:च्या कुत्र्याला फिरवण्यासाठी मैदानातून खेळाडू आणि नागरिक यांना बाहेर काढणारे प्रशासकीय सेवेतील संजीव खिरवार अन् त्यांची पत्नी रिंकू धुग्गा यांचे उदाहरण समोर असतांना कीर्ती जल्ली यांनी लोकांना केलेले साहाय्य सर्वांसाठी आदर्श आहे.
मूळच्या भाग्यनगर येथील आणि वर्ष २०१३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत भरती झालेल्या सौ. कीर्ती जल्ली या कोरोनाकाळात विवाह झाल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी कामावर उपस्थित होत्या. या उदाहरणातूनच त्यांची ध्येयनिष्ठा दिसून येते. जानेवारी २०१९ मध्ये त्यांनी कछार जिल्ह्यात उपायुक्तपद स्वीकारले. तेव्हापासून त्या आसाम येथील खेडोपाडी असलेल्या सामान्यजनांना न्याय देण्यासाठी झपाटून काम करत आहेत. अनेकदा पूर आल्यानंतर अधिकारी तेथील परिस्थितीची पहाणी करण्यासाठी प्रत्यक्ष गेलेले दिसतात अन्यथा कार्यालयात बसूनच बैठका घेतात. इथे मात्र कीर्ती या केवळ पहाणी करून थांबल्या नाहीत, तर चिखल असलेल्या रस्त्यांवरून, जिथे रस्ता पाण्याखाली जातो तिथे नावेतून जाऊन लोकांना धीर दिला. प्रत्येक ठिकाणी त्या पोचल्या. कीर्ती यांची अत्यंत साधी रहाणी लोकांना आपलेसे करून गेली. अनेक गरीब लोकांनी ‘गेल्या ५० वर्षांत आमच्याकडे अशा प्रकारे पुराच्या काळात कुणीही आले नव्हते. या अधिकारी वाटत नसून आमच्यातीलच एक आहेत’, असे अभिप्राय व्यक्त केले.
प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार असतात. हे अधिकार जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी वापरतांना जनतेतीलच एक होऊन वापरल्यास त्याची फलनिष्पत्ती अधिक असते. महिला या नात्याने अत्यंत संवेदनशीलतेने पदाचा कारभार कसा पहायचा ? याचा आदर्श वस्तूपाठच कीर्ती यांनी कृतीतून दाखवून दिला. महिला आहेत; म्हणून कुठेही सवलत न घेता उलट आदर्श कृती कशी असावी ? हे दाखवून देणाऱ्या कीर्ती जल्ली यांचा आदर्श अन्य प्रशासकीय अधिकारी घेतील का ?
– श्री. अजय केळकर, कोल्हापूर