प्रेमळ आणि साधकांना साधनेत साहाय्य करणाऱ्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सुश्री (कु.) कविता राठीवडेकर (वय ४३ वर्षे) !
ज्येष्ठ शुक्ल तृतीया (२.६.२०२२) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणाऱ्या सुश्री (कु.) कविता राठीवडेकर यांचा ४३ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सुश्री (कु.) कविता राठीवडेकर यांना ४३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. नम्रता
‘कु. कविताताई सर्वांशी नम्रतेने बोलते. ती कधी कुणावर रागावली किंवा चिडली, असे मी पाहिले नाही. तिच्या आवाजात चढ-उतार नसतो. ती कठीण प्रसंगही शांतपणे आणि नम्रतेने बोलून हाताळते.
२. प्रेमभाव आणि इतरांचा विचार करणे
ताई सेवा करत असतांना कुणी बालसाधक आले, तर ती त्यांच्याशी प्रेमाने बोलते. तिची सेवा चालू असतांना तिला कुणी काही विचारले, तरीही ‘इतरांचा वेळ वाया जाऊ नये’, यासाठी ती समोरच्याला लगेच प्रतिसाद देते.
३. साधकांना साधनेत साहाय्य करणे
वर्ष २००६ मध्ये मी मुल्की (कर्नाटक) सेवाकेंद्रातून रामनाथी आश्रमात सेवेसाठी आलो. मला साधकसंख्या अल्प असलेल्या सेवाकेंद्रात रहायची सवय होती. त्यामुळे रामनाथी आश्रमात आल्यावर माझ्या मनाचा संघर्ष झाला. त्या वेळी मी ताईशी याविषयी बोलल्यावर माझ्या मनातील नकारात्मक विचार न्यून होऊन माझा उत्साह वाढला.
४. व्यष्टी साधनेचे गांभीर्य
ताई सेवेत पुष्कळ व्यस्त असते, तरीही ती नियमितपणे नामजपादी उपाय पूर्ण करते. अनेक वेळा ती रात्री ध्यानमंदिरात बसून नामजप करते. ताई नेहमी म्हणते, ‘‘माझी व्यष्टी साधना होत नाही.’’ त्याची खंत तिच्या तोंडवळ्यावर दिसते.
‘हे गुरुदेवा, ‘तुमचे स्थुलातून दर्शन झाले नाही, तरीही तुम्ही साधना शिकवून घडवलेले गुणी साधक माझ्या समवेत आहेत. अशा साधकांमुळे ‘तुम्ही माझ्या समवेत सतत आहात’, याची मला जाणीव असते’, त्याबद्दल तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
श्री. प्रथमेश अच्युत खांडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. सहजता
कविताताईचे वागणे आणि बोलणे सहज अन् नैसर्गिक आहे. तिच्या वागण्यात कधीच कृत्रिमता किंवा दिखाऊपणा नसतो.
२. साधकांचे बोलणे शांतपणे ऐकून त्यांच्या साधनेतील अडचणीवर उपाय सुचवणे
एखादा साधक ताईशी बोलायला आल्यावर ती शांतपणे त्यांचे बोलणे ऐकून घेते आणि नंतर त्यांच्या साधनेतील अडचणीवर उपाय सुचवते. ताईमधील या गुणामुळेच साधकांना स्वतःची अडचण ताईला मोकळेपणाने सांगता येते आणि तिचा आधार वाटतो.
३. ताईला शारीरिक त्रास असतांनाही ती ‘आश्रमाच्या परिसरातील स्वच्छता करणे, अल्पाहार बनवणे’, अशा सेवा सवलत न घेता करते.
४. मनात पूर्वग्रह न ठेवता साधकांना हाताळणे
एकदा एका साधकातील स्वभावदोषांमुळे अन्य साधकांना अडचणी येत होत्या. तेव्हा ताईने त्या साधकातील कौशल्य लक्षात घेऊन एका विशेष प्रसंगी त्याला एका सेवेत लक्ष घालायला सांगितले होते. तेव्हा ‘कुठलाही पूर्वग्रह मनात न ठेवता साधकांना कसे जोडून ठेवायचे ?’, हे तिच्याकडून शिकायला मिळाले.
५. ताईने पूर्णवेळ साधना करत असल्याचा लाभ होण्यासाठी ‘सतत आध्यात्मिक स्तरावर रहाणे आणि भावप्रयत्नांत वाढ करणे’, या गोष्टींचे महत्त्व माझ्या लक्षात आणून दिले.
६. प्रत्येक क्षणी साधना होण्यासाठी प्रयत्नरत असणे
मला वाटले, ‘जसे व्यावहारिक मनुष्य स्वतःजवळील प्रत्येक पैशाची काळजी घेतो, तो ‘कुठे अनावश्यक व्यय होणार नाही’, याकडे कटाक्ष ठेवतो, त्याप्रमाणे ताई प्रत्येक क्षणी साधना होण्यासाठी प्रयत्नरत आहे आणि ‘साधना व्यय होणार नाही’, याची ती दक्षता बाळगते.’
७. अनुभूती – ताईच्या वाढदिवसाच्या दिवशी साधक तिची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना नकारात्मक मनःस्थितीत पालट होऊन मन आनंदी होणे
१४.६.२०२१ या दिवशी साधकांनी कविताताईचा वाढदिवस साजरा झाला. त्या वेळी साधक ताईची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे सांगत होते. साधकांचे बोलणे ऐकून माझ्या आधी असलेल्या नकारात्मक मनःस्थितीत पालट झाला आणि माझे मन आनंदी झाले.
– (सर्व सूत्रांचा दिनांक १७.६.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |