‘नॅशनल हेराल्ड’ भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांची ‘ईडी’कडून चौकशी होणार !

डावीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी

नवी देहली – ‘नॅशनल हेराल्ड’ म्हणून गाजलेल्या २ सहस्र कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना समन्स बजावले. सोनिया गांधी यांना ८ जूनला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

 

(म्हणे) ‘हा कटाचा एक भाग असून आम्ही झुकणार नाही !’ – काँग्रेस

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, ‘‘ईडी’ने ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. आम्ही घाबरणार नाही आणि झुकणारही नाही.’’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला आहे की, यापूर्वी ‘ईडी’ने हे प्रकरण बंद केले होते. भाजप राजकीय विरोधकांना धमकावण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी अन्वेषण यंत्रणांचा वापर करत आहे. (ऊठसूठ कुणीही उठतो आणि अन्वेषण यंत्रणांना ‘बाहुले’ म्हणतो. अशांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)

काय आहे ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरण ?

‘नॅशनल हेराल्ड’ नावाचे दैनिक माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी चालू केले होते. ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ नावाचे आस्थापन त्याचे प्रकाशक होते. वर्ष २००८ मध्ये दैनिकावर ९० कोटी रुपयांचे कर्ज झाल्याने ते बंद करण्यात आले. पुढे वर्ष २०१० मध्ये ‘यंग इंडिया लिमिटेड’ नावाचे आस्थापन स्थापन करण्यात आले. त्यामध्ये गांधी माता-पुत्राचे ७६ टक्के समभाग होते, तर उर्वरित २४ टक्के हे अन्य काँग्रेसी नेत्यांकडे होते. ‘यंग इंडिया लिमिटेड’ने केवळ ५० लाख रुपये देऊन ९० कोटी रुपये कर्ज असलेल्या ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ला विकत घेतले.

वर्ष २०१२ मध्ये भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, तसेच पत्रकार सुमन दुबे आणि काँग्रेसचे अन्य एक नेते सॅम पित्रोदा यांच्यावर या प्रकरणी आरोप केले. ‘यंग इंडिया लिमिटेड’ने संशयास्पद पद्धतीने ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ला विकत घेतले. या माध्यमातून काँग्रेस नेत्यांना २ सहस्र कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता मिळाली, असा आरोपही स्वामी यांनी केला होता. या प्रकरणाचे अन्वेषण ‘ईडी’ने वर्ष २०१४ मध्ये चालू केला.

दुसरीकडे ‘यंग इंडिया लिमिटेड’चा उद्देश नफा कमावणे नसून ती ‘समाजकार्या’साठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असलेल्या आणि देशभरात जनाधार गमावत चाललेल्या काँग्रेसची राजकीय मृत्यूघंटा जवळ आली असल्याचेच हे द्योतक नव्हे का ?