कलाक्षेत्रातील गुरुजनांनो, ‘कलांची निर्मिती ईश्वरप्राप्तीसाठीच झाली आहे’, हे जाणून त्या दृष्टीने स्वतः साधना करा आणि विद्यार्थ्यांनाही त्याविषयी शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करा !
गायन, वादन, नृत्य, चित्रकला, मूर्तीकला इत्यादी विविध कलांची निर्मिती ईश्वरप्राप्तीसाठीच झाली आहे. पूर्वी या कलांचा उपयोग ती शिकवणारे गुरुजन आणि शिकणारे विद्यार्थी ईश्वराच्या आराधनेसाठी करत असत. संत सूरदास, संत मीराबाई, चैतन्य महाप्रभु, असे अनेक संत कलेच्या माध्यमातून ईश्वराला आर्ततेने साद घालत असल्याची आणि भगवंतही त्यांच्या आराधनेने प्रसन्न झाल्याची नोंद आपल्या प्राचीन इतिहासात आहे.
पूर्वी गुरु स्वतः साधना करणारे असल्यामुळे त्यांचे शिष्यही त्यांच्या तोडीचे (साधनेचे बळ असणारे) निर्माण होत असत. याचे उदाहरण म्हणजे, स्वामी हरिदास ! हे स्वतः संतस्थितीला असून श्रीकृष्णाचे परम भक्त होते. त्यांनी त्यांच्या तानसेन आणि बैजू बावरा या शिष्यांना गायनकला शिकवली, तसेच त्या कलेतील आध्यात्मिक सामर्थ्य अनुभवण्यास शिकवले. त्यामुळेच ‘तानसेनच्या गायनाने दिवे लागणे, पाऊस पडणे’; तर बैजू बावरा यांच्या गायनाने दगड वितळणे, अशा घटना त्या काळी घडू शकल्या. यासाठी आध्यात्मिक (साधनेचे) बळ असणे महत्त्वाचे आहे.
त्या तुलनेत ‘आजकालचे बहुतांश गुरुजन कला केवळ बौद्धिक स्तरावर आणि व्यावसायिकदृष्ट्या शिकवतात’, असे लक्षात येते. आजकाल ‘संगीतातील प्रत्येक स्वरातून, नृत्यातील विविध लालित्यपूर्ण हालचालींतून, एखाद्या चित्रातील विविध भागांतून आध्यात्मिक अनुभूती कशी घेऊ शकतो ?’, हे शिकवणारे गुरुजन, तसेच ते शिकण्याची इच्छा असणारेही दुर्मिळच आहेत. त्यामुळे ‘व्यासपिठावर कलेचे सादरीकरण करणे आणि त्या माध्यमातून प्रसिद्धी अन् पैसा मिळवणे, हेच ध्येय असते’, एवढेच विद्यार्थ्याला ठाऊक असते. प्राचीन काळी कलेच्या शिक्षणासह नैतिकता, संस्कार यांसह ‘ईर्ष्या, मत्सर इत्यादी षड्रिपूंमुळे कला पूर्णत्वाला जाणे कसे अशक्य आहे ?’, ‘अहंविरहित कलाच ईश्वरचरणी रुजू होते. तीच आपल्याला खरा आनंद मिळवून देते’, हे सर्व शिकवण्याचे दायित्वही गुरूंचे असायचे.
आजकाल या भौतिक सुखाच्या पलीकडे, म्हणजे कलेतून ईश्वराला अनुभवण्याचे शिक्षण किंवा त्याविषयी आस्थाही बहुतांश गुरूंना नसते. त्यामुळे ते या संदर्भात त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवतच नाहीत. अंततः या सर्व कलांमध्ये असलेले आध्यात्मिक सामर्थ्य, तसेच ‘त्या कलांतून ईश्वराला कसे अनुभवायचे ?’, हे समजण्यापासून विद्यार्थी वंचित रहातो.
‘गुरुजनांनो, ‘कलेतील ईश्वरी तत्त्व अनुभवणे’, हेच कलानिर्मितीचे मूळ ध्येय आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कला केवळ मानसिक, बौद्धिक आणि व्यावसायिक दृष्टीकोनांतून न शिकवता ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ म्हणून शिकवा. आपणही साधना करून कलेतील ईश्वराला अनुभवा, तसेच आपल्या विद्यार्थ्यांनाही त्याचे शिक्षण देऊन त्यांचा उद्धार करा.’
– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, संगीत विशारद), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.२.२०२२)