काशी विश्वेश्वराचा पुरातन इतिहास आणि मोगलांनी मंदिरावर केलेले आक्रमण
गेल्या काही मासांपासून काशी विश्वनाथ आणि ज्ञानवापी मशीद यांचे नाव चर्चेत आहे. वाराणसीत असलेल्या मूळ काशी विश्वेश्वराची ही जागा मोगल काळात बाटवली गेली आणि मंदिर पडून मशीद झाली, असे हे प्रकरण आहे. अर्थात् या प्रकरणाशी महाराष्ट्राचा संबंध पुष्कळ जवळचा आहे, हे बऱ्याच मराठीजनांना ठाऊकही नसेल. म्हणूनच ज्ञानवापीचे प्रकरण काय आहे, ते थोडक्यात पाहू. १ जून या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘स्कंद पुराणात आणि सम्राट गुप्त कालखंडात काशीचा उल्लेख आढळणे, चिनी प्रवासी ह्युएन त्संग यांनी केलेल्या नोंदींमध्ये विश्वेश्वराच्या मंदिराचा उल्लेख आढळणे, महंमद घोरीचा सेनापती कुतुबुद्दीन ऐबक याने काशी विश्वेश्वरावर पहिल्यांदा आक्रमण करणे आणि प्रकांड मराठी धर्मपंडित नारायण भट्ट यांनी काशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा उभारणे’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज त्याचा अंतिम भाग येथे देत आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/584311.html
६. ब्रिटीश यात्रेकरू पीटर मंडी यांनी त्यांच्या पुस्तकात काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा सचित्र वर्णनासह उल्लेख करणे
पीटर मंडी नावाचे एक ब्रिटीश यात्रेकरू १७ व्या शतकात भारतात आले होते. त्या वेळी त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये काशी विश्वेश्वराविषयी नोंद केली आहे. ४ सप्टेंबर १६३२ या दिवशी पीटर मंडी वाराणसीत पोचले. त्यांनी वाराणसीविषयी लिहिले आहे; पण खास करून ते काशी विश्वेश्वराच्या मंदिराविषयी लिहिले आहे. ते म्हणतात, ‘वाराणसीत अनेक मंदिरे आहेत; पण त्यातील मुख्य मंदिराला ‘काशी विश्व’ म्हणतात, जे महादेवाचे मंदिर आहे. मी त्या मंदिरात गेलो. त्याच्या मध्यभागी एक दगड असून त्याचा आकार काहीसा (मध्यभागी फुगीर असलेल्या आणि बाजूंनी गोलाकार पसरलेल्या) ‘हॅट’सारखा होता. हा दगड खडबडीत, काहीसा धातूंनी वेष्टित असून त्यावर लोक गंगेच्या पाण्याची, फुलांची, तांदुळाची आणि लोण्याची वगैरे वृष्टी करत होते. या सगळ्यांचे एक जणू काही मिश्रण होऊन ते (दगडावरून) ओघळत होते. यासमवेतच असलेले ब्राह्मण काहीतरी अगम्य भाषेत वाचत आणि बोलत होते. या साऱ्याच्या वर एक किनखापीचा तंबू (रेशमी कापडावर उठावदार पद्धतीने सोन्या-चांदीच्या धाग्यांनी केलेले सुंदर विणकाम) उभारलेला असून तिथेच अनेक दिवे लावलेले होते.’ हे वर्णन वाचतांना मंडी यांनी तत्कालीन काशी विश्वेश्वराचे रेखाचित्रसुद्धा काढलेले असून ते पाहिल्यास त्याचा अंदाज येईल.
७. औरंगजेबाने मंदिरे पाडण्याचे फर्मान सोडणे आणि काशी विश्वेश्वराच्या पुजाऱ्यांना त्याविषयी कळताच त्यांनी मंदिरातील शिवलिंग विहिरीत सोडणे
पंडित नारायण भट्ट यांनी उभारलेले हे काशी विश्वेश्वराचे मंदिरही जेमतेम १२५ वर्षे उभे होते; कारण मोगल सत्ता कळसाला पोचली असतांनाच औरंगजेबाचे धर्मवेड अचानक उफाळून आले आणि त्याने जणू काही हिंदुस्थानातील मंदिरे जमीनदोस्त करण्याचा सपाटाच लावला. औरंगजेबाने कर्णावती (अहमदाबाद)मधील चिंतामणीच्या देवालयात गायीची कत्तल करून मंदिर बाटवले आणि त्या मंदिराचे रूपांतर एका मशिदीत केले. नंतर त्याने त्या प्रांतातील सारी मंदिरे पाडली. आपल्या कारकीर्दीच्या प्रारंभीच्या १०-१२ वर्षांत त्याने ओडिशा प्रांतातील बांधलेली एकूण एक मंदिरे पाडण्याचा हुकूम सोडला होता.
‘मासिर-ए-अलामगिरी’ या पुस्तकात स्पष्ट नमूद केले आहे की, (९ एप्रिल १६६९ या दिवशी) औरंगजेबाने एक फतवा काढला, ‘काफिरांची सर्व देवालये पाडण्यात यावीत आणि त्यांच्या धार्मिक चालीरिती अन् शिकवणूक यांवर दडपशाहीचा वरवंटा फिरवण्यात यावा.’ या हुकमांची कार्यवाही तत्परतेने चालू झाली. पुढच्या ४ मासांतच काशी विश्वेश्वरावर गाझी चालून गेले आणि ऑगस्ट १६६९ मध्ये ते भंगले. मंदिरावर गाझी चालून येणार, याची कुणकुण मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यांना आधीच लागल्याने त्यांनी विश्वेश्वराचे शिवलिंग मंदिरातून आधीच बाहेर काढून शेजारीच असलेल्या विहिरीत सोडले.
८. औरंगजेबाच्या काळात काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या अवशेषांचा उपयोग करून उभारण्यात आली ज्ञानवापी मशीद !
याच सुमारास काशीतील बिंदुमाधव, मथुरेतील केशवराय वगैरे इतर मंदिरेही धर्मवेड्या गाझींच्या आक्रमणाला बळी पडली. औरंगजेबाची ही सगळी फर्माने आणि फतवे ‘द रिलिजिअस पॉलिसी ऑफ द मुघल एम्पेरर्स’ या श्रीराम शर्मा यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहेत. आपल्याकडे जेधे शकावलीत उल्लेख आहे. एकंदरीत औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचे मंदिर पाडले. पुढे हे मंदिर पूर्ण नष्ट करण्याऐवजी त्याच्या उरल्यासुरल्या भागाचा उपयोग करून तिथे मशीद उभारण्यात आली, ज्या मंदिराचे अवशेष आजही पहायला मिळतात. विश्वेश्वराचे शिवलिंग हे शेजारच्याच विहिरीत होते. ही विहीर म्हणजे जणू काही गंगेचाच एक झरा होता आणि ती ज्ञानाची विहीर, म्हणजेच ज्ञानवापी !
९. काशी विश्वेश्वर मुक्त करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असणे
काशी विश्वेश्वर मुक्त करण्याची छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा नक्कीच असणार; पण ती थेट कुठेही नमूद केलेली आढळली नाही. असे असले, तरी शिवछत्रपतींच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य असलेल्या आणि पुढच्या काळात औरंगजेबाला त्राही करून सोडणारे मुत्सद्दी रामचंद्रपंत अमात्य यांनी कोल्हापूरकर छत्रपती संभाजीराजांसाठी एक ग्रंथ निर्माण केला. सर्वसाधारणपणे त्याला ‘आज्ञापत्र’ म्हटले जाते. या आज्ञापत्रात अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरून महाराजांची इच्छाही ‘काशी विश्वेश्वर मुक्त करण्याची असावी’, असे स्पष्ट दिसते.
१०. पेशव्यांच्या कार्यकाळात काशी विश्वेश्वराच्या पुनर्स्थापनेविषयीचा उल्लेख आढळणे
थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या काळातही काशी विश्वेश्वराची पुनर्स्थापना करण्याविषयीचा स्पष्ट उल्लेख आहे. थोरले बाजीराव गेल्यावर चिमाजी अप्पा यांनी एका पत्रात म्हटले, ‘रायाचीही बुध रयत प्रतिपाळणास पूर्ण, देवब्राह्मणांची स्थापना करून, काश्यादिक महास्थळी विश्वेश्वराच्या जीर्णोद्धार करावयास निरत होऊन त्याच मार्गेकरून रयत नांदवली. विश्वेश्वराचे स्थापना करावी, हे आर्त होतीच.’ बाजीरावांचा पुत्र म्हणजेच थोरले नानासाहेब पेशवे. नानासाहेबांच्या इतर पत्रांमधून सतत काशी आपल्याकडे यावी, हेच राजकारण दिसून येते.
इ.स. १७४२ मध्ये नानासाहेबांनी काशी जिंकून घेण्यासाठी पावले उचलली होती. यासंबंधी पेशवे शकावलीत इत्यंभूत वर्णन केले आहे. आणखी एका उल्लेखानुसार नानासाहेबांनी मल्हारराव होळकर यांना काशी घ्यायला पाठवले होते. होळकरांच्या कागदपत्रांमध्ये यासंबंधी उल्लेख आढळतो. यानंतरच्या काळात माधवराव पेशवे यांनी मृत्यूसमयी ९ कलमी यादी केली होती. त्यात ‘काशी आणि प्रयाग ही स्थळे सरकारात यावी, असा तीर्थरूपांचा (नानासाहेबांचा) हेतू होता’, असे म्हटले आहे. थोडक्यात माधवरावांच्या आयुष्यातही त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही.
११. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी काशी विश्वेश्वराची नव्याने स्थापना करणे आणि नाना फडणवीस यांनी महादजी शिंदे यांना काशीसह मथुरा, वृंदावन कह्यात घेण्याविषयी कळवणे
नानासाहेब पेशवे आणि मल्हारराव होळकर यांचे हे स्वप्न पुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अंशतः पूर्ण केले. त्यांनी काशी विश्वेश्वराचे मंदिर पुन्हा नव्याने ज्ञानवापी आणि मशिदीला लागून दक्षिणेला बांधले. इथे नव्या शिवलिंगाची स्थापना करण्यात आल्याचे दिसते. पुढे इ.स. १७८९ मध्ये नाना फडणवीसांनी महादजी शिंदे यांना कळवले होते, ‘श्री काशीत विश्वेश्वराचे देवालय सहस्र वर्षांचे असल्याचे सर्वांस ठाऊक आहे. त्यास अलीकडे पातशाहीत कुणी काय समजावून मशीद केली. त्यास विश्वेश्वराचे स्थळ मोकळे होऊन, पूर्ववत् देवालय आणि देवस्थापना व्हावी, हे हिंदु धर्मास योग्य आहे. मथुरा, वृंदावन ही स्थळेही सरकारात असावीत’; पण दुर्दैवाने पुढे यावर फारशा हालचाली झाल्या नाहीत.
१२. काशी विश्वेश्वराची एकदा नव्हे, तर तीनदा झालेली मशीद म्हणजेच ज्ञानवापी मशीद !
अहिल्यादेवी यांनी काशीत अनेक धार्मिक कामे केली. ज्यात मणिकर्णिका घाट, दशाश्वमेध घाट वगैरे घाटांचे पुनर्निर्माण, गंगामूर्ती आणि इतर लहान मंदिरे, धर्मशाळा, चौथरे वगैरे बांधण्यात आले. थोरल्या बाजीरावांच्या काळात वर्ष १७३५ पासून काशीत घाट बांधण्याचा प्रारंभ झाला. तिथपासून प्रारंभ होऊन अहिल्यादेवी यांच्या कारकीर्दीपर्यंत ही धार्मिक कार्ये मराठ्यांच्या हातून मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. एकंदरीत अशी आहे, मूळ काशीतील मूळ विश्वेश्वराची एकदा नव्हे, तर तीनदा झालेली मशीद म्हणजेच शेजारच्याच ‘ज्ञानवापी’ची गोष्ट !
(समाप्त)
– कौस्तुभ कस्तुरे (साभार : फेसबूक)