आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग १७)
१. जीवन सुखी करण्यात स्थानदेवतांचे असणारे महत्त्व !
१ अ. ऑगस्ट २०२० मध्ये भयंकर वादळ येणार असल्याचा निरोप मिळणे आणि सहकाऱ्यांना स्थानदेवतेच्या मंदिरात जाऊन शरण जाऊन प्रार्थना करण्यास सांगणे : आपले जीवन सुखी करण्यात स्थानदेवतांचे अत्यंत महत्त्व असते. मुंबईमधील आमचे एक साधक महानगरपालिकेत नोकरी करतात. ऑगस्ट २०२० मध्ये एके दिवशी त्यांनी आम्हाला निरोप पाठवला, ‘‘भयंकर वादळ येणार आहे.’’ मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यास किंवा वादळ झाल्यास अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे आम्ही काही आस्तिक लोक प्रतीवर्षी पुरोहितांकडून अनुष्ठान करवून घेतो. या वेळी काही जण म्हणाले, ‘‘आम्हाला वादळाच्या घोषणेमुळे भीती वाटत आहे. अनुष्ठान वगैरे केल्यास आमचे वरिष्ठ अधिकारी आणि समाज आम्हालाच दूषणे देतो. अशा वेळी आम्ही काय करावे ?’’ मी म्हटले, ‘‘आता जानेवारी २०२४ पर्यंत निसर्गाचा प्रकोप तीव्र असणार आहे. हे समष्टी पापामुळे होत आहे. त्यामुळे आपण काही विशेष करू शकत नाही. केवळ आपली साधना वाढवून त्याची तीव्रता सहन करू शकतो. तुम्ही आणि तुमचे सहकारी यांनी स्थानदेवतेच्या मंदिरात जाऊन शरण जाऊन प्रार्थना करावी.’’
१ आ. स्थानदेवतेला प्रार्थना केल्यामुळे चक्रीवादळाचा परिणाम न झाल्याची अनुभूती येणे : काही दिवसांनी त्यांनी सांगितले, ‘‘आम्ही स्थानदेवतेच्या मंदिरात जाऊन प्रार्थना केली. चक्रीवादळ तर आले; परंतु मुंबईमध्ये आम्ही जेथे कार्यरत होतो, तेथे त्याचा काहीच परिणाम झाला नाही.’’ यालाच म्हणतात, ‘प्रत्यक्षे किं प्रमाणम् ।’ (अर्थ : जे समोर दिसत आहे, त्यासाठी पुराव्याची काय आवश्यकता आहे ?)
२. धार्मिकता जोपासल्यासच नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचे रक्षण होणार असणे
जर एकत्र येऊन स्थानदेवतेला प्रार्थना केल्यावर अनुभूती येऊ शकते, तर महानगरातील सर्वांनीच असे केल्यास नैसर्गिक आपत्तींची तीव्रता न्यून होणार नाही का ? आपत्ती या देवतेपेक्षा अधिक शक्तीशाली असतात का ? महानगरांमध्ये अधर्मी आणि निधर्मी यांची संख्या अधिक असल्याने असे प्रकोप पुढील ४ वर्षे वारंवार येत रहातील; पण त्यातही धार्मिकता जोपासली, तर आपले संरक्षण होऊ शकते.
३. महर्षींची महती !
स्थानदेवता, ग्रामदेवता आणि वास्तूदेवता यांच्याविषयीचे उपासनाशास्त्र आपल्या महर्षींनी ‘असेच काहीतरी’ म्हणून सांगितलेले नसून त्यामागे गूढ ज्ञान दडलेले आहे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (२६.३.२०२२)
हिंदु धर्मातील विविध आचारांमागील शास्त्र सांगणारी सनातनची ग्रंथमालिका उपलब्ध आहे !