कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना पंतप्रधानांच्या ऑनलाईन उपस्थितीत महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप !
पंतप्रधानांकडून आयुष्याच्या दृष्टीने मार्गदर्शन
ठाणे, ३१ मे (वार्ता.) – कोरोनामुळे पालक गमावलेल्या ठाणे जिल्ह्यातील ४३ बालकांसह देशभरातील अनाथ बालकांना ‘पी.एम्. केअर्स फॉर चिल्ड्रेन’ या योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत ३१ मे या दिवशी महत्त्वाच्या कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील या ३० बालकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला. या वेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बालकांना आरोग्य विमा कार्ड, टपाल विभागात ठेवलेल्या रकमेचे पासबूक आणि पंतप्रधानांचे पत्र आदी साहित्य दिले. ‘चांगले नागरिक होण्यासाठी शिक्षणाची कास धरा, समाज आपल्या समवेत आहे. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही आहोत’, असा अनमोल दिलासाही त्यांनी या वेळी बालकांना दिला.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पंतप्रधानांच्या या ऑनलाईन कार्यक्रमाला आमदार कुमार आयलानी, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, ‘स्माईल फाऊंडेशन’च्या उमा आहुजा आदी उपस्थित होते. ‘तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या समवेत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वत:वर विश्वास ठेवा. ‘फिट इंडिया आणि खेलो इंडिया’ अभियानाशी जोडले जा. योगासनांना जीवनात महत्त्वाचे स्थान द्या’, असा संदेश पंतप्रधानांनी या ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे बालकांना दिला.