तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी दोषींवर कारवाई करा ! – महंत इच्छागिरी, तुळजापूर
तुळजापूरसह पुणे येथेही ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !
तुळजापूर (जिल्हा धाराशिव), ३१ मे (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या कालावधीत सिंहासन दानपेटीच्या लिलावात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपिठात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. चौकशीचा अहवाल अपर मुख्य सचिव आणि राज्याचा गृह विभाग यांना सादर होऊन ५ वर्षे होत आली, तरी दोषींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणातील दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि हिंदूंची मंदिरे भ्रष्टाचारमुक्त व्हावीत, अशी मागणी सोमवारगिरी मठाचे मठाधिपती महंत इच्छागिरी महाराज यांनी केली. हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने श्री तुळजाभवानी मंदिराजवळील प्रशासकीय कार्यालयासमोर ३१ मे या दिवशी सकाळी ११ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. याच विषयावर पुणे येथेही आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर ‘सीआयडी’च्या अहवालानुसार त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले.
या वेळी हिंदु राष्ट्र जागृती आंदोलनात महंत व्यंकट अरण्य महाराज, श्री. नागेशशास्त्री आंबुलगे, ‘सावरकर विचार मंच’चे बाळासाहेब शामराज, पुजारी मंडळाचे संचालक आणि भाजप तालुका सरचिटणीस शिवाजी बोधले, विकास मलबा, गुलचंद व्यवहारे, ‘जनहित संघटने’चे अजय (भैया) साळुंके आणि प्रशांत सोंजी, अधिवक्ता गिरीश लोहारीकर, अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष अंबादास व्हरडे, ‘जाणता राजा युवा मंच’चे सुदर्शन वाघमारे, शिवसेना शहर प्रमुख सागर इंगळे, रिपब्लिकन पक्षाच्या रूपाली महादेव काळभोर (पुणे), बारामती येथील शेतकरी संघटनेचे प्रवक्ते अशोक महादेवराव खलाटे, बजरंग दलाचे शहराध्यक्ष दिनेश कापसे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांच्यासह भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
विशेष
१. गरीबनाथ मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांनी दूरभाष करून आंदोलनासाठी पाठिंबा असल्याचे सांगितले.
२. आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
३. दर्शनाला आलेले भाविक, भक्त आणि यात्रेकरू यांनी निवेदनावर स्वाक्षरी करून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
४. श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आलेली एक महिला तिच्या लहान बाळाला घेऊन आंदोलनात सहभागी झाली होती.
राजकीय पक्षांच्या साटेलोटामुळे नवरात्रीमध्ये आलेल्या निधीचे लेखापरीक्षण होत नाही ! – प्रताप कुलकर्णी, तुळजापूर देवस्थानचे पुजारी
पुणे – तुळजापूर देवस्थानात नवरात्रीच्या काळात आलेल्या निधीचे लेखापरीक्षण होत नाही. विविध राजकीय पक्षांचे साटेलोटे आहे, त्यामुळेच आर्थिक अपव्यवहार होत आहेत; मात्र याविषयी कोठे वाच्यता केल्यास धमक्याही दिल्या जातात. मंदिरात पैसे भरून दर्शन सुविधा चालू केली आहे; मात्र त्यांचे दर वाढवले आहेत. निधीच्या नोंदी होत नाहीत. देवस्थानची विविध ठिकाणी ६०० एकर भूमी आहे; पण त्याचा ठावठिकाणा लागत नाही, अशी वस्तूस्थिती तुळजापूर देवस्थानचे पुजारी श्री. प्रताप कुलकर्णी यांनी विषद केली. हिंदुत्वनिष्ठांनी ३१ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथील झाशीची राणी लक्ष्मीबाई पुतळा, बालगंधर्व रंगमंदिराजवळ, डेक्कन येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ आंदोलन केले. त्या वेळी ते बोलत होते.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणार्या श्री तुळजाभवानी मंदिरात कोट्यवधींचा भ्रष्टाचार करणारे लिलावधारक आणि शासकीय अधिकारी यांच्यावर सीआयडीच्या अहवालानुसार त्वरित कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाला १३० हून अधिक धर्मप्रेमी, धर्माभिमानी आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. ‘सीआयडी अहवालातील दोषींवर त्वरित कारवाई करा’, ‘तुळजापूर मंदिरातील भ्रष्टाचार बंद करा’, ‘जय श्रीराम’, ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिंदुराष्ट्रम’ यांसारख्या वीरश्री निर्माण करणार्या घोषणा या वेळी सर्वांनी दिल्या.
या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदु विधीज्ञ परिषद आदी संघटना, तसेच तुळजापूर देवस्थानचे पुजारी श्री. प्रताप कुलकर्णी, प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोहन डोंगरे आणि अधिवक्ता नीलेश निढाळकर, अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंखे, सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी मान्यवर सहभागी झाले होते.
शासनाने सर्वांच्या भावना विचारात घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी ! – अधिवक्ता मोहन डोंगरे
हिंदु म्हणजे देश आणि धर्म यांसाठी निर्माण होणारी ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना जशी ताकद मिळाली त्याच प्रमाणे सर्व हिंदू संघटित झाल्यास मंदिरातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी सर्वांना ताकद मिळेल. हिंदूंच्या मंदिरांमध्ये भ्रष्टाचार होता कामा नये. तुळजाभवानी मंदिरातील दोषींवर कारवाई होण्यासाठी शासनाने ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ तयार करून ६ मासांच्या आत दोषींना कठोर शासन करावे, तसेच शासनाने सर्वांच्या भावना विचारात घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता मोहन डोंगरे यांनी या वेळी केली.
दानपेटीतील पैशांवर नजर ठेवून शासनाने मंदिरे कह्यात घेतली ! – अधिवक्ता नीलेश निढाळकर
भाविक मंदिरांमध्ये त्यांच्या कष्टाचा, घामाचा पैसा श्रद्धेने दान करतात; मात्र दानपेटीतील पैशांवर नजर ठेवून शासनाने हिंदूंची मंदिरे कह्यात घेतली आहेत. या पैशाचा उपयोग मदरसे आणि मुसलमान यांच्या कल्याणासाठी अन् भ्रष्ट अधिकार्यांना पोसण्यासाठी होत आहे. हे सर्व त्वरित थांबले पाहिजे, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून हडप केलेला पैसा पुन्हा मंदिरांना दिला पाहिजे, अशी मागणी अधिवक्ता नीलेश निढाळकर यांनी केली.
भ्रष्टाचारी अधिकार्यांना कठोरात कठोर शिक्षा हवी ! – अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंखे
देवस्थानात अनागोंदी कारभार होत आहे. त्यामुळे संबंधित भ्रष्टाचारी अधिकार्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्या (सौ.) सीमा साळुंखे यांनी व्यक्त केली.
सेक्युलरवादी शासन असल्याने दोषींना शिक्षा होत नाही ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
भारतातील प्राचीन मंदिरामुळे भारताला पूर्वी देवघर समजले जात होते; मात्र मंदिरांच्या सरकारीकरणामुळे याला तडा जात आहे. मंदिरांमध्ये असलेली शक्ती, शांतता, स्थिरता लोप पावत चाललेली आहे. भ्रष्टाचार वाढीस लागला आहे, तसेच दानपेटी लिलावात घोटाळे व्हायला प्रारंभ झाला आहे. तरीही गेली ३२ वर्षे या दोषींवर कारवाई झालेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असते, तर दोषींवर तात्काळ कारवाई झाली असती; मात्र आताचे सेक्युलरवादी शासन असल्याने दोषींना शिक्षा होतांना दिसत नाही, असे मत हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी व्यक्त केले. सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
शासकीय मंदिरातील भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट झाली पाहिजे ! – चैतन्य तागडे, सनातन संस्था
मंदिरे ही शक्तीचे स्रोत आहेत. भक्तांना तेथे शांतीची अनुभूती येते. परदेशी नागरिक मंदिरांचे पावित्र्य अनुभवण्यासाठी भारतात येतात; मात्र हिंदु मंदिरात जायला कचरत आहेत. हिंदूंची मंदिरे सुरक्षित रहाण्यासाठी सर्वांनी धर्माचरण करून संघटित शक्ती दाखवायला हवी; मात्र चैतन्याचा स्रोत असलेली ही मंदिरे शासकीय यंत्रणेच्या हाती आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरे शासकीय यंत्रणेकडून भक्तांच्या हाती यावीत, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
संपादकीय भूमिका
|