साधकांची प्रत्येक क्षणी काळजी घेणारे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे समष्टी रूप असलेले एस्.एस्.आर्.एफ .चे सद्गुरु सिरियाक वाले !
वर्ष २०१९ मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत एस्.एस्.आर्.एफ.चे सद्गुरु सिरियाक वाले प्रसारकार्यानिमित्त जर्मनी येथे आले होते. त्यांच्या समवेत सेवा करतांना मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. काटकसरी
सद्गुरु सिरियाक वाले स्वतःसमवेत आवश्यक तेवढेच साहित्य ठेवतात.
२. प्रीती
अ. ते नेहमी स्वयंपाक करणे, भांडी घासणे आणि स्वच्छता करणे अशा सेवा करण्यासाठी साधकांना साहाय्य करतात. ते साधकांना ‘आणखी काही साहाय्य हवे का ?’, असे विचारतात. एखाद्या ठिकाणी कचरा पडलेला दिसल्यास ते केरसुणीने तेथील जागा स्वच्छ करतात.
आ. आम्ही खाण्याचे पदार्थ आणायला बाहेर जात असल्यास ते मला माझ्यासाठी चॉकलेटस् किंवा एखादा आवडीचा पदार्थ घेण्यास सांगत. ‘आम्हाला व्यवस्थित खायला मिळेल’, याची ते नेहमी काळजी घेतात. आम्ही सेवेसाठी बाहेर जातांना ‘सँडविच’ नेणार असल्यास ते ‘सॅलड’ कापून त्यात घालतात.
इ. ते सकाळी लवकर उठून न्याहरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य घेऊन यायचे. ते सर्व साधकांच्या आवडीचा पाव आणतात.
ई. एकदा माझी पाठ दुखत असतांना त्यांनी मला त्यांचा ‘हिट बेल्ट’ (‘हिटिंग पॅड’, शरिराला शेक देणारा पट्टा) दिला आणि पाठीला लावायला मलमही दिले. नंतर त्यांनी माझी विचारपूसही केली. एका सेवेच्या वेळी मला आरामशीर बसता यावे, यासाठी त्यांनी मला उशी घ्यायला सांगितली.
उ. मला थकवा आल्यास ते मला विश्रांती घ्यायला सांगायचे. माझी सेवा राहिली असल्यास त्यांना अन्य सेवा असतांनाही ते माझी सेवा पूर्ण करण्यास साहाय्य करायचे.
ऊ. एखाद्या साधकाला त्यांच्याशी काही बोलायचे असल्यास रात्री कितीही उशीर झालेला असो किंवा ते एखाद्या सेवेमध्ये व्यस्त असोत, ते त्या साधकाच्या मनातील सर्व शंका दूर होईपर्यंत त्याच्याशी बोलतात.
३. इतरांना समजून घेणे
अ. साधना किंवा सेवा यांतील एखादे सूत्र आम्हाला नीट समजले नसल्यास ते नेमकेपणाने आणि एखाद्याला सहज समजेल, असे उत्तर देतात.
आ. त्यांना साधकांच्या चुका लक्षात आल्यास ते साधकाच्या स्थितीनुसार आवश्यकता असेल, त्याप्रमाणे सांगतात. मला माझ्या चुका स्वीकारता येत नसतांना ते मला इतक्या चांगल्या प्रकारे माझ्या चुकांची जाणीव करून देत की, माझ्याकडून त्या स्वीकारल्या जात.
४. साधकांना प्रोत्साहन देणे
साधकाच्या घरी रहात असतांना सद्गुरु सिरियाकदादांच्या ‘तो साधक वेळेचा योग्य वापर करत नाही’, असे लक्षात आल्यास ते त्या साधकाला ‘कृतीच्या स्तरावर कसे प्रयत्न करू शकतो?’, याविषयी मार्गदर्शन करायचे. साधकात तसे पालट जाणवले, तर ते त्याचे कौतुक करून सर्व श्रेय साधकांच्या प्रयत्नांना देत. त्यामुळे साधकही आनंदी होत असत.
५. सद्गुरुपदावर आरूढ असूनही नामजपादी उपाय करणे
अ. सद्गुरुपदावर विराजमान असूनही नामजपादी उपायांच्या संदर्भात ते सतर्क असतात. ते नामजप करतांना न्यास करणे, सभोवती रिकामी खोकी लावणे, अत्तर आणि कापूर यांच्या मिश्रणाचे पाणी वापरणे आदी उपाय नियमित करतात.
आ. साधक नामजप करत असतांना ते साधकांच्या समवेत बसून नामजप करतात. ‘हे ते सर्व साधकांसाठी करतात’, असे मला वाटते.
इ. एकदा एक साधक नामजप करतांना न्यास करत नव्हता. तेव्हा त्यांनी त्या साधकाला न्यास करण्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि त्याला न्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले.
६. गुरुकार्याचा ध्यास
अ. त्यांना शारीरिक त्रास होत असतांनाही ते रात्री उशिरापर्यंत जागून सेवा करतात आणि सकाळी लवकर उठतात.
आ. ते स्वतःला होत असलेल्या शारीरिक त्रासाविषयी कधीच गाऱ्हाणे सांगत नाहीत. त्यांना कधी कधी इतक्या वेदना होतात की, त्यांना चालणे शक्य होत नाही, तरीही ते सेवा करतात आणि साधकांना वेळ देतात.
इ. सद्गुरु सिरियाकदादांना जर्मन भाषा कळत नसली, तरी व्याख्यान देतांना किंवा प्रसारात ‘जिज्ञासूंना एखादे सूत्र सांगितले ना ?’, याविषयी ते आम्हाला विचारून घ्यायचे. त्यातून आम्हाला ‘व्याख्याने कशी घ्यायची ? सूत्रे कशी सांगायची ?’, हे लक्षात यायचे. व्याख्यान झाल्यावर ते आम्हाला व्याख्यानाच्या वेळी ‘कसा विचार करायचा ? काय सांगायचे आणि काय सांगायचे नाही ?’, याविषयी सांगायचे.
७. अहंशून्यता
अ. त्यांच्या वागण्यात सहजता आहे. ते साधना न करणाऱ्या व्यक्तींमध्येही सहजतेने मिसळतात. ते आम्हाला सांगतात, ‘‘मला ‘सद्गुरु’ न म्हणता ‘सिरियाक’ म्हणा; कारण नवीन लोकांना ‘सद्गुरु म्हणजे काय ?’, हे कळणार नाही.’’
आ. त्यांनी एखाद्या ठिकाणी प्रवचन घेतल्यानंतर ‘मी व्यवस्थित बोललो ना ?’, असे ते सहसाधकांना आवर्जून विचारतात.
इ. ते साधकांना नेहमी सांगतात, ‘‘माझ्याकडूनही चुका होतात. तुम्हाला माझ्या काही चुका लक्षात आल्यास मला सांगा.’’
ई. ते कधी कधी ८ घंट्यांहून अधिक वेळ चारचाकी चालवायचे. तेव्हा त्यांना तीव्र शारीरिक वेदना होत असूनही ते ‘मी ठीक आहे’, असे म्हणत. इतका वेळ गाडी चालवत असतांनाही ते साधकांशी प्रेमाने बोलत. ते म्हणतात, ‘‘मी केवळ चारचाकी चालवतो. मला जर्मन भाषा येत नाही. त्यामुळे जर्मन भाषिक साधकच व्याख्याने घेतात आणि प्रदर्शनांत (‘फेअर्स’मध्ये) सहभागी होतात.’’ प्रत्यक्षात ते आमच्यापेक्षा अधिक सेवा करतात. ‘ते स्वतः काय करतात’, याविषयी ते कधीच बोलत नाहीत.
८. भाव
साधकांच्या घरी असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रतिमेसमोर उभे राहून सद्गुरु दादा अनेक वेळा प्रार्थना करतात. ते स्वतःच्या पटलावर श्रीकृष्णाची लहान प्रतिमा ठेवतात.
९. अनुभूती
मला प्रसारकार्यानिमित्त सद्गुरु सिरियाकदादांच्या सत्संगात रहाण्याची संधी मिळाली. त्या वेळी ‘ते परात्पर गुरु डॉक्टरांचे समष्टी रूप आहेत आणि ते सर्वत्र अध्यात्मप्रसारासाठी भ्रमण करत आहेत’, असे मला वाटले. ते जेथे जातात, तेथे त्यांच्या केवळ उपस्थितीमुळे साधकांमध्ये पालट होत आहेत. ‘ऑनलाईन’ सत्संगांत साधकांची उपस्थिती वाढली आहे. जर्मनीमधील सर्व साधकांचा साधना करण्याचा उत्साह वाढला असून त्यांचे साधनेचे प्रयत्नही वाढले आहेत.
आम्हाला सद्गुरु सिरियाकदादांसारखे संत दिल्यामुळे आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता !
– सौ. लवनिता डूर् (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), ऑस्ट्रिया (२०.१०.२०१९)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |