गर्भवतीचा छुपा शत्रू : गर्भारपणातील मधुमेह !
१. गर्भारपणात मधुमेह होण्याच्या प्रमाणात वाढ होणे
‘पुणे येथे नुकत्याच झालेल्या स्त्रीरोग आणि प्रसूतीतज्ञ यांच्या परिषदेत गर्भारपणातील मधुमेहाच्या (‘गेस्टीशनल डायबिटीज मेलिटस’) वेगाने वाढणाऱ्या रुग्णांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. पूर्वी या प्रकारचा मधुमेह केवळ उच्चभ्रू समाजातील स्त्रियांमध्ये आढळून येत होता; पण आता तो सर्व स्तरातील स्त्रियांमध्ये आढळून येत आहे. पुण्यातील ससूनसारख्या रुग्णालयातही अशा गर्भवती स्त्रिया मोठ्या प्रमाणात येतात. वेळेत योग्य उपचार न मिळाल्यामुळे बाळ अन् आई दोघेही विविध गुंतागुंतीच्या समस्यांना बळी पडत आहेत.
२. गर्भारपणात मधुमेह होण्याची कारणे
अ. गर्भारपणात मधुमेह होण्यामागे अर्थात्च व्यायामाचा अभाव, अन्नपदार्थांची भरपूर रेलचेल आणि आरोग्याविषयीची अनास्था ही प्रमुख कारणे आहेत.
आ. भारतियांमध्ये गेल्या काही वर्षांत लठ्ठपणाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आहारातील कर्बोदके पुष्कळ अधिक, तर प्रथिने अल्प झाली आहेत. खाण्यावर संयम न राहिल्यामुळे जगात सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात दिसून येत आहेत.
इ. आधुनिक संशोधनानुसार गर्भधारणा होतांना आणि झाल्यावर स्त्रीचे कुपोषण होत असल्यास गर्भावर त्याचे विपरीत परिणाम होतात. पोषक आहार मिळत नसल्याने कुपोषण होते, तसे अधिक वजन असलेल्या स्त्रीचेही कुपोषण होते. हे परिणाम तिच्या जनुकीय रचनेवर झाल्यामुळे बाळालाही मोठे झाल्यावर मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता अधिक असते.
३. गर्भवतीला मधुमेह झाल्याचे निदान कसे करतात ?
गर्भारपणातील मधुमेहाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे गर्भधारणा रहाण्याच्या आधीच असलेला मधुमेह आणि दुसरा प्रकार, म्हणजे साधारण ७ व्या मासात होणारा मधुमेह (गेस्टीशनल डायबेटीज). बहुतेक दुसरा प्रकार अधिक प्रमाणात आढळून येतो. प्रत्येक गर्भवतीची ७ व्या मासात ‘जीटीटी’ नावाची चाचणी करण्यात येते. त्यात ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊन २ घंट्यांनी तिची साखर पडताळली जाते. ती १४० mmol/lit हून अल्प येणे अपेक्षित असते. ७५ ग्रॅम ग्लुकोज देऊनही ज्या स्त्रियांची साखर १४० हून अल्प येते, त्यांचे शरीर ग्लुकोजचे व्यवस्थित विघटन करू शकते, असा त्याचा अर्थ आहे. ज्या स्त्रियांचे शरीर हे करू शकत नाही, त्यांची साखर वाढते आणि मग मधुमेहाचे निदान केले जाते.
४. मधुमेह झाल्यावर गर्भवती स्त्रियांनी घ्यावयाची काळजी
साखरेचे प्रमाण १४० हून अधिक वाढल्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. भात, बटाटा, साखर, मैदा अशी कर्बोदके आहारातून वगळली आणि प्रतिदिन एक घंटा चालण्याचा व्यायाम चालू केला, तर साखर नियंत्रणात येऊ शकते. गर्भारपणात उपाशीपोटी म्हणजे ‘fasting bsl ९०’ च्या खाली आणि जेवणानंतर ‘ppbsl १२०’ च्या खाली असावी लागते. गर्भारपणात स्त्रीच्या शरिरात स्रवणारे सगळेच हार्मोन्स तिची साखर वाढवण्याचे काम करतात. एरव्ही हे बाळाच्या पोषणासाठी आवश्यक असते; पण मधुमेही गर्भवतीच्या शरिरातील चयापचय सदोष असल्यामुळे तिची साखर प्रमाणाबाहेर वाढत जाते.
५. गर्भवती स्त्रियांमध्ये साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे होणारे परिणाम !
अ. आईची साखर वाढल्यामुळे त्याचे बाळावर हळूहळू विपरित परिणाम होऊ लागतात. बाळाचे वजन अनियंत्रित वाढू लागते, बाळाभोवतीचे पाणी (liquor) झपाट्याने वाढू लागते. बाळामध्ये हृदय, किडनी, मेंदू, पाठीचा कणा, पचनसंस्था यातील विकृती, दुभंगलेले टाळू, ओठ अशी विविध व्यंगे निर्माण होऊ शकतात. अशी बाळे वजन अधिक असूनही प्रकृतीने अतिशय नाजूक होतात. जन्मानंतर त्यांना साखर अल्प होणे आणि कावीळ यांसारख्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते.
आ. गर्भारपणातील मधुमेहामुळे बाळाचे वजन वाढते, तसेच प्रसूतीच्या कळा सहन करण्याची शक्ती पुष्कळ अल्प होते. त्यामुळे ‘सिझेरियन’ची शक्यता वाढते. सामान्य बाळंतपण झाल्यास बाळाचे डोके किंवा खांदे अडकून बसल्याने मोठा धोका उद्भवू शकतो.
इ. मधुमेह अनुवंशिकही असू शकतो. ज्या स्त्रियांना गर्भारपणात मधुमेह होतो, त्यांना नंतरच्या आयुष्यात मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते. तसेच वयात आल्यानंतर ‘पीसीओडी’ असणाऱ्या मुलींमध्ये त्याचे प्रमाण अधिक आढळते.
हा विषय पुष्कळ मोठा; पण अत्यंत महत्त्वाचा आहे. हे तुमच्या लक्षात आले असेलच ! (यावरील उपाय आणि उपचार यांविषयीची सविस्तर माहिती पुढील लेखात पाहूया.)
– डॉ. शिल्पा चिटणीस जोशी, स्त्रीरोग आणि वंध्यत्वतज्ञ, कोथरूड, पुणे.