जुने गोवे येथे ‘इन्क्विझिशन हाऊस’ कुठे गाडले आहे, याचा हिंदूंनी छडा लावावा ! – जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ
‘हिंदु रक्षा महाआघाडी’च्या वतीने म्हापसा येथे ‘गोवा फाइल्स’ प्रदर्शन
म्हापसा (गोवा) – गोमंतकियांनी आता गोव्याचा सत्य इतिहास जाणून घ्यायला पाहिजे. जुने गोवे येथे ‘इन्क्विझिशन हाऊस’ (धर्मच्छळाचे ठिकाण) कुठे गाडले गेले आहे, याचा छडा लावला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशा वास्तूंना आज ‘संरक्षित वास्तू’ म्हणून घोषित केले जात आहे. जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ पूर्णपणे दुर्लक्षित आहे. हिंदु जनजागृती समिती आणि इतर हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या आंदोलनानंतर ‘हातकातरो खांब’ हा आता निदान उभा तरी आहे. या स्थानाला एखाद्या वाहनाची धडक लागल्यास खांब कोलमडू शकतो. या वास्तूचे संरक्षण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी यांनी केले. ‘हिंदू रक्षा महाआघाडी’च्या वतीने खोर्ली, म्हापसा येथील श्री सातेरी मंदिर सभागृहात श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने चालू करण्यात आलेल्या अभियानाच्या अंतर्गत ‘गोवा फाइल्स’चे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी शिवसेनेच्या गोवा विभागाचे माजी प्रमुख श्री. रमेश नाईक, सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी ‘गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, ‘इन्क्विझिशन’चा इतिहास शालेय पाठ्यपुस्तकात समावेश करावा, पाद्री डॉम्निक यांच्याविषयीच्या सर्व सूत्रांची चौकशी करावी, ‘हातकातरो खांबा’चे संरक्षण करावे आणि त्याचा इतिहास त्या ठिकाणी लिहिण्यात यावा’, आदी महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शुभा सावंत यांनी केले.
श्री. रमेश नाईक या वेळी म्हणाले, ‘‘गोव्यात ३ डिसेंबर या दिवशी जुने गोवे येथे अनेक हिंदू ‘फेस्त’ला जात असतात. हिंदूंना इतिहासाची माहिती देऊन त्यांच्यातील स्वाभिमान जागृत करण्यासाठी ‘गोवा फाइल्स’सारख्या प्रदर्शनाची आज आवश्यकता आहे. ‘फायव्ह पिलर्स’ चर्चचा पाद्री डॉम्निक याने केलेल्या कुकृत्यांचे सर्व पुरावे गोळा करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.’’