भाजपच्या नुपूर शर्मा यांना अटक करण्यासाठी मुंब्रा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे रस्ता बंद आंदोलन !
ठाणे, ३१ मे (वार्ता.) – भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नुपूर शर्मा यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली मुंब्रा येथे निदर्शने करून दारूल फलाह मशिदीसमोर रस्ता बंद आंदोलन करण्यात आले. या वेळी पठाण यांनी प्रेषितांचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष कायदा करावा, तसेच नुपूर शर्मा यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी केली.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपूर शर्मा यांच्या विरोधात मुंबई, भिवंडी तसेच मुंब्रा येथे तक्रार प्रविष्ट करण्यात आले आहे. नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत केले होते. नुपूर शर्मा यांच्या विरोधात कलम भादंविच्या २९५ अ, १५३ अ आणि ५०५ ब अंतर्गत गुन्हा नोंद झालेला आहे, मात्र त्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना अटक करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.