मानसिक अतिक्रमण दूर करा !
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातून डोंगरी आणि तितुर नदी वहाते. गेल्या वर्षी पावसाळ्यात ७ वेळा पूर (पैकी २ वेळा महापूर) आला. त्याचा परिणाम शहरात पाणी घुसून जनजीवन विस्कळीत झाले आणि मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. शेकडो जनावरे वाहून गेली. याचा अभ्यास केल्यानंतर नदीलगतचे अतिक्रमण आणि नदीत साचलेला कचरा, गाळ यांमुळे हे घडले होते, असे लक्षात आले. यावर्षी मात्र पावसाळ्यापूर्वीच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, पालिका प्रशासन, सामाजिक संस्था आणि उद्योगपती यांच्या सहकार्याने ७ किलोमीटरचे नदीपात्र स्वच्छ करण्याची मोहीम २० एप्रिलपासून हाती घेतली आहे. यात पालिकेसह ‘मिशन ५०० कोटी लिटर जलसाठा टीम’, उद्योजक भोजराज पुंशी, नारायण अग्रवाल, ‘अखिल भारतीय जैन संघटना’, व्ही.एच्. पटेल समूह, चाळीसगाव सायकल ग्रुप यांचा सहभाग आहे. पोकलेन, जेसीबी यंत्र आणि त्यासाठी लागणारे डिझेल या संस्थांनी उपलब्ध करून दिले. आतापर्यंत नदीपात्रातून ९०० डंपर गाळ, कचरा काढला असून साडेचार किलोमीटर नदीपात्र आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पुलाखालील कचरा, दुसऱ्या टप्प्यात नदीपात्रातील गाळ आणि तिसऱ्या टप्प्यात नदीकाठावरील अतिक्रमण काढण्याचे नियोजन होते.
‘लोकसहभागातून जनहिताचे कार्य होऊ शकते’, हेच या सर्वांनी दाखवून दिले. आता नदीपात्र २ ते ३ मीटर खोल झाल्याने पुराचा धोकाही अल्प झाला आहे. मानवाने नैसर्गिक स्रोतांवर अतिक्रमण केल्यास काय घडते, हे येथील जनतेने अनुभवले. येथील संघटनांनी त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला; मात्र काही दिवसांतच विकृत आणि स्वार्थी मनोवृत्तीने डोके वर काढून पुन्हा या नदी पुलांवर जसेच्या तसे अतिक्रमण झाले आहे. यावर पालिका प्रशासनाने २०० हून अधिक दुकानचालक आणि रहिवासी यांना नोटिसा बजावल्या आहेत. ‘माझे नसतांना त्यावर अधिकार गाजवणे म्हणजे एक प्रकारचे मानसिक अतिक्रमणच’ आहे. हे मानसिक अतिक्रमण हटवण्यासाठीही कठोर शिक्षेची तरतूद करून पालिका प्रशासनाने कंबर कसायला हवी. निसर्गाच्या प्रकोपाला बऱ्याच अंशी मानवच उत्तरदायी आहे. हे सर्व चित्र पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे ! यात ‘स्व’चा नव्हे, तर ‘राष्ट्रा’चा विचार करणारी प्रजा असेल !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव