साधकांच्या माध्यमातून प्रीतीचा वर्षाव करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
१. रुग्णाईत असतांना साधकांनी घेतलेली काळजी
अ. एकदा मी आजारी होते. त्या वेळी आश्रमातील आधुनिक वैद्यांनी मला ॲलोपॅथी औषधे दिली. त्यानंतर वैद्यांनी मला आयुर्वेदीय औषधेही दिली. त्या औषधांच्या समवेत ‘ती औषधे कशी घ्यायची ?’, याची चिठ्ठीही होती.
आ. साधिका मला जेवण आणि अल्पाहार नियोजित वेळेत खोलीत आणून देत होत्या.
इ. ‘प्रत्येकाला होणाऱ्या आजारामागे प्रारब्ध आणि अनिष्ट शक्तींचा त्रास ही कारणे असतात’, हे लक्षात घेऊन साधकांनी मला प्रतिदिन नामजपादी उपाय सांगितले.
ई. ‘मी वेळेत औषधे घेत आहे ना ? मी नामजपादी उपाय करत आहे ना ? मला इतर काही अडचण नाही ना ?’, याविषयी साधक माझी विचारपूस करायचे.
२. रुग्णाईत असतांना साधक करत असलेली सेवा पाहून ‘परात्पर गुरुदेवांनी साधकांना एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्याची दिलेली शिकवण, हाच गुरुमंत्र आहे’, असे वाटणे
मी लिहिलेले हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. माझ्याप्रमाणे अनेक साधकांची अगणित प्रसंगांत परात्पर गुरुदेव साधकांच्या माध्यमातून काळजी घेत आहेत. साधकांचा इतर आजारी साधकांची काळजी घेतांना किंवा त्यांची सेवा करतांना ‘आजारी साधक म्हणजे गुरूंचे रूप आहे’, हा भाव असतो. गुरुदेवांनी या प्रेमानेच सनातन परिवाराची निर्मिती केली आहे. ‘परात्पर गुरुदेवांनी साधकांना एकमेकांवर निरपेक्ष प्रेम करण्याची दिलेली शिकवण हाच ‘गुरुमंत्र’ आहे’, असे मला वाटले. परात्पर गुरुदेवांचे वैशिष्ट्य म्हणजे यांसारख्या प्रसंगांत ते स्थूल रूपाने कोणत्याही साधकाला भेटत नाहीत, तरीही साधक एकमेकांची करत असलेली सेवा आणि त्यामागचे त्यांचे प्रेम रुग्णाईत साधकाला अन् त्याची सेवा करत असलेल्या साधकालाही परात्पर गुरुदेवांच्या निर्गुण रूपाची अनुभूती देते.
३. कृतज्ञता
‘परात्पर गुरुदेव, ‘आपण आमच्यावर करत असलेल्या प्रीतीला उपमा नाही आणि त्याविषयी मला शब्दांत लिहिता येणार नाही. प्रत्येक वेळी मला एकच जाणीव होते, ‘मी सनातन संस्थेत आले, ते केवळ आपण माझ्यावर केलेल्या प्रेमामुळे ! येथे राहिले, तेही केवळ आपण करत असलेल्या प्रेमामुळे !’ ‘आता आपणच मला इतरांवर निरपेक्ष प्रेम करण्यास शिकवा’, हीच आपल्या चरणकमली प्रार्थना आहे.
– कु. रूपाली कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.३.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |