साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणारे लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके !
लोटे (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके यांचा आज १.६.२०२२ या दिवशी ५० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी सहसाधकांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
श्री. महेंद्र चाळके यांना ५० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !
१. डॉ. (सौ.) गौरी दत्तात्रय याळगी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
१ अ. तत्त्वनिष्ठता : ‘श्री. महेंद्रदादा कधीही कुणाला भावनेच्या स्तरावर हाताळत नाहीत. गुरुकार्यासाठी आणि साधकांच्या साधनेसाठी ते तत्त्वनिष्ठपणे योग्य तेच सांगतात.
१ आ. आधार वाटणे : अडचणीच्या वेळी महेंद्रदादा भावाप्रमाणे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे रहातात. मी आजपर्यंत माझ्या अनेक अडचणी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले आहे. एकदा अडचणीच्या वेळी मी रात्री १०.३० वाजता त्यांना अगदी हक्काने भ्रमणभाष केला. तेव्हा त्यांनी माझ्याशी बोलून मला आधार दिला.
१ इ. अनुभूती : अनुमाने २ मासांपासून दादांचा आवाज ऐकल्यावर मला आध्यात्मिक लाभ होत आहेत’, असे मला जाणवते.’
२. सौ. आकांक्षा अनिल मांडवकर, लांजा, जिल्हा रत्नागिरी
‘दादा सेवेतील कोणत्याही समस्येवर सकारात्मक उपाययोजना सांगतात.’
३. श्री. मधुकर गुरव, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
३ अ. सत्संगाला प्राधान्य देणे : ‘मागील २६ वर्षांपासून मी महेंद्रदादांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो. आरंभी त्यांच्या घरी सत्संग असायचा. सत्संगाच्या माध्यमातून आरंभी त्यांच्या घरी जाणे-येणे व्हायचे. पूर्वी सत्संग सायंकाळी असायचे. त्या वेळी त्यांच्या घरी नेहमी हरिपाठ चालायचा. मी तेथे गेल्यावर ते हरिपाठ थांबवून सत्संगाला प्राधान्य द्यायचे.
३ आ. सेवेची तळमळ : पूर्वी आताच्या सारख्या दळणवळण आणि भ्रमणभाष यांच्या सुविधा नव्हत्या. दादांना सेवेविषयी निरोप दिल्यावर ते त्वरित सेवेसाठी यायचे. ते कसलीही सवलत न घेता सेवेसाठी नेहमी तत्पर असायचे आणि देहभान विसरून सेवा करायचे. दादांना सेवेविषयी आवड-निवड नसायची. कोणतीही सेवा असो, त्यासाठी त्यांची सिद्धता असायची आणि ते मनापासून सेवा करायचे.
३ इ. कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणे : आरंभी दादांनी त्यांच्या घरीच सत्संग चालू केल्याने त्यांचे दोन्ही लहान भाऊ श्री. सुरेंद्र आणि श्री. सचिन, तसेच त्यांच्या दोन्ही काकांची मुलेही साधना करू लागली. घरची आर्थिक स्थिती बेताची असतांनाही दादांनी त्यांचा लहान भाऊ श्री. सुरेंद्र याला पूर्णवेळ साधना करण्यास सांगितले.
३ ई. साधकांच्या वैयक्तिक कामातही साहाय्य करणे : मी जळगाव सेवाकेंद्रात सेवारत असतांना माझ्या मुलीचे लग्न ठरले होते. ‘लग्न धार्मिक पद्धतीनुसार व्हावे’, असे मला वाटत होते; पण मला लग्नाच्या नियोजनासाठी चिपळूणला जाता येत नव्हते. याविषयी मी महेंद्रदादांशी बोललो. त्यांनी स्वतः चिपळूणला येऊन साधकांच्या साहाय्याने लग्नासाठी सभागृह ठरवले आणि सभागृहाच्या मालकाला आमची परिस्थिती सांगून ‘अत्यल्प व्ययामध्ये धार्मिक पद्धतीने लग्न कसे करता येईल ?’, यासाठी प्रयत्न केले. ‘दादा आणि अन्य काही साधक यांनी स्वतःच्या घरचा लग्नसमारंभ आहे’, असा भाव ठेवून सर्व सेवा केली.’
४. सौ. माधवी चंद्रशेखर गुडेकर, देवरुख, रत्नागिरी.
अ. ‘महेंद्रदादा स्वतः अध्यात्म जगत आहेत आणि साधकांनाही अध्यात्म जगायला शिकवत आहेत’, असे मला वाटते.
आ. ‘सर्व साधकांची व्यष्टी आणि समष्टी साधना व्हावी’, अशी त्यांची तळमळ आहे.
इ. ‘त्यांची गुरुमाऊलींवर पुष्कळ श्रद्धा आहे’, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.’
५. सौ. वैभवी विजय पाध्ये, रत्नागिरी
५ अ. साधकांच्या साधनेची घडी बसवणे : ‘दादांनी साधकांच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेची घडी बसवण्यासाठी पुष्कळ परिश्रम घेतले. त्यांनी सकाळी नामसत्संग चालू करून सर्वांना पहाटे उठण्याची सवय लावली. त्यामुळे सर्वांच्या व्यष्टी साधनेची घडी बसू लागली.
५ आ. साधकांना साधनेत साहाय्य करणे : काही साधकांना नामसत्संगात बोलण्याची भीती वाटायची; पण दादा सांगायचे, ‘‘तुम्ही बोला. चुकले, तरी चालेल. सर्व आपलेच आहेत ना ?’’ अशा रितीने त्यांनी सर्वांना बोलायला लावून भावसत्संग घ्यायला उद्युक्त केले.’
६. श्री. महेश्वर वझे आणि सौ. मीनाक्षी महेश्वर वझे, कोतवडे, जिल्हा रत्नागिरी
‘आम्ही दादांना पूर्वी कधी बघितले नसूनही केवळ त्यांचा आवाज ऐकून आमची त्यांच्याशी जवळीक झाली, तसेच त्यांच्याविषयी एक अनामिक ओढ आम्हाला अनुभवायला मिळाली.’
७. श्री. विनोद गादीकर, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
अ. ‘दादा मारुतिरायांप्रमाणे दास्यभक्ती करतात’, असे लक्षात येते. दादा प्रत्येक सेवेच्या संदर्भात सद्गुरु सत्यवानदादांना (सद्गुरु सत्यवान कदम यांना) विचारतात आणि त्यांचे आज्ञापालन करतात.
आ. कितीही जागरण झाले, तरी ते सकाळी उठून नामजप करतात. जेव्हा ते शांत बसलेले असतात, तेव्हा ‘ते गुरुस्मरण करत नामजप करत आहेत आणि अनुसंधानात आहेत’, असे वाटते.’
८. सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई, राजापूर, जिल्हा रत्नागिरी.
८ अ. उत्साही आणि आनंदी : ‘दादांना मधुमेह असल्याने त्यांना खाण्याविषयी मर्यादा आहेत, तसेच त्यांना थकवाही असतो; तरीही ते नेहमी उत्साही आणि आनंदी असतात.
८ आ. प्रेमभाव : त्यांचा माझ्याशी फारसा संबंध नसतांनाही माझी चारचाकीची दुर्घटना झाली असतांना ते त्यांची प्रकृती बरी नसतांनाही मला भेटायला चिपळूणहून राजापूरला आले.’
९. डॉ. (सौ.) साधना ओंकार जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
९ अ. सकारात्मकता : ‘सेवा करतांना कितीही अडथळे आले, तरी दादा नेहमी सकारात्मक रहातात आणि सर्व साधकांना सकारात्मक दिशा देण्यासाठी प्रयत्नशील असतात.
९ आ. दादांच्या बोलण्याविषयी जाणवलेली सूत्रे
१. दादांचे बोलणे अतिशय शांत, गोड आणि नम्र असते.
२. महेंद्र जेव्हा एखादा सत्संग घेतात, तेव्हा ‘सर्व साधकांना ऐकतच रहावे’, असे वाटते.
३. ‘त्यांचे बोलणे अंतर्मनापर्यंत जात आहे आणि त्यांनी सांगितलेली भावार्चना आमच्या मनामध्ये भाव निर्माण करत आहे’, अशी जाणीव गेल्या काही दिवसांपासून मला होत आहे.
९ इ. जाणवलेले पालट
९ इ १. विचारून करणे : पूर्वी दादांमध्ये ‘मनाने करणे’ हा अहंचा पैलू होता. सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (सुश्री (कुमारी) स्वाती खाडये)) आणि सद्गुरु सत्यवानदादा (सद्गुरु सत्यवान कदम) यांनी दादांना त्याची जाणीव करून दिली. तेव्हापासून दादांनी अंतर्मुख होऊन चिकाटीने या अहंच्या पैलूवर मात केली. कोणतीही सेवा करतांना ते विचारूनच कृती करतात.
९ इ २. उतावीळपणा न्यून होणे : दादांना दिवसभरामध्ये साधकांचे, तसेच समाजातील जिज्ञासूंचे बरेच भ्रमणभाष येत असतात. पूर्वी त्यांच्यामध्ये ‘उतावीळपणे बोलणे, भरभर बोलणे’, हे स्वभावदोष प्रामुख्याने आढळायचे; परंतु दादांनी जाणीवपूर्वक आणि चिकाटीने या स्वभावदोषांवर मात करण्यासाठी प्रयत्न केले. आता दादा त्यांना येणारे सर्व भ्रमणभाष शांतपणे आणि परात्पर गुरुदेव यांचे स्मरण करत उचलतात.
९ इ ३. अभ्यासू वृत्तीत वाढ होणे : पूर्वी चिंतन म्हटले की, दादांना ताण यायचा; परंतु आता ते स्वतः प्रत्येक गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करूनच सत्संगामध्ये सूत्र मांडतात. त्यांच्यामध्ये अभ्यास करण्याची वृत्ती वाढली आहे. ‘त्यांनी मांडलेली सूत्रे देवाला अपेक्षित आणि आवडतील अशीच असतात’, असे जाणवते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १४.१०.२०२०)
देवा, महेंद्रदादांच्या रूपाने दिलास तू अनमोल ठेवा ।
साधकांच्या साधनेचे दायित्व घेऊनी ।
दादांनी आम्हा अज्ञानी जिवांना दिली दिशा ।। १ ।।
स्वतः तळमळीने करून प्रयत्नांची पराकाष्ठा ।
व्यष्टी आणि समष्टी परिपूर्ण करती सर्वदा ।। २ ।।
गुरुदेवांवरती ठेवूनी ठाम निष्ठा ।
‘परम पूज्य, परम पूज्य’ स्मरूनी नेती साधकां भावविश्वा ।। ३ ।।
अखंड धडपडती दुसऱ्यांचा विचार करण्या ।
अखंड तळमळती साधकां आनंद देण्या ।। ४ ।।
किती जरी कठीण प्रसंग असे सेवेत अन् जीवनात ।
रहाती सकारात्मक अन् उत्साहाने करती सर्वांवर मात ।। ५ ।।
किती वर्णावे अन् किती सांगावे ।
शब्दही अपुरे पडती स्थुलातूनी ।। ६ ।।
देवा, माझ्याही अंतरी वाहू दे भावभक्तीचा झरा ।
दादांच्या रूपाने दिलास तू अनमोल ठेवा ।। ७ ।।
– डॉ. (सौ.) साधना ओंकार जरळी, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (१२.१०.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |