साकीनाका (मुंबई) येथील बलात्कारप्रकरणी मोहन चौहान न्यायालयाकडून दोषी !
मुंबई – साकीनाका येथील ३० वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवले आहे. १ जून या दिवशी आरोपीच्या शिक्षेविषयी सुनावणी चालू होणार आहे. १० सप्टेंबर २०२१ च्या रात्री ३ वाजून २० मिनिटांनी खैरानी रोड येथे एका महिलेला मारहाण होत असल्याचे तेथील सुरक्षारक्षकाने पोलिसांना कळवले. पोलीस पोचले, तेव्हा महिला रक्तबंबाळ होऊन पडली होती. तिला त्वरित जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचाराच्या वेळी तिचा मृत्यू झाला. अत्याचाराच्या वेळी महिलेच्या गुप्तांगामध्ये लोखंडी सळी घुसवण्यात आली. या राक्षसी कृत्याच्या संतप्त प्रतिक्रिया समाजातून उमटल्या होत्या. मोहन चौहान हा दोषी असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले आहे.