शासनाने अनुदान न दिल्याने अनेक गावांतील पथदीपांची वीजजोडणी तोडली : रस्त्यांवर अंधार
शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास आंदोलन करण्याची भाजपची चेतावणी
कणकवली – गावागावांमध्ये रस्त्यावर बसवण्यात आलेल्या पथदीपांचे (स्ट्रीट लाईट) विजेचे देयक शासन देत असलेल्या अनुदानातून भरण्यात येत होते; मात्र २ वर्षांपूर्वीच्या थकीत देयकांची रक्कम शासनाने न दिल्याने वीज वितरण आस्थापनाने अनेक गावांतील पथदीपांची वीजजोडणी तोडली. त्यामुळे पथदीप बंद असल्याने गावागावांत रस्त्यावर अंधार असून जनतेची असुविधा होत आहे. याविषयी शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी पंचायत समितीचे माजी उपसभापती महेश गुरव यांनी दिली आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील पथदीपांची (स्ट्रीट लाईटची) देयके भरण्यासाठी तरतूद केली होती. त्यानुसार वीज वितरण आस्थापनाला रक्कमही वर्ग करण्यात आली होती; मात्र त्यानंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीने ग्रामपंचायतींना वार्यावर सोडले आहे. गेल्या २ वर्षांपासून शासनाने अनुदान न दिल्याने अनेक ग्रामपंचायतींची पथदीपांची देयके थकीत आहेत. राज्यशासनाने १४ व्या वित्त आयोगातून दिलेल्या रकमेचा आढावा घेण्याच्या दृष्टीने काही मासांपूर्वी माहितीही मागवली. त्यानुसार जिल्ह्याजिल्ह्यांतील माहिती शासनाला देण्यात आली; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. राज्यशासनाने जिल्हा परिषदांना अनुदान पाठवण्याचे घोषित केले; मात्र केवळ तुटपुंजी रक्कम पाठवण्यात आली. गेल्या २ वर्षांतील थकीत रकमेविषयी काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच वीज वितरण आस्थापनालाही राज्यशासनाने यासंबंधी काहीही कळवलेले नाही. यामुळे वीज वितरण आस्थापनाने विजेची जोडणी तोडण्याची कारवाई चालू केली आहे. शासनाच्या नियोजन शून्य आणि दायित्वशून्य कामामुळे आज गावोगावी रस्त्यावर अंधार पसरला आहे, असे गुरव यांनी सांगितले.