श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा आश्रमातील ‘चुकांच्या फलका’प्रतीचा भाव आणि त्यांनी चुकांच्या फलकाचे सांगितलेले महत्त्व !

सनातनच्या आश्रमांत ‘चुकांचे फलक’असतात. त्यावर साधक त्यांच्या प्रतिदिन होणाऱ्या चुका लिहितात. त्या चुका पुन्हा होऊ नयेत. यासाठी स्वतःला स्वयंसूचना देतात.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

१. साधनेत नवीन असतांना श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘फलक म्हणजेच आपला गुरु आहे आणि तो आपल्याला साधनेत पुढे नेणार’, या श्रद्धेने फलकावर नियमित चुका लिहिणे

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ म्हणाल्या, ‘‘मी साधनेत नवीन होते. तेव्हा या चुकांच्या फलकाला भावपूर्ण प्रार्थना करून त्याच्यावर नियमित चूक लिहायचे. चूक लिहितांना खडूची जी भुकटी खाली पडायची, ती भुकटी ‘गुरुचरणांची विभूती’ म्हणून माझ्या मस्तकावर लावायचे. ‘त्यातूनही मला चैतन्य मिळू दे’, अशी मी प्रार्थना करायचे. ‘फलक म्हणजेच आपला गुरु आहे आणि तो आपल्याला साधनेत पुढे नेणार’, या श्रद्धेने मी फलकावर चूक लिहीत असे.’’

२. श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी चुकांच्या फलकाचे सांगितलेले महत्त्व !

२ अ. साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी आणि त्यांच्या साधनेतील हानी टळावी; म्हणून अखंड दक्ष स्थितीत उभा असलेला ‘चुकांचा फलक’ हा भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून युगानुयुगे उभ्या असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणेच आहे ! : श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आश्रमातील चुकांच्या फलकाविषयी कृतज्ञताभावाने म्हणाल्या, ‘‘साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव व्हावी आणि त्यांच्या साधनेतील हानी टळावी; म्हणून अखंड दक्ष स्थितीत उभा असलेला ‘चुकांचा फलक’ हा भक्तांसाठी कमरेवर हात ठेवून युगानुयुगे उभ्या असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाप्रमाणेच आहे. त्या विठ्ठलाच्या चरणांवर आम्ही आमचे मस्तक ठेवतो आणि या चुकांच्या फलकाच्या चरणी आम्ही आमचे मन, बुद्धी आणि अहं अर्पण करतो. भक्त कसाही असला, तरी देव त्याच्याकडे येणाऱ्यांमध्ये दुजाभाव करत नाही, तसेच ‘फलकावर चूक कुणी लिहिली ? कोणत्या विचाराने लिहिली ?’, हे फलक पहात नाही. ‘साधकाने गुरूंचे आज्ञापालन केले’, यातच त्याला आनंद होतो. देव जसा आमच्या चुका पदरात घेतो, तसेच हा चुकांचा फलक आमचे स्वभावदोष आणि अहं समजून घेतो अन् आम्हाला साधनेत साहाय्य करतो.

२ आ. चुकांचा फलक म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला जगातील एकमेव कोरा; पण जीवनाचा गर्भितार्थ शिकवणारा दैवी ग्रंथ आहे ! : चूक झाल्यावर ती फलकावर त्वरित लिहिली, तर आपले पाप वाढत नाही. चूक फलकावर लिहिल्यामुळे गुरूंचे आज्ञापालन होते आणि आपल्या अहंचा लय होण्यास साहाय्य होते. स्वभावदोष आणि अहं विरहित अंतःकरणातच भगवंताचा वास असतो. भगवंताला आपल्या हृदयात येण्यास साहाय्यक ठरणाऱ्या या फलकाचे महत्त्व नक्कीच अनन्यसाधारण आहे. चुकांचा फलक म्हणजे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला जगातील एकमेव कोरा; पण जीवनाचा गर्भितार्थ शिकवणारा दैवी ग्रंथ आहे. या अद्भुत ग्रंथामध्ये अगोदर काहीच लिहिलेले नाही. जेव्हा साधक संपूर्ण श्रद्धेने या ग्रंथांतील पानांवर त्याचे विचार लिहील, तेव्हा तो दैवी चैतन्याने आणि साधकातील भावशक्तीने भरेल. हे साधनेतील विचार या फलकरूपी ग्रंथाचे वाचन करणाऱ्यांच्या विचारांना दिशा देतील.

२ इ. प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावणे आवश्यक ! : आश्रमातील चुकांच्या फलकाचे महत्त्व जेव्हा सर्वांना कळेल, तेव्हा घरोघरी देव्हाऱ्यात देव असतात, तसे प्रत्येकाच्या घरात साधनेत साहाय्य होण्यासाठी हा फलक लावलेला असेल आणि तेव्हा ‘समाजातही सर्वांनी साधनेला आरंभ केला’, असे खऱ्या अर्थाने म्हणता येईल !’’ (२९.४.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक