ज्ञानवापी प्रकरणी ४ जुलैला पुढील सुनावणी
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयात ज्ञानवापीच्या प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी मुसलमान पक्षाने प्रलंबित राहिलेले म्हणणे ३० मे या दिवशी मांडले. यानंतर न्यायालयाने ४ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. ४ जुलैला हिंदु पक्षाकडून बाजू मांडण्यात येईल. ३० मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी ‘हा खटला सुनावणी योग्य आहे कि नाही ?’ यावर युक्तीवाद करण्यात आला.
जलद गती न्यायालयातील सुनावणीही पुढे ढकलली
दिवाणी न्यायालयाच्या जलद गती न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवरही ३० मे या दिवशी सुनावणी झाली असता न्यायालयाने ४ जुलैपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. या याचिकेमध्ये ज्ञानवापी मशीद हिंदूंना सोपवण्याची मागणी करण्यात आली आहे.
अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीवर गुन्हा नोंदवा !
ज्ञानवापीच्या प्रकरणी विश्व वैदिक सनातन संघाकडून मुख्य न्यायदंडाधिकारांच्या विशेष न्यायालयात प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे. यात ज्ञानवापी मशिदीची देखरेख करणाऱ्या अंजुमन इंतजामिया मस्जिद कमिटीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. या कमिटीने ‘धार्मिक स्थळ कायदा १९९१’चे उल्लंघन करत असल्याचा यात आरोप करण्यात आला आहे.