राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिकांचे कामबंद आंदोलन !
अनेक शहरांतील रुग्णसेवेवर परिणाम !
नागपूर – वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील परिचारिकांच्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागा त्वरित भराव्यात आणि ही भरती कंत्राटी पद्धतीने करू नये, यांसह इतर मागण्यांसाठी राज्यातील २० सहस्रांहून अधिक परिचारिका गेल्या ३ दिवसांपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे राज्यातील शासकीय रुग्णालयांतील रुग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला आहे. परिचारिकांची सर्व कामे आधुनिक वैद्यांना करावी लागत आहेत.
‘‘रुग्णांच्या गैरसोयींविषयी आम्हालाही वाईट वाटते; पण आम्हीही माणसे आहोत. आमच्या मागण्या थेट सर्वसामान्यांच्या बाजूने आहेत. संपामुळे तातडीच्या शस्त्रकर्मांना खीळ बसला असून केवळ ‘सिझर’ पद्धतीने बाळंतपण होत आहे. अनेक शस्त्रकर्मे पुढे ढकलली असून आवश्यक नसेल, तर रुग्णांना सुटी दिली जात आहे’, असे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय शाखेच्या सचिव जुल्फी अली यांनी सांगितले. संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ४० परिचारिका आणि आरोग्यसेवक आंदोलनात सहभागी झाले आहेत.
मार्डने दिला पाठिंबा !
‘परिचारिकांच्या मागण्या न्याय्य आणि रास्त आहेत’, अशी भूमिका घेत आंदोलनाला महाराष्ट्र राज्य निवासी आधुनिक वैद्यांची राज्यव्यापी संघटना मार्डने पाठिंबा दिला आहे.
संपादकीय भूमिकापरिचारकांचे कामबंद आंदोलन रुग्णांच्या जिवावर बेतण्यापूर्वी तात्काळ तोडगा काढणे अपेक्षित ! |