स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सर्व पैलू समाजासमोर जाणीवपूर्वक येऊ दिले नाहीत ! – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप
एक दिवस सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात सावरकरांचे छायाचित्र लागणार असल्याचे सुतोवाच
ठाणे, ३० मे (वार्ता.) – वर्ष १९४२ मध्ये राजकारणाचे हिंदुकरण झाले पाहिजे. ‘हिंदूंनी राजकीयदृष्ट्या मते दिली पाहिजेत’, असा विचार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हिंदु महासभेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर मांडला होता. आता या विचाराला ८० वर्षे पूर्ण झाल्याने राजकारणाच्या हिंदुकरणाला उत्तरप्रदेशातून प्रारंभ झाला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांना पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत कलम ३७० हटवता आले नव्हते; मात्र आता राम मंदिर, कलम ३७०, सीएए, तीन तलाक अशी मालिका चालू झाली आहे. सावरकरांचे सर्व पैलू समाजासमोर जाणीवपूर्वक येऊ दिले नाहीत. उठसूट सावरकरांविरोधात बोलले जात होते; मात्र आता ते प्रमाण न्यून होत आहे. हळूहळू सावरकर समाजाला समजू लागले आहेत. एक दिवस नक्कीच सर्व राजकीय पक्षांच्या कार्यालयात सावरकरांचे छायाचित्र लागेल, असे उद्गार भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांनी ठाणे येथे काढले. सावरकरांच्या जयंतीनिमित्त ठाणे शहर भाजपच्या वतीने गडकरी रंगायतनमध्ये देवधर यांचे ‘सावरकरांचा राजकीय संघर्ष’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी प्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी स्वातंत्र्यवीरांच्या साहित्य सागराला वाहिलेले नम्र नृत्य ‘स्वातंत्र्यसूर्य’ हा कार्यक्रम सादर केला.
श्री. देवधर पुढे म्हणाले, ‘‘सावरकरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या विचारांवरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना हिंदुत्वाची शक्ती मिळाली. सावरकरांचेच कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करत आहेत.’’ आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ‘‘सावरकरांनी राष्ट्रप्रेम काय असते, ते जगाला दाखवून दिले. त्यांच्या कार्यातून पुढील अनेक दशके तरुण पिढीला प्रेरणा मिळेल.’’