नांदेड येथे माजी मंत्र्यांच्या बंगल्यात बनावट बंदुकीसह तरुणाने घातला गोंधळ !
१ जण घायाळ, तर तरुणाला अटक !
नांदेड – माजी मंत्री डी.पी. सावंत यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून आणि घरी काम करणाऱ्या पवार नावाच्या कामगाराला मारहाण करून गोंधळ घातल्याने शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी साहील माने (वय १८ वर्षे) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या हातातील बनावटी खेळण्याचे पिस्तुल जप्त केले आहे. ही घटना ३० मे या दिवशी सकाळी १० वाजता घडली.
हा तरुण सावंत यांच्या घरी येऊन म्हणू लागला, ‘‘माझी बीड येथे भूमी आहे. मला तुमचे साहाय्य हवे आहे.’’ सावंत यांनी त्याला काही वेळाने येण्यास सांगितले. तो दुपारी ४ वाजता त्यांच्याकडे आला आणि स्वतःवरील अन्याय पुन्हा सांगू लागला. त्या वेळी त्याने सावंत यांच्या घरातील कामगार पवार यांना मारहाण केली. यामध्ये पवार घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘वैद्यकीय चाचणी अहवाल आल्यावर माने याच्या विरोधात इतर कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले.