आतंकवाद्याची क्षमा मागणाऱ्या आसाममधील मंत्र्याला मुख्यमंत्र्यांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस !
आतंकवाद्याचा ‘माननीय’ असा उल्लेख
गौहत्ती (आसाम) – येथील ‘उल्फा’ या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेच्या एका आतंकवाद्याची क्षमा मागितल्याच्या प्रकरणी मंत्री संजोय किशन यांना मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवली. किशन यांनी १३ मे या दिवशी एका पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांना ‘बंदी घातलेल्या ‘उल्फा’ संघटनेचा स्वयंघाषित प्रमुख परेश बरूआ हा लबाड आहे’, अशा आशयाचे विधान केले होते. त्यावर ‘उल्फा’ने प्रसारमाध्यमांना ई-मेल पाठवून ‘किशन यांनी बिनशर्त क्षमा न मागितल्यास त्यांच्यावर दिबु्रगड, तसेच त्यांचा मूळ मतदारसंघ असलेला तिनसुकिया येथे बंदी घालू’, अशी धमकी दिली. यावर किशन यांनी १५ मे या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगितले, ‘‘मी नागाव जिल्ह्यातील एका शाळेत एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथे एका पत्रकाराने मला अचानक परेश वरूआ आणि ‘उल्फा’च्या कारवायांविषयी प्रश्न विचारला. त्या वेळी मी व्यस्त होतो. तथापि मी बरूआ यांना दुखावेल, असे काहीही बोललो नाही. मला विद्यार्थ्यांच्या आत्मनिर्भरतेविषयी बोलायचे होते, अन्य काही नाही. मी माननीय परेश बरूआ यांना दुखावले असेल, तर मीही दुखावलो आहे.’’
घटनात्मक शपथेचे उल्लंघन करणाऱ्या किशन यांच्यावर कारवाई करा ! – ‘पॅट्रियोटिक पीपल्स फोरम ऑफ आसाम’ची मागणी
याविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना ‘पॅट्रियोटिक पीपल्स फोरम ऑफ आसाम’चे नाबा ठकुरिया म्हणाले ‘‘किशन यांनी त्यांनी घेतलेल्या घटनात्मक शपथेचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बंदी घातलेल्या एका आतंकवादी संघटनेची क्षमा मागणाऱ्या किशन यांच्यावर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कठोर कारवाई केली पाहिजे.’’
संपादकीय भूमिकाज्यांनी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पावले उचललायला हवीत, तेच जर आतंकवाद्यांना ‘माननीय’ संबोधून त्यांची क्षमा मागत असतील, तर देशात आतंकवाद न फोफावल्यासच नवल ! अशांवरही कारवाई झाली पाहिजे ! |