सुदर्शनयागाच्या वेळी स्वर्गलोकातील देवतांनी सप्तर्षींच्या संमतीने सनातनच्या तिन्ही गुरूंच्या घेतलेल्या परीक्षेत तिन्ही गुरु उत्तीर्ण झाल्यामुळे श्रीविष्णूने पाठवलेले सुदर्शनचक्र तिन्ही गुरूंना प्राप्त होऊन त्यांनी ते धारण करणे !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षींनी नाडीपट्टीद्वारे १९.५.२०२२ ते २७.५.२०२२ या कालावधीत सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात विविध देवतांचे यज्ञ करण्यास सांगितले. १९.५.२०२२ या दिवशी आश्रमात झालेल्या सुदर्शनयागाच्या वेळी सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे येथे देत आहे.
१. सुदर्शनचक्राचे महत्त्व आणि देवतांनी सनातनच्या तिन्ही गुरूंची परीक्षा घेण्याचे ठरवणे
सुदर्शनचक्र हे पंचतत्त्वांतील मारक शक्तीचे (तेजतत्त्वाचे) प्रतीक आहे. सुदर्शनयागाच्या वेळी श्रीमहाविष्णूने त्यांचे अंशावतार परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या दोन्ही आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना देण्यासाठी सुदर्शनचक्र पृथ्वीकडे पाठवले. सुदर्शनचक्राच्या प्राप्तीमुळे तिन्ही आध्यात्मिक गुरूंना पंचमहाभूतांवर नियंत्रण प्राप्त करण्याची सिद्धी मिळणार होती.
२. स्वर्गलोकातील देवतांनी सप्तर्षींच्या संमतीने सनातनच्या तिन्ही गुरूंची प्रत्यक्ष परीक्षा घेण्याचे ठरवणे
तेव्हा स्वर्गलोकातील देवतांनी सप्तर्षींना यामागील कारण विचारले आणि या तिन्ही गुरूंचे माहात्म्य विशद करण्यास सांगितले. तेव्हा सप्तर्षी म्हणाले, ‘तिन्ही गुरूंचे माहात्म्य शब्दांतून विशद करण्याची आवश्यकताच नाही. ‘प्रत्यक्षाला प्रमाणाची काय आवश्यकता आहे ?’ तेव्हा स्वर्गलोकातील देवतांनी तिन्ही गुरूंची परीक्षा घेण्याचे ठरवले.
३. इंद्रदेवाच्या आज्ञेने वरुणदेव आणि वायूदेव यांनी पृथ्वीकडे प्रयाण करणे, यज्ञाच्या वेळी सोसाट्याचा वारा वाहून मुसळधार पाऊस पडणे अन् सद्गुरुद्वयींच्या प्राणांवर संकट येऊनही त्यांनी सुदर्शनयाग न थांबवल्याने सनातनचे तिन्ही गुरु देवतांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे
यज्ञाच्या दिवशी दिवसभर पाऊस होता. यज्ञाचा आरंभ झाल्यावर पावसाचे प्रमाण वाढून वादळीवारा येऊन मुसळधार पाऊस पडू लागला. इंद्रदेवाच्या आज्ञेने वरुणदेव आणि वायूदेव यांनी पृथ्वीकडे प्रयाण केले. तेव्हा पृथ्वीवरील भारतातील परशुरामाच्या गोमंतक भूमीतील सनातनच्या रामनाथी आश्रमात ‘सुदर्शनयाग’ चालू होता. अकस्मात् पावसाचा जोर वाढून सोसाट्याने वारे वाहू लागले. यज्ञस्थळी भूमीत रोवलेल्या कनातीची लोखंडी चौकट बाहेर उखडली गेली आणि जोराने वारे वाहू लागल्याने कनात हवेत उडून गेली आणि यज्ञस्थळी पाऊस येऊ लागला. वारा आणि पाऊस यांचा जोर इतका होता की, कनातीची लोखंडी चौकट सद्गुरुद्वयींच्या अंगावर पडली असती. अशी परिस्थिती असूनही सद्गुरुद्वयींनी यज्ञ चालूच ठेवला. जेव्हा या घटनेची माहिती श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितली, तेव्हा ते म्हणाले, ‘सद्गुरुद्वयींनी यज्ञ थांबवला नाही, तेच योग्य झाले’. अशा प्रकारे देवतांनी घेतलेल्या या परीक्षेत सनातनचे तिन्ही गुरु उत्तीर्ण झाले.
४. सनातनचे तिन्ही गुरु देवतांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे देवतांसह सप्तर्षी आनंदित होऊन ब्रह्मर्षि वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरूंधती यांनी तिन्ही गुरूंना आशीर्वाद देणे अन् तिन्ही गुरूंना श्रीविष्णूचे सुदर्शनचक्र प्राप्त होणे
सनातनचे तिन्ही गुरु देवतांनी घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे देवतांसह सप्तर्षी आनंदित झाले. सप्तर्षींचे संचालन करणारे ब्रह्मर्षि वसिष्ठ आणि त्यांची पत्नी अरूंधती यांनी प्रसन्न होऊन त्यांचा उजव्या हाताचा तळवा उंचावला अन् सनातनच्या तिन्ही गुरूंना आशीर्वाद दिला. त्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर थांबलेल्या विशाल सुदर्शनचक्राचे एक रूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर धारण केले. त्यानंतर या सुदर्शनचक्राची दोन लघुरूपे सद्गुरुद्वयींकडे गेली. तेव्हा श्रीमहालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांच्या डाव्या हाताच्या करंगळीवर आणि श्रीदुर्गादेवीस्वरूप श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्या उजव्या हाताच्या तर्जनीवर लघुसुदर्शनचक्र धारण केले.
५. पृथ्वीवर येणाऱ्या भीषण आपत्काळातून सुखरूपपणे तरून जाण्यासाठी संपूर्ण विश्वातील साधकांना सुदर्शनचक्ररूपी संरक्षककवच मिळणे
अशा प्रकारे सनातनच्या तिन्ही गुरूंनी सुदर्शनचक्र धारण केल्यामुळे त्यांचे निसर्गावर म्हणजे पंचमहाभूतांवर नियंत्रण रहाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या भीषण आपत्काळात पृथ्वीवरील विविध देशांतील सात्त्विक जीव आणि कर्म हिंदू यांचे नैसर्गिक आपत्तींपासून रक्षण होणार आहे. अशा प्रकारे पृथ्वीवर येणाऱ्या भीषण आपत्काळातून सुखरूपपणे तरून जाण्यासाठी संपूर्ण विश्वातील साधकांना सुदर्शनचक्ररूपी संरक्षककवच मिळाले.
कृतज्ञता
श्रीगुरूंच्या कृपेमुळे ‘साधकांसाठी संजीवनीप्रमाणे कार्यरत असणाऱ्या सनातनच्या तिन्ही गुरूंचे माहात्म्य, दिव्यत्व आणि अलौकिकत्व उमजले’, यासाठी मी श्रीगुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.५.२०२२)
|