बनावट मूत्रपिंड प्रत्यारोपण !
पुणे येथील प्रसिद्ध ‘रुबी हॉल’ रुग्णालयामध्ये काही दिवसांपूर्वी ‘किडनी (मूत्रपिंड) रॅकेट’चा प्रकार उघडकीस आला होता. आतापर्यंत बनावट मूत्रपिंड प्रत्यारोपणाची ५ प्रकरणे उजेडात आली आहेत. २ दलालांनी बनावट ग्राहक सिद्ध करून मूत्रपिंड प्रत्यारोपण केले आहे. या दोघांनी ८ ते ९ बनावट मूत्रपिंड प्रत्यारोपण केली आहेत. पुणे येथील वानवडी भागातील इनामदार हॉस्पिटलसह ठाणे येथील ज्युपिटर रुग्णालय आणि कोईम्बतूरच्या एका रुग्णालयामध्ये या दलालांनी मूत्रपिंड पुरवल्याचे निदर्शनास आले आहे.
रुबी हॉल रुग्णालयामधे १५ लाख रुपयांचे आमीष दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे सारिका सुतार यांचे मूत्रपिंड काढले. शस्त्रकर्म झाल्यानंतर सारिका सुतार यांना ठरलेले पैसे न दिल्याने त्यांनी पोलिसात तक्रार प्रविष्ट केली. त्यानंतर १५ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला. सारिका सुतार पोलिसांकडे गेल्या नसत्या तर ? यापूर्वी आरोग्य विभागाने रुबी हॉल रुग्णालयाचा मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये केलेल्या गैरप्रकारामुळे त्यांचा त्याविषयीचा परवाना रहित करत ‘फसवणूक आणि मानवी अवयव प्रत्यारोपण’ कायद्यानुसार गुन्हा नोंद केला होता. यातून रुग्णालय व्यवस्थापनाला काही फरक पडला नाही. त्यांनी पुन्हा गैरमार्गाने आपले काम चालू केले.
हे सर्व वाचल्यानंतर पैशासाठी समाजमन किती खालच्या स्तराला गेलेले आहे, हे लक्षात येते. त्यातील हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. ‘मूत्रपिंडासारखा महत्त्वाचा अवयव शरिरातून काढून घ्यायचा आणि त्या व्यक्तीला ठरलेले पैसे न देता फसवणूक करायची’, हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. असे दलाल, काही रुग्णालय व्यवस्थापक आणि काही आधुनिक वैद्य यांच्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र अन् आधुनिक वैद्य यांची बदनामी होत आहे. हे संतापजनक आणि गंभीर आहे. यातून गंभीर गुन्ह्यांना गंभीर शिक्षा झाल्याविना गैरप्रकार थांबणार नाहीत, हे अधोरेखित होते. समाजमनाची गुन्हेगारी वृत्ती पहाता कडक शिक्षेची कार्यवाही होणे आवश्यक आहे, तसेच त्या त्या क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तींनी आपल्या क्षेत्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. जनतेला धर्मशिक्षण न दिल्याने ‘स्वतः योग्य वागण्यासमवेत इतरांनाही अयोग्य कृती करण्यापासून थांबवणे’, याचे महत्त्व लक्षात येत नाही. यामुळेच सर्व क्षेत्रांतील गुन्हेगारी वाढत आहे.
– वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील, देवद आश्रम, पनवेल.