(म्हणे) ‘खलिस्तानसाठीच्या जनमत संग्रहाला पाठिंबा द्या !’

बंदी घातलेल्या ‘सिख फॉर जस्टिस’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेची पंजाबमधील गायकांना धमकी

‘सिख फॉर जस्टिस’ याचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू

नवी देहली – पंजाबमध्ये २९ मे या दिवशी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ याचा प्रमुख गुरपतवंत सिंह पन्नू याने पंजाबी गायकांना धमकी देणारे पत्र प्रसारित केले आहे. त्यात त्याने खलिस्तान आंदोलनाला पाठिंबा देण्यास सांगितले आहे. पन्नू याने या पत्रात म्हटले आहे की, मृत्यू येणार आहे आणि भारतापासून पंजाबला मुक्त करण्यासाठी खलिस्तान जनमत संग्रहाचे समर्थन करण्याची हीच वेळ आहे.

गायक मुसेवाल यांची हत्या लॉरेन्स बिश्‍नोई याच्या टोळीने केली आहे. या टोळीचा कॅनडात रहाणारा गुंड गोल्डी बरार याने या हत्येचे दायित्व स्वीकारले आहे. मुसेवाला यांच्या हत्येच्या एक दिवस आधीच पंजाब सरकारने राज्यातील ४५० हून अधिक लोकांची सुरक्षा काढून घेतली होती. यात मुसेवाला यांना असलेली ४ कमांडोज्ची सुरक्षा अल्प करून ती २ कमांडोंज्ची करण्यात आली होती. हत्येच्या वेळी मुसेवाला यांनी या कमांडोंज्ना स्वतः समवेत नेले नव्हते, तसेच समवेत ‘बुलेट प्रूफ’ गाडीही घेतली नव्हती. त्यामुळे त्यांची हत्या करणे गुंडांना सोपे झाल्याचे बोलले जात आहे. मुसेवाला यांच्या आईने या हत्येसाठी पंजाबच्या आम आदमी सरकारला उत्तरदायी ठरवले आहे.

संपादकीय भूमिका

बंदी असलेल्या संघटनेच्या कारवाया चालू असणे, हे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! अशा संघटनांना मुळासह नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक आहे !