ताजमहालात कधीपासून नमाजपठण केले जात आहे ? हे पुरातत्व खात्यालाच ठाऊक नाही !

माहिती अधिकारातून उघड  !

नवी देहली – आगरा येथील ताजमहाल येथे प्रत्येक शुक्रवारी मुसलमानांना नमाजपठण करण्याची अनुमती देण्यात आली आहे; मात्र येथे कधीपासून नमाजपठण करण्यात येत आहे, याची कोणतीही माहिती पुरातत्व विभागाकडे नसल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे. इतिहासकार राजकिशोर राजे यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत याविषयी प्रश्‍न विचारला होता.

राजकिशोर राजे यांनी सांगितले की, ताजमहालात नमाजपठणाच्या संदर्भातील  प्रश्‍नावर पुरातत्व विभागाने कोणताही तपशील उपलब्ध नसल्याचे उत्तर दिले. शाहजहानच्या काळातील कोणत्याही पुस्तकात ताजमहालात नमाजपठण चालू असल्याचा उल्लेख आढळत नाही. शाहजहानच्या कालावधीत सामान्य लोकांना ताजमहालात प्रवेश करण्याची अनुमती नव्हती. त्यामुळे नमाजपठणाचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

संपादकीय भूमिका

कोणतीही माहिती नसलेला पुरातत्व विभागाचा कारभार कसा चालत असेल, हे यातून लक्षात येते ! दुसरीकडे हिंदूंनी प्राचीन मंदिरांच्या ठिकाणी पूजा करण्याची मागणी केली, तर हाच पुरातत्व विभाग त्याला विरोध करतो, हे लक्षात घ्या !