हिंगोली येथे छेडछाडीस कंटाळून विष घेतल्याने मुलीचा मृत्यू !
दोघांवर गुन्हा नोंद !
हिंगोली – सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी येथे छेडछाडीला कंटाळून उंदीर मारण्याचे औषध प्यायलेल्या अल्पवयीन मुलीचा येथे उपचार चालू असतांना मृत्यू झाला. या प्रकरणी त्या मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर सेनगाव पोलीस ठाण्यात २७ मे या दिवशी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणीचा गुन्हा नोंद झाला आहे. अजय इंगोले आणि शिवाजी पांढरे, अशी आरोपींची नावे आहेत. या घटनेनंतर आरोपी पसार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलीची गावातील अजय इंगोले आणि शिवाजी पांढरे हे दोघे छेड काढत होते. ही मुलगी गावात किंवा शाळेत जात असतांना दोघेही तिचा पाठलाग करून तिला त्रास द्यायचे. यासंदर्भात तिच्या कुटुंबियांनी यापूर्वी या आरोपींच्या घरी माहितीही दिली होती; मात्र त्यानंतरही त्यांच्याकडून होणारा त्रास अल्प होत नव्हता. त्रासाला कंटाळून मुलीने २५ मे या दिवशी घरी उंदीर मारण्याचे विषारी औषध प्यायले. तिला तातडीने उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचार चालू असतांनाच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी त्या मुलीचे वडील ज्ञानेश्वर साळवे यांनी शनिवारी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.