आपत्काळात देवतेला कसे प्रसन्न करावे ?
(भाग १५)
३. घरात प्रवेश करतांना काय करावे ?
आश्रमात प्रवेश करण्यापूर्वी आपण पादत्राणे काढून पाय धुतो, तसेच घरात प्रवेश करण्यापूर्वी अशी कृती करावी. जर असे शक्य नसेल, तर घराच्या प्रवेशद्वारावर एका भांड्यात तीर्थ (पाण्यात तुळशीदल घालणे) ठेवावे आणि घरात प्रवेश करण्यापूर्वी तीर्थ आपल्या अंगावर शिंपडून पुढील श्लोक म्हणावा.
ॐ अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा ।
यः स्मरेत्पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतरः शुचिः ।।
अर्थ : जर एखादा अपवित्र (अशुद्ध) किंवा पवित्र (शुद्ध) असेल किंवा इतर सर्व परिस्थितीतही जो पुंडरीकाक्षाचे (श्रीविष्णूचे दुसरे नाव, ज्याचा शब्दशः अर्थ कमळासारखे नेत्र असा आहे) स्मरण करतो, तो बाह्य आणि अंतर् मनांतून शुद्ध होतो.
४. पाणी शिंपडतांना करावयाची प्रार्थना !
त्यानंतर स्नानगृहात जाऊन प्रथम पाय धुवावेत. स्वतःवर थोडे पाणी शिंपडून प्रार्थना करावी, ‘हे भगवंता, माझ्यावर आलेले त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट व्हावे आणि जर माझ्या समवेत अनिष्ट शक्ती आल्या असतील, तर त्या या वास्तूमधून निघून जाव्यात अन् माझी अंतर्बाह्य शुद्धी व्हावी.’ आतापर्यंत आपण हे धर्मपालनांतर्गत करत होतो; परंतु आपल्याला याचा विसर पडला. तेव्हा ईश्वरीय नियोजनानुसार आता (‘कोरोना’ महामारीसारखे) आलेले संकट असे आचरण करण्यास आपल्याला भाग पाडत आहे.’
– पू. तनुजा ठाकूर, संस्थापिका, वैदिक उपासना पीठ (८.२.२०२२)