परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीविष्णूच्या रूपातील झालेला दिव्य रथोत्सव म्हणजे ईश्वराची अनुभवलेली अद्भुत लीला !
सप्तर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा होण्यापूर्वी ईश्वराने रथोत्सवाच्या संदर्भात कशी लीला घडवली, याविषयी या लेखातून जाणून घेऊया.
श्रीकाकुलम् (आंध्रप्रदेश) आणि श्री जगन्नाथ पुरी येथील रथोत्सवाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दिव्य रथोत्सवाशी संबंध असणे, हे ईश्वरी नियोजन !
१. रथोत्सवाची पार्श्वभूमी
‘३.२.२०२२ या दिवशी झालेल्या सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या १९६ व्या वाचनात सप्तर्षी म्हणाले, ‘या वर्षी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जन्मतिथीला (वैशाख कृष्ण सप्तमीला (२२.५.२०२२ या दिवशी)) आपल्याला गुरुदेवांचा रथोत्सव साजरा करायचा आहे. त्याआधी सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम् जिल्ह्यातील श्री इंद्राक्षीदेवीच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करावी.’ १२.२.२०२२ या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आंध्रप्रदेश राज्यातील श्रीकाकुलम् जिल्ह्यातील श्री इंद्राक्षीदेवीच्या मंदिरात जाऊन देवीला प्रार्थना केली.
२. म्यानमार येथून सोनेरी रंगाचा रथ वहात येणे, हे ईश्वराचेच नियोजन !
२ अ. सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी भारत-म्यानमार सीमेवर जाऊन भारतासाठी प्रार्थना करणे आणि त्यानंतर काहीच दिवसांनी म्यानमार येथून आंध्रप्रदेशातील श्रीकाकुलम् जिल्ह्यातील समुद्रातून रथ वहात येणे : १०.५.२०२२ या दिवशी बंगालच्या समुद्रात ‘आसानी’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाले आणि ११.५.२०२२ या दिवशी आंध्रप्रदेश येथील श्रीकाकुलम् जिल्ह्यातील समुद्राच्या काठी समुद्रातून सुवर्ण रंगाचा एक मोठा रथ वहात आला. त्या दिवशी समुद्रातून रथ वहात आल्याची वार्ता ही राष्ट्रीय वार्ता झाली होती. काही जण म्हणाले, ‘‘हा रथ म्यानमार देशातील असावा.’’ वैशिष्ट्य म्हणजे हा रथ समुद्रात मिळण्याच्या काहीच दिवस आधी सप्तर्षींच्या आज्ञेने श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ या मणीपूर राज्यातील भारत-म्यानमार सीमेवर जाऊन देशासाठी प्रार्थना करून आल्या होत्या.
२ आ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा करण्याच्या काही दिवस आधी समुद्रातून रथ वहात येणे, हा ईश्वरी संकेत आहे’, असे सप्तर्षींनी सांगणे : आम्ही सप्तर्षींना या रथाविषयीची वार्ता कळवली. तेव्हा सप्तर्षी म्हणाले, ‘२२.५.२०२२ या दिवशी आपल्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव साजरा करायचा आहे. त्या आधी ‘समुद्रातून हा रथ वहात येणे’, ही सामान्य गोष्ट नाही. म्यानमार देशातील लोकांनी कितीतरी मासांपूर्वीच तो रथ नवस म्हणून समुद्रात सोडला असेल; पण ‘गुरुदेवांच्या रथोत्सवाच्या काही दिवस आधी तो वाहून येणे’ हा केवळ योगायोग नसून ही दैवी प्रचीती आहे. इतक्या दिवसांत तो रथ समुद्रात बुडाला नाही आणि भारत देशाच्या नौदलालाही तो रथ दिसला नाही. हे सर्व ईश्वराचेच नियोजन आहे.’
२ इ. गुरुदेवांच्या जन्मनक्षत्राच्या दिवशी जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाच्या रथाच्या बांधकामाचा शुभारंभ होणे : २०.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे उत्तराषाढा हे जन्मनक्षत्र होते आणि त्या दिवशी सप्तर्षींनी रामनाथी आश्रमात ‘महामृत्युंजय होम’ करण्यास सांगितला होता. महामृत्युंजय होम चालू झाला आणि आम्हाला असे कळले की, ‘वर्ष २०२२ च्या जगन्नाथपुरीच्या जगन्नाथाच्या रथयात्रेसाठी जो लाकडी रथ बनवण्यात येतो, तो बनवण्याच्या कामाचा आज (२०.५.२०२२ या दिवशी) शुभारंभ झाला.’
‘हे सर्व ‘२२.५.२०२२ या दिवशी होणाऱ्या गुरुदेवांच्या रथोत्सवाशी निगडित शुभसंकेत होते आणि पूर्वसूचना होत्या’, असे मला जाणवले.
३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा रथोत्सव होणे’, ही जणू श्रीमन्नारायणाने केलेली रथलीला !
‘वर्ष २०२२ मधील गुरुदेवांचा जन्मोत्सव कसा असेल ?’, याची सर्व साधकांना पुष्कळ उत्सुकता होती; मात्र ‘गुरुदेवांचा रथोत्सव असेल’, असे कुणालाही वाटले नव्हते. वरील सर्व घटना पहाता ‘श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवांनी रथामध्ये आरूढ होऊन साधकांना दर्शन देणे’, हे ब्रह्मांडातील दैवी नियोजन होते. ‘ही श्रीमन्नारायणाची रथलीलाच होती’, असे माझ्या लक्षात आले.
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)
कृतज्ञता
ईश्वर एखादे कार्य करायचे ठरवतो, तेव्हा निसर्ग, पंचमहाभूते, देवता आणि ऋषी ते कसे घडवून आणतात ?’, हे दैवी नियोजन आम्हा साधकांना रथोत्सवाच्या माध्यमातून अनुभवता आले. यासाठी आम्ही सनातनचे सर्व साधक श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेव आणि सप्तर्षी यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.
प्रार्थना
‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुराया, ‘याची देही, याची डोळा’ आम्हाला तुमचा रथोत्सव पृथ्वीवर पहाता आला. आमचे जीवन कृतार्थ झाले. ‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या तुमच्या रथोत्सवातून तुम्ही आम्हाला अपूर्व आणि अविस्मरणीय असा आनंद दिला. गुरुदेवा, तुमचा रथ जसजसा पुढे जात होता, तसतसे तुम्ही जणू सर्व साधकांना आश्वस्त केले की, मी असेच तुम्हा सर्व साधकांना कलियुगातील या घोर आपत्काळातून रामराज्याकडे (हिंदु राष्ट्राकडे) नेत आहे !
आम्ही साधक तुमच्या चरणी प्रार्थना करत आहोत, ‘हे गुरुदेव, शेवटच्या श्वासापर्यंत आम्हा साधकांना तुमच्या चरणी कृतज्ञतेच्या भावाने सेवा करता येऊ दे’, अशी आमची प्रार्थना स्वीकार करा गुरुदेवा, स्वीकार करा !’
– श्री. विनायक शानभाग (२३.५.२०२२)
परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ‘मी अवतार आहे’, असे म्हटलेले नाही. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हे भगवंताचे अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे. ‘सनातन प्रभात’च्या संपादकांचा महर्षींप्रती भाव असल्यामुळे आम्ही या विशेषांकात लिखाण प्रसिद्ध करत आहोत. – संपादक |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |