संभाजीनगर येथे ग्रामपंचायत निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी सहशिक्षक निलंबित !

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई !

संभाजीनगर – वर्ष २०२०-२१ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत हस्तक्षेप करत, वैध-अवैध उमेदवारीचा निकाल घोषित केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या जनार्दन दराडे या सहशिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी २५ मे या दिवशी हे आदेश दिले.

दराडे हे पैठण तहसील कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. तालुक्यातील विहामांडवा आणि सोनवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अरविंद चव्हाण हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पहात होते. ‘३१ डिसेंबर २०२० या दिवशी विहामांडवा ग्रामपंचायत उमेदवारी अर्जांची छाननी करतांना दराडे आणि इतर कर्मचारी यांनी सोनवाडी ग्रामपंचायतीचे उमेदवारी अर्ज माझ्याकडून घेऊन वैध आणि अवैध याचा निकाल घोषित  केला, तसेच दबावतंत्राचा वापर करून तक्रार अर्जावर माझी स्वाक्षरी घेतली, अशी तक्रार चव्हाण यांनी ३१ डिसेंबर २०२० या दिवशी तहसीलदारांकडे केली होती.

या ग्रामपंचायतीविषयी काही न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास मी उत्तरदायी रहाणार नाही. सोनवाडी ग्रामपंचायतीचे दायित्व दराडे यांच्याकडे देऊन त्यांची स्वतंत्रपणे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करावी, तसेच या प्रकरणात चौकशी करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली होती. यानंतर वैजापूरचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या समितीने चौकशी केली. या समितीने नोंदवलेले निष्कर्ष आणि झालेली गंभीर अनियमितता यांविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी ९ मे २०२२ या दिवशी गटणे यांनी पत्र पाठवून दराडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे कळवले होते. त्यानुसार गटणे यांनी दराडे यांचे निलंबन केले आहे.