स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काही परदेशी चाहते, साहाय्यक आणि समर्थक !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज २८ मे २०२२ या दिवशी दिनांकानुसार जयंती आहे. त्या निमित्ताने…
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना अटक झाल्यानंतर त्यांना भारतात घेऊन येणाऱ्या जहाजातून सुटकेचा एक धाडसी प्रयत्न केला आणि भारतीय स्वातंत्र्याचा विषय सर्व जगभर गाजला. त्यांच्या या प्रयत्नाला साथ देणारे अनेक स्वकीय क्रांतीकारक होतेच; पण परदेशी सहकारी, समर्थक किंवा चाहते ही त्यांना लाभले. त्या समर्थक मित्र आणि विचारवंत यांची ही एक धावती ओळख !
१. कर्झन वायलीच्या वधानंतर मदनलाल धिंग्रा यांचे निवेदन वृत्तपत्रात छापून आणणारे डेव्हिड गार्नेट !
इंग्लंडमधील ‘डेव्हिड गार्नेट’ नावाचे एक हुशार कला, साहित्य इत्यादींवर प्रभुत्व असणारे ब्रिटीश नागरिक सर्व भारतियांच्या संपर्कात येत होते. लवकरच ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याही संपर्कात आले. इंडिया हाऊसमधील त्यांच्या फेऱ्या वाढू लागल्या. पुढे मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध केल्यानंतर स्वतःचे एक निवेदन ‘आव्हान’ या नावाने लिहिले आणि ते जगभरच्या अनेक वृत्तपत्रांत छापून आले. हे निवेदन लंडनच्या इंग्रजी वृत्तपत्रात छापून आणणे सोपे नव्हते. डेव्हिड गार्नेट यांनी ते पत्रक ‘डेली न्यूज पेपर’ या वृत्तपत्रात काम करणाऱ्या मित्राच्या साहाय्याने छापून आणले आणि ब्रिटिशांना एक धक्का बसला.
पुढे सावरकरांची सुटका व्हावी; म्हणून डेव्हिड गार्नेट यांनी साहाय्य म्हणून काही पैसे जमवले होते. त्याद्वारे त्यांनी सावरकरांना कारागृहात काही कपडे आणि अन्य साहित्य पुरवले.
२. मार्सेलिसच्या उडीच्या खटल्याच्या वेळी सावरकरांच्या बाजूने स्वतःच्या नियतकालिकात लेखन करणारे रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की
प्रख्यात रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांनी वर्ष १९१० ते १९१२ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जगभर गाजलेल्या उडी संबंधात आणि त्यावर झालेल्या खटल्यात त्यांच्या बाजूने स्वतःच्या नियतकालिकातून लेखन केले, हे फार अल्प लोकांना ठाऊक आहे. या लेखनातून गॉर्की यांनी ब्रिटिशांवर सडकून टीका केली. मॅक्झिम गॉर्की भारतीय क्रांतीकारक आणि भारताचे स्वातंत्र्य यांच्याविषयी आदर बाळगून होते. सावरकरांच्या दुर्दैवी अटकेमुळे मॅक्झिम गॉर्की अत्यंत अस्वस्थ झाले होते. सावरकरांना ब्रिटिशांनी कह्यात घेण्यावर आणि त्यांना दोन जन्मठेपेची शिक्षा देण्यावर त्यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. मॅक्झिम गॉर्की यांनी सावरकरांची तुलना रशियन क्रांतीकारक निकोले चेरनीशेव्हस्की यांच्याशी केली. चेरनीशेव्हस्की हेही एक तत्त्वज्ञ क्रांतीकारक होते. चेरनीशेव्हस्की यांना जेव्हा अटक झाली, त्या वेळी त्यांनी कारागृहात एक कादंबरी लिहिली. ती रशियन क्रांतीकारकांसाठी प्रचंड प्रेरक ठरली. कादंबरीच्या नायकासारखे आपले वर्तन असावे, असा त्या सर्वांचा प्रयत्न असे. लेनिन ही या कादंबरीने भारावून गेले होते.
३. भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने प्रक्षोभक लेखन केल्याकारणाने शिक्षा भोगणारे गॉय अल्ड्रेड
गॉय अल्ड्रेड यांच्या उल्लेखाविना सावरकरांच्या ब्रिटीश सहकाऱ्यांची आणि मित्रांची किंवा सहानुभूतीदारांची ओळख पूर्ण होऊ शकत नाही. गॉय अल्ड्रेड हे ब्रिटीश असले, तरी विचारांनी मानवतावादी, स्वातंत्र्यवादी असून साम्राज्यशाहीच्या विचारांचे शत्रू होते. वर्ष १९०९ मध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या बाजूने प्रक्षोभक लेखन केले; म्हणून त्यांना अटक झाली. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी होऊन गॉय अल्ड्रेड यांना एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. गॉय अल्ड्रेड हे असे पहिले ब्रिटीश नागरिक ज्यांनी भारतासाठी कारावास भोगला.
सावरकरांचा हा सहानुभूतीदार मित्र आणि सावरकर यांची प्रत्यक्ष भेट कधीच झाली नाही, तरीही त्यांचे ऋणानुबंध जुळलेले कायम राहिले. कारागृहातून बाहेर आल्यावर अल्ड्रेड यांना सावरकरांच्या अटकेची आणि साहसाची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्यांची सुटका व्हावी; म्हणून पुष्कळ प्रयत्न केले. त्यात अर्थात्च कुणालाच यश आले नाही; पण प्रयत्नांची पराकाष्ठा सर्वांनीच केली. नंतर अल्ड्रेड यांनी ‘Herald of Revolt’ (हेरॉल्ड ऑफ रिव्हॉल्ट) नावाचे नियतकालिक चालू केले. त्यात सावरकरांच्या ‘१८५७ चे समर’मधील काही भाग छापल्याने ब्रिटीश सरकारने त्याच्यावर बंदी आणली. गांधी हत्याप्रकरणी सावरकरांना फारसे पुरावे नसतांना अटक झाली. तेव्हाही अल्ड्रेड यांनी सावरकर यांच्या बाजूने लेखन केले.
४. सावरकरांचे साहस आणि देशभक्ती यांची प्रशंसा करणारे ब्रिटीश खासदार सर हेन्री कॉटन
सर हेन्री कॉटन हे एक मुलकी अधिकारी होते. वर्ष १८६७ पासून ते मुलकी अधिकारी म्हणून भारतात काम करत होते. महसूल आणि त्यासारख्या विविध भागांचे अधिकारी म्हणून बंगालमध्ये, तसेच आसामचे आयुक्त म्हणून त्यांनी काम पाहिले. ब्रिटीश संसदेमध्ये ते खासदार होते. सावरकरांना अटक झाल्यानंतर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बिपिनचंद्र पाल यांच्या घरी भरलेल्या सभेत त्यांनी सावरकरांच्या साहसाची, देशभक्तीची प्रशंसा करून ‘अशा तरुणांचे आयुष्य वाया जाता कामा नये’, असे म्हटले. ‘हेगच्या न्यायालयाने सावरकरांना फ्रान्सच्या कह्यात दिले पाहिजे’, असे उद्गार काढले, तेव्हा काही ब्रिटीश खवळले आणि हेन्री कॉटन यांच्यावर टीका करण्यात आली; कारण त्यांच्या दृष्टीने सावरकर हे भयंकर आतंकवादी आणि ब्रिटिशांच्या साम्राज्याचे शत्रू होते. ‘भारताचा भूभाग आणि तेथील लोक आपले पिढ्यान्पिढ्या गुलाम रहावेत’, अशी ब्रिटिशांची भावना होती. ‘या ब्रिटीश साम्राज्याला आव्हान देणाऱ्या माणसाविषयी सर हेन्री कॉटन प्रशंसा करूच कशी शकतात ?’, अशा प्रकारची चर्चा जवळजवळ १० ते १५ दिवस ब्रिटीश वृत्तपत्रांमधून चालू राहिली. ‘सर हेन्री कॉटन आणि सावरकर’ असा मथळा देऊन ही चर्चा चालू होती.
– चंद्रशेखर साने
(साभार : मासिक, ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी २०२१)
संपादकीय भूमिकासावरकरांवर टीका करणारे साम्यवादी आणि सावरकरद्वेषी त्यांना साहाय्य करणाऱ्या विदेशी समर्थकांचा भाग जाणून घेतील का ? |
मार्सेलिसच्या साहसी उडी प्रकरणाच्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांची बाजू मांडणारे अधिवक्ता जीन लाँगेट !फ्रेंच समाजवादी विचारसरणीच्या क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सुटकेचा विषय लावून धरला. त्यात जीन लाँगेट आणि दुसरे जीन जॉरीस हे सावरकर यांना जोरदार पाठिंबा देत होते. मार्सेलिसच्या समुद्री साहसी उडी प्रकरणात हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निकाल स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरुद्ध गेल्यानंतर त्यांची बाजू मांडणारे समाजवादी अधिवक्ता जीन लाँगेट यांनी सविस्तर बाजू मांडणारा एक दोन पानी सविस्तर लेख ‘The Comming Soon’ नावाच्या वृत्तपत्रात लिहिला. यात सावरकरांचे एक मोठे छायाचित्र मधोमध प्रसिद्ध झाले आहे. दुसऱ्या पानावर जीन लाँगेट यांचे छायाचित्र आहे. जीन लाँगेट हे विधीज्ञ, समाजवादी विचारवंत, लेखक, संपादक असून कार्ल मार्क्सचे नातू होते. फ्रान्समध्ये आजही सावरकर केस विधीज्ञांच्या अभ्यासक्रमात आहे. जीन लाँगेट यांनी सावरकर यांची बाजू प्रभावीपणे मांडली. तिचा अभ्यास केल्यावाचून या साहसाचे बारकावे आणि आंतरराष्ट्रीय कंगोरे लक्षात येणार नाहीत. जीन लाँगेट यांचे हे साहाय्य सावरकर यांना स्वतःला वैयक्तिकरित्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचेच ठरले. (साभार : मासिक, ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी २०२१) |