पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे एकूण ३१ शाळा अवैध !
पुणे – शिक्षण विभागाने घोषित केल्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे एकूण ३१ शाळा अवैध असल्याचे निदर्शनास आले आहे. पुणे महापालिकेच्या अंतर्गत २३, तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अंतर्गत ८ शाळांना अधिकृत अनुमती नसल्याचे फलक शाळेबाहेर लावण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. याविषयीची माहिती शिक्षण विभागाचे उपसंचालक औदुंबर उकीरडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली आहे. (भ्रष्ट आणि लयाला गेलेली शिक्षणव्यवस्था हे लोकशाहीचे अपयश आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही ! – संपादक)
संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यात १३ अनधिकृत शाळा !
संभाजीनगर – १३ जूनपासून शाळा चालू होत आहेत. शहरासह जिल्ह्यात १३ अनधिकृत शाळा असल्यामुळे पालकांनी शाळांची सखोल माहिती घेऊनच मुलांना प्रवेश द्यावेत, अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी येथे दिली. या शाळांवर कारवाई करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. मांढरे यांनी २६ मे या दिवशी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली.
अनधिकृत शाळांना १ लाख रुपये दंड आणि त्या बंद करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बंद न केल्यास प्रतिदिन १० सहस्र रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न शाळांना राज्यशासन, सी.बी.एस्.ई, आय.सी.एस्.ई, आयबी, आय.जी.सी.एस्.ई, ‘सीआयई’च्या मान्यतेसह शासनाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ आवश्यक आहे. मान्यता काढून घेतलेली शाळा चालू असल्यास त्या शाळेस ‘अनधिकृत शाळा’ म्हणून घोषित करावे. ‘शाळांची सूची तात्काळ संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे घोषित करावी. अशा शाळांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी’, अशा सूचना शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी दिल्या आहेत.
संपादकीय भूमिकाएवढ्या प्रमाणात अवैध शाळा चालू कशा होतात ? राजरोसपणे चालू असणाऱ्या शाळांकडे कुणाचेच लक्ष कसे नाही ? अशा प्रकारे अनधिकृतपणे काम करणारे शाळा व्यवस्थापन मुलांवर काय संस्कार करणार ? यातून मुलांच्या होणाऱ्या हानीचे दायित्व कुणाचे ? |