पंजाबमधील वाढता खलिस्तानी आतंकवाद देशासाठी धोकादायक !
१. पाकिस्तान, चीन आणि देशातील समर्थक यांच्याकडून भारतात खलिस्तानी आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न चालू असणे
पाकिस्तान, चीन आणि देशातील त्यांचे समर्थक यांच्याकडून भारतात खलिस्तानी आतंकवाद पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न होत आहे. गेल्या २ मासांपासून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आले आहे. त्यांना खलिस्तानी चळवळीकडून साहाय्य मिळाल्याच्या अनेक बातम्या पुढे आल्या होत्या. आपल्याला स्मरत असेल की, पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी देशाच्या गृहमंत्र्यांना एक पत्र पाठवले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की, ‘खलिस्तानी आतंकवाद्यांनी देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. बंदी असलेल्या खलिस्तानी ‘सीख्स फॉर जस्टिस’ या संघटनेचा नेता गुरपतवंत सिंह पन्नू हा नेहमी आम आदमी पक्षाच्या संपर्कात असतो. त्याने आम आदमी पक्षाला वर्ष २०१७ आणि २०२२ च्या निवडणुकीमध्येही साहाय्य केले होते.’ केवळ काँग्रेसचे चन्नी यांनीच असे म्हटले नाही, तर एकेकाळी केजरीवाल यांचे सहकारी राहिलेले कुमार विश्वास यांनीही ‘केजरीवाल यांचे खालिस्तानवाद्यांशी संबंध आहेत’, असा आरोप केला होता. त्यानंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आली. आता असे वाटत आहे की, वर्ष १९८० च्या दशकात खालिस्तान आतंकवाद जसा चालू होता, तसेच आता होईल का ?
२. पंजाबमध्ये आतंकवादी कारवायांना पूर येणे
सध्याच्या घडामोडी पाहिल्या, तर असे दिसते की, पंजाबमध्ये ड्रोनच्या साहाय्याने ‘आरडीएक्स’ आणि ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड’ आणल्या जात आहेत. अलीकडेच मोहाली येथील गुप्तचर यंत्रणेच्या कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर या ग्रेनेडने आक्रमण करण्यात आले. ही गंभीर घटना आहे. असे आक्रमण यापूर्वी झाले नव्हते. हरियाणातील कर्नाला येथे ४ आतंकवादी पकडले गेले होते. त्यांच्याकडून ३ आयईडी, एक बंदूक आणि ३१ काडतुसे कह्यात घेण्यात आली होती. अटक करण्यात आलेले चारही आतंकवादी हे ‘बब्बर खालसा’ या आतंकवादी संघटनेशी संबंधित होते. त्यानंतर पंजाबमधील तरनतारनमध्ये ४ किलो ‘आरडीएक्स’ कह्यात घेण्यात आले. डिसेंबर २०२१ मध्ये लुधियाना न्यायालयात २ किलो ‘आरडीएक्स’चा स्फोट झाला होता. या आक्रमणात एकाचा मृत्यू, तर ६ जण घायाळ झाले होते. या स्फोटाच्या एक मास अगोदर २२ नोव्हेंबर २०२१ या दिवशी पठाणकोटमधील भारतीय लष्कराच्या छावणीजवळ स्फोट झाला होता. हा स्फोट ग्रेनेडने करण्यात आला होता. यावरून आतंकवाद्यांनी मोठी सिद्धता केली होती, असे दिसून येते. १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी जलालाबादमध्ये दुचाकीवर स्फोट झाला होता. या प्रकरणात प्रवीणकुमार नावाच्या व्यक्तीची ओळख पटली असून तो फाजिल्का जिल्ह्यातील धर्मपुरा गावाचा रहिवासी होता. हे गाव भारत-पाकिस्तान सीमेच्या अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर आहे. १३ ऑगस्ट २०२१ या दिवशी अमृतसरच्या गजबजलेल्या भागात एक हँडग्रेनेड सापडला होता.
३. सध्या पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे पाठवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ड्रोनचा वापर करण्यात येणे
आतंकवादी ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रास्त्रे पुरवू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात होती. त्यानंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या अहवालामध्ये ड्रोनवर लक्ष ठेवण्याच्या विशेष सूचना दिल्या होत्या. सरकारी आकडेवारीप्रमाणे भारत-पाकिस्तान सीमेवर २०२१ मध्ये ड्रोनच्या ५९ हालचाली नोंदवण्यात आल्या होत्या. काही ड्रोनला पाडण्यात आले; पण पाडण्यात आलेल्या ड्रोनपेक्षा आत आलेल्या ड्रोनचे प्रमाण अधिक आहे. पंजाबमध्ये गेल्या सवा वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे सापडण्याच्या घटना घडल्या आहेत. ही शस्त्रास्त्रे पाठवण्यासाठी प्रामुख्याने ड्रोनचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. हे थांबवण्यासाठी भारताने अधिक चांगल्या प्रकारे सीमेचे रक्षण करायला पाहिजे.
सीमेपलीकडून शस्त्रास्त्रे लावलेले ड्रोन भारतीय सीमेमध्ये विशिष्ट ठिकाणी पाडले जातात. त्यानंतर ड्रोनसमवेत पाठवलेली शस्त्रास्त्रे, स्फोटके, अमली पदार्थ आणि अन्य साहित्य तेथील हस्तक कह्यात घेतात. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
४. पाकिस्तानच्या ‘आयएस्आय’ने पंजाब आणि काश्मीर येथील आतंकवाद्यांच्या समन्वयासाठी ‘लष्करी खालसा’ नावाचा नवीन गट सिद्ध करणे
वर्षभरापूर्वी देहलीच्या सीमांवर बसवण्यात आलेले कथित शेतकऱ्यांचे आंदोलन, तेथील आंदोलकांना खलिस्तानवाद्यांचा पाठिंबा होता. केंद्र सरकारने हे आंदोलन अतिशय संवेदनशीलतेने हाताळल्यामुळे अप्रिय घटना टळल्या. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएस्आय’ने पंजाब आणि काश्मीर येथील आतंकवाद्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी ‘लष्करी खालसा’ नावाचा एक नवीन गट सिद्ध केला आहे. त्यांना अफगाणिस्तानमधील तालिबानच्या साहाय्याने प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे भारताला या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवावे लागेल.
५. पंजाबमधील खलिस्तानी आतंकवादावर नियंत्रण मिळवण्यासाठी गुप्तचर यंत्रणांसमवेत सामान्य नागरिक यांचीही महत्त्वाची भूमिका असणे
पंजाबमध्ये आतंकवाद वाढत आहे. हिमाचल प्रदेशातून काही दुचाकी पंजाबमध्ये येत होत्या. त्यांच्याकडून काही शीख आतंकवाद्यांनी खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न केला. या खालिस्तानवाद्यांना आतून आणि बाहेरून दोन्हीकडून साहाय्य मिळत आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या ‘७ लोककल्याण मार्ग’ या शासकीय निवासस्थानी देश आणि विदेशातील शीख समुदायाच्या व्यक्तींना आमंत्रित केले असतांनाच पंजाबमध्ये पतियाळामध्ये खलिस्तानवाद्यांनी दंगल घडवणे, हा नियोजनबद्ध कट असल्याची शंका घेण्यास वाव आहे. त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेश विधीमंडळाच्या प्रवेशद्वारावर खलिस्तानचे भित्तीपत्रक चिटकवणे आणि खलिस्तानी झेंडे लावणे हीसुद्धा भारतासाठी गंभीर घटना आहे. जोपर्यंत गुप्त माहिती योग्य प्रकारे मिळत नाही, तोपर्यंत या घटना थांबवणे सोपे नाही. सामान्य जनता खलिस्तानीच्या विरोधातील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे नागरिकांनीही सतर्क राहून कुठे काय चालू आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे.
या सर्व घटनांच्या मुळाशी ‘सीख्स फॉर जस्टिस’चा नेता गुरपतवंत सिंह पन्नू हा कुठे ना कुठे गुंतलेला आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यासाठी त्यानेच पुढाकार घेतला होता. पन्नू हा भारतासाठी मोस्ट वाँटेड आतंकवादी आहे. तो सध्या अमेरिकेत राहून खलिस्तान समर्थनाची चळवळ चालवण्याचे काम करतो. त्याच्या ‘सीख्स फॉर जस्टिस’ या संघटनेच्या माध्यमातून भारतविरोधी प्रचार करणे आणि भारतविरोधी कारवायांना साहाय्य करण्याचे काम करतो. त्याच्या विरोधात वर्ष २०२० मध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसर आणि कपुरथळा येथे देशद्रोहाचाही गुन्हा नोंदवला आहे.
६. खलिस्तानी आतंकवाद थांबवण्यासाठी विदेशातील त्यांच्या म्होरक्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
देशाची आर्थिक प्रगती थांबवण्यासाठी आतंकवादाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यामुळे आता सीमा सुरक्षा दलाने अतिशय सतर्क रहायला पाहिजे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी सीमांवर बारीक लक्ष ठेवून जेव्हा जेव्हा घुसखोरी होते, त्यांचे विश्लेषण करायला पाहिजे. ज्या भागात घुसखोरी होईल, त्यासाठी त्या भागातील सुरक्षा दलांना उत्तरदायी ठरवले पाहिजे. याखेरिज आतंकवाद किंवा खलिस्तानी यांचे समर्थक जे कॅनडा, इंग्लंड आणि अमेरिका येथे पसरले आहे, त्यांच्याही विरोधात कारवाई झाली पाहिजे. विदेशातील आतंकवादी समर्थकांच्या नेत्यांना अटक केली पाहिजे. आपल्याकडील मुत्सद्देगिरीचे बळ वापरून त्यांच्यावर कारवाई करण्यास या सगळ्या राष्ट्रांना भाग पाडले पाहिजे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.